14/08/2023
*राणी लक्ष्मीबाई विद्यालया मध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना*
शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळ येथे शिक्षक पालक संघाची सभा संपन्न झाली. प्रतिमा पूजन व दिपक प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सभेला अध्यक्ष म्हणून विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, सचिव श्री. विजय कासलिकर,संचालिका सौ. सुषमा दाते, संचालक श्री महेश जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. तांबेकर, यवतमाळ जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक श्री. अजित राठोड, पालक शिक्षक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. जयसिंगपुरे, माता पालक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. गुबे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक देवेंद्र भिसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पालक वृंद यांची उपस्थिती होती. या सभेचे प्रास्ताविक करताना शाळेचे पर्यवेक्षक श्री देवेंद्र भिसे यांनी मागील वर्षीच्या शालांत परीक्षेचा निकाल, क्रीडा स्पर्धा मधील विद्यार्थ्यांचे यश, विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले प्राविण्य तसेच शाळेत घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व या सभेचा हेतू कथन केला. त्यानंतर सत्र 2023 - 24 करिता पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व प्रतिनिधींचे वर्ग शिक्षकांनी पुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक श्री. अजित राठोड यांनी वाहतूक नियमां बद्दल माहिती देऊन पालकांमध्ये जागृती निर्माण केली. यानंतर पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व शिक्षक व संस्था सतत प्रयत्नशील आहे भविष्यातही प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. यानंतर संस्थेचे सचिव श्री. विजय कासलीकर यांनी मार्गदर्शन करताना पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली. शेवटी विशुद्ध विद्यालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी संस्था नेहमीच विद्यार्थी व शाळा यांच्या विकासाकरिता कार्यरत आहे व विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवणे हे शाळेचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील शिक्षक श्री. साहेबराव चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. वंदना भगत यांनी केले.यानंतर पालक शिक्षक संघ कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. यामध्ये पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. भाकरे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा म्हणून सौ. मेहता यांची निवड करण्यात आली.