23/02/2026
आज २३ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेला जागवणारा आहे. संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा विचार करताना आपण एका अशा संताच स्मरण करतो, ज्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली आणि धर्माला मानवतेचा अर्थ दिला. ते केवळ कीर्तनकार नव्हते, तर ते चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याविरुद्ध झुंज दिली.
२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेले हे डेबूजी पुढे संपूर्ण महाराष्ट्राचे ‘गाडगे बाबा’ झाले. अंगात चिंध्यांचा सदरा, हातात झाडू, कानात फुटकी कवडी आणि डोक्यावर फुटलेले खापर हेच त्यांचे दागिने होते. ते ज्या गावात जात, त्या गावात प्रथम स्वच्छता करीत. ‘देवळात जाण्यापूर्वी गाव स्वच्छ करा’ हा त्यांचा ठाम संदेश होता. त्यांच्या मते स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यांनी कीर्तनातून लोकांना विचार करायला शिकवले. देवासाठी नवस बोलण्याऐवजी भुकेल्याला अन्न द्या, मंदिर उभारण्यापेक्षा शाळा उभारा, जातीभेद विसरून माणसाला माणूस म्हणून वागवा, हा त्यांचा आग्रह होता.
त्या काळात संपर्काची आधुनिक साधने नव्हती. ना दूरध्वनीची सोय, ना प्रसारमाध्यमांचा व्याप. तरीही त्यांच्या कार्याची कीर्ती दूरदूर पसरली. त्यांच्या विचारांमुळे आणि कृतीमुळे अनेक समाजसुधारक त्यांच्याशी जिव्हाळ्याने जोडले गेले. शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. शिक्षण हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, या विचारावर दोघांचाही ठाम विश्वास होता. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला गाडगे बाबांनी नैतिक पाठबळ दिले. गरीब आणि वंचित मुलांनी शिक्षण घ्यावे, हा दोघांचाही ध्यास होता.
त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशीही त्यांचे विचारांचे नाते होते. ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती आणि कीर्तनातून लोकजागृती हे दोघांच्या कार्याचे समान धागे होते. दोघेही संत परंपरेतून आले, पण त्यांची भक्ती ही समाजहितासाठी झटणारी होती. गावागावांत फिरून लोकांना जागे करणे, समाजातील दोषांवर थेट भाष्य करणे आणि कृतीतून आदर्श घालून देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक व्यक्तिमत्त्व असलेल्या मेहेर बाबा यांच्याशीही गाडगे बाबांचे स्नेहसंबंध होते. जरी दोघांची कार्यपद्धती वेगळी असली, तरी माणसाच्या अंत:करणातील शुद्धतेवर दोघांचाही भर होता. मानवतेचा संदेश हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता.
सेवेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर टेरेसा यांच्याविषयीही गाडगे बाबांना आदर होता. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन दुःखी आणि निराधारांची सेवा करणे हा समान धागा या सर्व समाजसुधारकांना जोडणारा होता.
त्या काळात संवादाची साधने नसतानाही विचारांची देवाणघेवाण प्रत्यक्ष भेटींमधून, परस्पर आदरातून आणि कार्याच्या प्रेरणेतून होत होती. हीच त्या काळातील खरी सामाजिक एकात्मता होती.
गाडगे बाबांचे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातेही अत्यंत आदरपूर्ण होते. समतेचा आणि स्वाभिमानाचा लढा या दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी लढला. अस्पृश्यता, अज्ञान आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य त्यांनी समाजाला दिले. त्यामुळे गाडगे बाबा हे केवळ वारकरी संत नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे वाहक होते.
६ डिसेंबरला बाबासाहेबांच महापरीनिर्वाण झालं आणि गाडगे बाबांनी अन्न पाणी सोडल. आपल्या सहविचारवंताच्या जाण्याने ते अंतर्बाह्य व्यथित झाले. १४ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबरला वलगांव येथील पेढी नदीच्या तिरावर चालत्या गाडीमध्ये बाबांनी देह सोडला आणि एका युगाचा अंत झाला. त्या प्रसंगी ग.दी. माडगुळकर यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत भावना व्यक्त केल्या त्या पुढीलप्रमाणे-
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट राउळीची घाट निनादली
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठासी
संतमाळेतील मणी शेवटला आज ओघळला, एकाएकी
गाडगे बाबा म्हणजे संत परंपरेतील असा तेजस्वी दीप, ज्याने स्वतः जळून समाजाला प्रकाश दिला. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करूया. स्वच्छता, समता, शिक्षण, सेवा आणि मानवता हेच त्यांचे खरे स्मारक आहे. त्यांच्या आयुष्याने शिकवले की खरा धर्म म्हणजे माणसासाठी जगणे आणि माणसाला उभे करणे.
-अवकाश कैलासराव बोरसे