चारित्र्यसंपन्नता आणि निष्ठा हेच डाव्यांचे भांडवल आहे. त्याच्या जोरावरच त्यांची चळवळ असून, जोपर्यंत विषमता हटणार नाही; तोपर्यंत ही चळवळ संपणार नाही, डाव्यांनी सत्तेसाठी कधीच राजकारण केले नाही. विचार, तत्त्वज्ञान आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीतून त्यांनी जनतेचे प्रश्न मांड
ले. कार्ल मार्क्स यांनी फॉवर बाखच्या लिखाणाचा परामर्श घेताना लिहिलं आहे, की आतापर्यंत तत्त्वज्ञांनी जग कसे आहे, हे विविध प्रकारे समजावून सांगितलं आहे; परंतु मुद्दा हे जग बदलण्याचा आहे. हे जग बदलणं म्हणजे समाजाला वर्गविहीन, जातिविहीन करणं, हे जग बदलणं म्हणजे माणसाला विश्वाच्या केंद्रस्थानी आणणं, हे जग बदलणं म्हणजे माणसाच्या जगण्याचा अर्थ पूर्ण करणं, हे जग बदलणं म्हणजे माणसातल्या
सर्व मंगल सुप्त शक्तींचे प्रकटीकरण करता येऊ शकेल, अशी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था निर्माण करणं, माणसाचं जगणं सुंदर करणं, त्याला विविध रंगांनी सजवणं, हे फक्त माणूसच त्याच्या संघटित शक्तीच्या आधारे करू शकतो. त्यासाठी क्रांती करावी लागते. ती लोकशाही मार्गानं होणार असेल, तर उत्तमच आहे; परंतु वर्गशत्रू हिंस्र बनला, तरी त्याला जनाधाराद्वारे नामोहरम करण्याची शक्ती सर्वहारा वर्गजातींच्या एकजुटीत निर्माण झाली पाहिजे, असा जनाधार हाच हिंसेला एकमेव पर्याय आहे. त्यांच्याच बळावर क्रांती यशस्वी होऊ शकते; हिंसक मार्गानं नव्हे!