साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय,बिदाल

  • Home
  • India
  • Satara
  • साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय,बिदाल

साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय,बिदाल ग्रंथ हेच गुरू!

05/11/2024
10/10/2023

*भाग :- 17*
*पुस्तक :- बलुतं*
*लेखक :- दया पवार*

आजोबा-म्हणजे आईचे चुलते तानाजी हे मुंबईला गोदीत नोकरीला. हे आम्ही मुंबईला असताना आईला एकदा भेटायला आलेले. वडील त्या वेळी गोदीतच कामाला होते. त्यावेळी नवीन भरतीसाठी बिल्ले मिळत. असाच एक बिल्ला वडिलांनी सासऱ्याला
दिलेला. ह्या बिल्ल्यामुळं आजोबांना नोकरी लागली. त्यांच्या नोकरीच्या वेळी मुंबईत एक किस्सा त्यांच्याच संदर्भात झालेला. कामगारांना लवकर 'जाथू' करत नसत. त्यांची रिट्रेंचमेंट व्हायची. नेमकी आजोबांची पाळी आलेली. वडिलांनी काय करावं? त्यांच्या अंगठ्यावर एक मोठी लोखंडी कांब जाणुनबुजून टाकलेली. आजोबांचा अंगठा रक्तबंबाळ होतो. त्यामुळं आजोबा मेडिकल रजेवर जातात. काम करत असताना आपल्याला लागलं, असा बहाणा ते करतात. वडिलांच्या क्लृप्तीमुळं आजोबांची नोकरी वाचली, याचा आजोबा नेहमी अभिमानाने उल्लेख करीत. अर्थात वडिलांना मागं एकदा तुरुंगाच्या कचाट्यातून सोडवलं होतं त्याचे उपकार त्यांनी हे असे फेडले!

आजोबा केव्हा केव्हा मुंबईहून यायचे. त्यांचं सारं लक्ष गावच्या मंडळींकडे. जमिनीत त्यांनी आपलं मुंबईचं सारं उत्पन्न घातलेलं. काळ्याभोर जमिनी विकत घेतलेल्या. सारखे मनीऑडरी पाठवायचे. मुंबईला ते काटकसरीत दिवस काढीत. त्यांचं ध्यानही मजेशीर. रंगानं ते खूपच काळे. गुडघ्यापर्यंत धोतर. अंगात बंडी. त्यालाही कधी गुंड्या नाहीत. त्यांची छाती सतत उघडी. डोक्यावर काळी टोपी. गावी एक- दोन दिवसांसाठी आले, म्हणजे सारे चळाचळा कापत. म्हातारपणातही बायको पुढं येत नसे. त्यांचा अंमलच तसा होता. मी मात्र आजोबांची टवाळी करायचो. माझ्यावर ते कधी रागवत नसत. मी त्यांना म्हणायचो, “बाबा, एवढं कमवतोस मग एखादा वुलनचा कोट का घेत नाहीस?" म्हातारा नुसता हसायचा. तंबाखूचं व्यसन सोडून त्यांना कुठलंच व्यसन नव्हतं. मुंबईला निघाला, म्हणजे मुलांच्या हातावर एक आणा ठेवायचा. हेच प्रमाण त्यांच्या लग्न झालेल्या मोठ्या मुलींच्याही बाबतीत. म्हाताऱ्याच्या चिकटपणाची मागे चेष्टा व्हायची.

त्यांच्या आयुष्याचा शेवट फारच शोचनीय झाला. दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. त्या वेळी मी सायन इथं रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होतो. तेही पोटभाडोत्री. म्हातारा आमच्याकडे जेवायला होता. सायन इथं बिल्डिंगच्या खालूनच रेल्वे लाईन गेलेली. फेन्सिंग ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तिथं नेहमी अपघात व्हायचा. म्हातारा मला नेहमी सल्ला द्यायचा- “हे बघ. लांबची वाट पडली तरी चालेल, पण स्टेशनात मधून रूळ ओलांडून जाऊ नकोस." मी मान डोलवायचो. म्हाताऱ्याचं जेवण झालं म्हणजे त्याला चहाची तलफ यायची. स्टेशनवर तो रात्री चहा प्यायला जायचा. असाच एका रात्री तो जात असताना धावत्या रेल्वेच्या धुडानं त्याला उडवलं. अपघातस्थळी मी गेलो, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही नव्हता. नुसत्या धक्क्यानंच म्हाताऱ्याचं सारं काही आटोपलं होतं. मला नियमितपणे 'रूळ ओलांडून जाऊ नको' असं सांगणारा आजोबा स्वत: मात्र त्या रात्री रूळ ओलांडून गेला !

