30/03/2020
# बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून रामविलास मौर्या परिवारातर्फे २००० नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप #
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते, आमदार सन्मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने बहुजन विकास आघाडी, नायगाव पुर्व स्टार सिटीच्या माध्यमातून भाजी विक्रेते रामविलास मौर्या परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी जपत २००० पेक्षा जास्त नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवून सोशल डिस्टंन्सींग नियमांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी सहकार्यासाठी बहुजन विकास आघाडी जुचंद्र महिला अध्यक्षा अर्चना पाटील, कार्यकर्त्या सरीता गुप्ता, स्टारसिटी युवा अध्यक्ष संकेश पाटील, कार्यकर्ते रवी दर्जी, अभिषेक गुप्ता, नेतन पॉल व इतर उपस्थित होते
कोरोना सारख्या महाभयंकर संकटाशी आपला देश धैर्याने लढा देत आहे. सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, सर्व हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचारी खंबीरपणे कोरोनाचा सामना करत आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने जिवनावश्यक वस्तू मिळविणेसाठी सर्वसामान्य तथा गोरगरीब नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या देशावर आलेल्या या संकट काळात सर्वजण आपआपल्या परीने गरजवंतांची मदत करीत आहेत व आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या अडचणीच्या काळात भाजीविक्रेते रामविलास मौर्या परिवाराने केलेली मदत प्रेरणादायी असल्याचे युवा कार्यकर्ता संकेश पाटील यांनी सांगितले. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परीने आपल्या देशाच्या मदतीमध्ये खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.