05/09/2020
*आजचा शिक्षक, सध्य स्थिती आणि सुधारणा*
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः II*
*भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसोबतच शिक्षण/ विद्या यांची देखील नितांत गरज असते. किंबहुना ज्ञानाच्या माध्यमातून मानव आपल्या गरजा भागवू शकतो. शिक्षण हा जागतिक सभ्यतेचा पाया समजला जातो. भारतीय संस्कृतीत ‘ज्ञानदान’ हे सर्वोत्तम दान समजले जाते. हे दान देणाऱ्या साधकाला देखील आपण पूजनीय मानतो. म्हणूनच जगात शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. महासत्ता अमेरिकेचा पाया रचणारे थोमस जेफरसन, स्वतंत्र भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता म. गांधी या सर्वांनी ज्ञानाला आणि ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाला कायमच सर्वोच्च स्थान दिले होते. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांना देखील आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद लाभले होते. जसे सैनिक आपल्या राष्ट्रासाठी कार्य करत असतो तसेच शिक्षक राष्ट्रकार्य करीत असतो. अशा या पवित्र शिक्षकी पेशाला स्वतंत्र भारतात सर्वोत्तम स्थान मिळणे अपेक्षित होते, मात्र गेली अनेक वर्षे आपल्याकडे याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.*
*शिक्षकांची सद्यस्थिती :*
*संत कबिरांचे ‘ गुरुबिन कोन बताये राह’ वचन आपल्याला शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाते, मात्र शिक्षकी पेशातील पवित्रता समाजात पाळल्याचे दिसून येत नाही. शिक्षकांना त्यांचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सोडून त्यांना अन्य कामे सरकारकडून, समाजाकडून सोपवली जातात. निवडणूक यंत्रणेमध्ये त्यांचा सहभाग घेतला जातो. लोकसंख्या गणन करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील त्यांचा सहभाग घेतला जातो. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये शिक्षकांना शिक्षकेतर कामे सोपवण्यात येवू नयेत असे सांगितले आहे, मात्र याच कायद्यामध्ये जनसंख्या गणन, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, संसद यांचेसाठी निवडणूक यंत्रणा यांसाठी अपवाद करण्यात आले आहे. याबाबत मा. ना. उच्च न्यायालय सो यांनी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, पण त्यांचे पालन आपल्याकडे केले जात नाही. मुळातच, शिक्षकांकडे येणाऱ्या भावी पिढीला घडवण्याचे काम असते, त्यामुळे हे कार्य अविरत असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना ज्ञानदाना व्यतिरिक्त इतर कामे देणे हे नवीन आलेल्या रोपट्यांना मशागतीनंतर मध्येच वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे आहे.*
*शिक्षकपेशा ही अत्यंत अवघड अशी जबाबदारी असते. अत्यंत कमी लोक हे पवित्र कार्य स्विकारतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात देखील शिक्षकांचे बहुमुल्य योगदान होते यावरूनच शिक्षक हा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंगभूत हिस्सा आहे हे लक्षात येईल. मात्र, विद्यमान स्थितीत शिक्षकी पेशाला व्यवसायातील शेवटचा मार्ग म्हणून पाहिले जाते. आजकालचा युवक भविष्यात मी शिक्षक होईन असे म्हणत नाही. शिक्षकांना वेळेवर मानधन दिले जात नाही, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली प्रगती होते, त्यांनाच योग्य सन्मान न देता त्यांचेकडून शिक्षकेतर कामे करून घेतली जातात. भारतामध्ये हीन वागणूक मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जसे हाल होतात तसेच हाल शिक्षकांचे होत आहेत. कोरोना काळात देखील शिक्षकांना जिल्हा सीमेवर वाहतूक संदर्भातील कामे दिली गेली होती. नव्याने येणारी तंत्रज्ञानाच्या युगातील यंत्रे शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. याचे कारण मानवी बुद्धिमत्तेतील विवेक हा यंत्रांना येवू शकत नाही.*
*शिक्षकांची स्थिती सुधारण्याचे काही उपाय :*
*शिक्षकांची आर्थिक, सामाजिक, मानसिक अशी सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी केवळ शासन स्तरावरूनच नाही तर समाजाकडून देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकारने शिक्षकांना शिक्षकेतर कामे न सोपवता त्यांना त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यात मदत करणे गरजेचे आहे. समाजाने देखील शिक्षकी पेशाला मानाचे स्थान दिले पाहिजे, जेणेकरून शिक्षकी पेशाकडे एक राष्ट्रकार्य समजून ते करण्यासाठी आजचा तरुण सरसावेल. बी.एड., डी.एड., यासारख्या परीक्षांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील परीक्षांसारखा समान न्याय मिळणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासक्रमामध्ये जास्त सामाजिक ज्ञान,प्रात्यक्षिक परीक्षेवर भर,प्रवेश परिक्षेची कठीण पातळी वाढविणे गरजेचे आहे.*
*शिक्षक असलेलाच व्यक्ती शिक्षण मंत्री होणे आवश्यक आहे, जेणेकरून शिक्षणातील समस्यांचे निराकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. सरकार आर्थिक बजेट मधील केवळ दोन टक्के हिस्सा शिक्षणाकडे सोपवते, वास्तविक पाहता, याला संरक्षण खात्याइतकेच महत्त्व प्राप्त होणे हे संयुक्तिक आहे. येणारी पिढी जर ज्ञान संपन्न असेल तर त्याचा भविष्यात चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणूनच शिक्षण या विषयाकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आजच्या शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांना योग्य तो मानसन्मान मिळालाच पाहिजे हा संकल्प सर्वांनी केला तरच खऱ्या अर्थाने शिक्षकदिन आपण साजरा केला असे म्हणू शकतो.*
*श्री. राजेंद्र मधुकर चोरगे,*
*अध्यक्ष*
*गुरुकुल शिक्षण संस्था, सातारा*