म्हाताऱ्याचं प्रेत कॉरोनरकडून घेण्यास मलाच जावं लागतं. मीच त्यांचा मुंबईत वारस होतो. पंचनाम्यात म्हाताऱ्याचे कपडे-चंची नोंदवलेली असते. म्हाताऱ्याजवळ काही पैसे असावेत, ह्याचा अंदाज पोलिसांनाही लागला नव्हता. मी रेल्वे पोलीस स्टेशनात चंचीच्या चोरकप्प्यातून काही नोटा काढून दाखवतो, तेव्हा पोलिसही चक्रावून जातात. गावावरून मामा, आजी येईपर्यंत बॉडी ठेवणं तसं गैरसोयीचं होतं. म्हाताऱ्याच्या ओळखीसाठी मला कोल्ड रूममध्ये जावं लागतं. सारा उघड्यानागड्या प्रेतांचा खच पडलेला. त्यात कोल्ड रूममधला तो जीवघेणा वास. क्षणभरही तिथं थांबता यायचा नाही. म्हाताऱ्याची बॉडी ओळखणं तसं अवघड नसतं. म्हाताऱ्याला त्या रात्री मीच अग्नी देतो.

दुसऱ्या दिवशी मामा, आजी येतात. तोवर त्यांचं सर्वच संपलेलं असतं. वडिलांच्या फंड सर्व्हिसच्या पैशाकरता ते गोदीवर जातात. संध्याकाळी परत येतात, तो त्यांनी खूपच बाजारहाट करून आणलेला. मामाच्या अंगावर नवंकोरं शर्ट झळकत असतं. आजी- मामीकरता नव्या साड्या आणलेल्या असतात. मामा खुलासा करतो-गोदीतल्या कामगारांनी वर्गणी काढून काही पैसे दिले होते. मी हे ऐकून उडालोच. उभं आयुष्य कष्ट करणारा बाप कालच गेला असताना, हा बाजारहाट करणं कसं सुचू शकतं हे माझ्या टाळक्यात बसतच नव्हतं. माणूस हा किती गूढ आहे, हे त्या रात्री माझ्या मनावर खूपच खोलवर बिंबलं. माणसाच्या ह्या वागण्याचा कार्यकारणभाव तरी कोणता, ह्याचा विचार करताना माझ्या मेंदूला शीण आला. म्हाताऱ्यानं मोठ्या कष्टानं मिळवलेली आयुष्याची पुंजी मामांनी एक-दोन वर्षांतच उधळली. मामांना कष्टाची सवय नव्हती. मुंबईच्या मनीऑर्डरीवर दिवस मजेत घालवण्याची सवय लागलेली. दोन-तीन वर्षांनी जमिनीचा एकेक तुकडा मामा विकू लागले. परिस्थितीनं त्यांची दैना दैना केली. आज मामा मुंबईत पोटापुरती मोलमजुरी करीत आहेत. साऱ्या कुटुंबालाच ते मुंबईला घेऊन आले आहेत." त्यात मुलाबाळांचं लेंढार. एका काळी हत्तीसारखे दिसणारे मामा आज उसाच्या चिपाडांसारखे आक्रसून गेले आहेत. त्यांचं दुःख पाहवत नाही.

