18/09/2023
*भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)*
*महाराष्ट्र राज्य कमिटी*
*पुसेसावळी, जि. सातारा येथील मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी निदर्शने करा: माकपच्या सचिवमंडळाची हाक*
दि. ९ सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात मुस्लिम समाजावर भयानक हिंसक हल्ला करण्यात आला. त्यात एका उच्च विद्याविभूषित मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली. तसेच, कित्येक निरपराध नागरिक गंभीर जखमी झाले.
शिंदे फडणवीस अजित पवार यांचे राज्य सरकार राज्यातील अल्पसंख्याक आणि दलितांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, हेच सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.
गेले काही महिने सातारा जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम समाजाच्या विरोधात भावना भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचीच परिणती पुसेसावळीच्या शोकात्म आणि संतापजनक घटनेत झाली आहे. परिस्थिती प्रक्षोभक झाली असल्याचे माहीत असूनही पोलीस आणि प्रशासनाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
या हिंसाचारास भाजपचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप सातारा जिल्ह्यातील स्थानिक नागरिक जाहीरपणे करत आहेत. मुस्लिम तरूणांचे मोबाईल हॅक करून त्यावरून मुद्दाम चिथावणीखोर संदेश पाठवण्याचे कारस्थान जिल्हाभर राबवले जात असल्याचे दिसून आले आहे.
शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या घटना घडवण्यात आल्या आहेत. २०२४च्या निवडणुकीत भाजपला यश मिळावे, यासाठी हिंदू-मुस्लिम सलोखा जाणीवपूर्वक उध्वस्त केला जात आहे. कायद्याच्या राज्याला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगारी टोळक्यांचा बंदोबस्त करणे ही राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
पुसेसावळी येथे हत्या करण्यात आलेल्या युवकाच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पंचवीस लाख रुपयांची मदत करावी, गेले सहा महिने समाजात धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या गैरवापराचा सखोल तपास करावा, सर्व गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचे नव्याने पंचनामे करावेत आदी मागण्या स्थानिक सर्वधर्मीय सुजाण जनतेने केल्या आहेत. त्या मागण्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पूर्ण समर्थन करत आहे.
सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या या धर्मांध हिंसाचाराचा आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा कडक निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर जोरदार निदर्शने करण्याची हाक देण्यात आली आहे.
ही निषेध निदर्शने प्रागतिक पक्षांना सोबत घेत संयुक्तपणे करावीत अशी हाक माकप देत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अल्पसंख्याक समाजाच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे, याची ग्वाही देत आहोत.
*डॉ. उदय नारकर*
*राज्य सचिव*