तर काय सांगत होता? हं. औरंगपूरची गोष्ट. मामाच्या घरासमोरच राणूजीचं घर होतं. ह्या घरातली माझी आजी म्हणजे वडिलांची आई. ह्याच घरात आजीचा जन्म झालेला, आई आणि आजी ह्या एकाच गावच्या. त्यांच्या माहेरचं आडनावही एकच- कसबे. ह्या गोष्टीची मला गंमत वाटायची. राणूजी हा मोठा करारी म्हातारा. गंडमाळांच्या दुखण्यानं बेजार झालेला. पण त्याची जीभ दुखण्यातही तशी खूप तिखट. आमच्यावर मात्र त्याची मायेची पाखर त्या घरी जाण्याची तीव्र इच्छा व्हायची. तसा राणू खूपच गरीब होता. गवंडीकाम करायचा आणि कच्च्याबच्च्यांना सांभाळायचा. पण मामाच्या आणि राणूआज्याच्या घरातून विस्तव जात नसे. खरं म्हणजे ते घरभाऊ. एकाच कुटुंबातून वंशवेल वाढलेला. आता वेगवेगळ्या फांद्या; पण त्यांच्यातलं वैर शिगेला पोहोचलेलं.

राणू आज्याच्या एक नातेवाईक विठ्याला राहणारा. हा जागती जोत भगत आहे, तो मुठीनं माणसं मारतो, आमच्या घरावर करणी करतो, ह्या भयगंडानं मामाच्या घरातील सारेच पछाडलेले. मामाच्या वाशेरे ह्या गावची सासू होती. तिला मूलबाळ काही झालं नाही. मामीला मात्र पुढं बरीच मुलं झाली. पण तिचा गर्भ दुपावतो ह्याला विठ्याचा भगतच कारणीभूत, हा मामाच्या सासूनं सर्वांचा गैरसमज करून दिलेला. मामाच्या सासूच्या अंगात देवी यायची. रात्र झाली, जेवणखाण आटोपलं. म्हणजे मामाच्या सासूच्या अंगात यायचं. कपाळावर लालभडग चांदीच्या रुपयाएवढं कुंकू ; केस सोडलेली ही गोरीपान बाई जेव्हा रात्रीची घुमू लागे, तेव्हा माझ्याही जिवाचा थरकाप व्हायचा. तिच्यापुढं रिंगण भर, कोंबडं उतर, तीन वाटेवर जाऊन उतारा टाक, हा प्रकार सतत चालायचा.

अशीच एक पावसाळ रात्र आठवतेय. बाहेर धुवांधार पाऊस कोसळत असतो. विजा कडाडत असतात. डोळ्यात बोट घातलं तरी बाहेरच्या अंधारात दिसत नसतं. त्या रात्री विठ्याच्या भगताकडून मूठ येणार, म्हणून देवीनं जाहीर केलेलं असतं. सारं घर संचित. मूठ असते तरी कशी, ह्या भावनेनं मीही जागा. जीव मुठीत घेऊन बसलेला. आता मूठ येईल आणि घरातील कुणाही माणसाला रक्ताच्या गुळण्या पडतील, या भीतीनं सारेच गारठलेले. केव्हा झोप लागते ते कळत नाही. पहाटे उठून बघतो, तो घराची समोरची भिंत कोसळलेली. देवीमुळंच मूठ कुणाला लागली नाही, भिंतीवर बला गेली, म्हणून साऱ्यांनी श्वास सोडलेला. मुठीमुळं भिंत पडली की बाहेरच्या धुवाधार पावसामुळं, हे माझ्या बालमनाला कोडं पडलेलं. लिंबाला टाचण्या टोचलेल्या- असं टोचण्या टोचलेलं लिंबू हवेतून भिरभिरत येतं आणि माणसाच्या प्राण घेतं.... हा प्रकार पुढं पुढं मला हास्यास्पद वाटू लागतो.

मामाच्या घराच्या अगदी उलट राणूआज्याच्या घरातील मानसिकता. राणूजी हा तालुक्यातील बोलका माणूस. जाहीर सभेत हा मधूनच प्रेक्षकांतून उठे आणि भल्याभल्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. आंबेडकरी चळवळीत तालुक्यात हिरीरीनं भाग घ्यायचा. ह्यामुळे असेल कदाचित; पण आपल्या मुलांना शिकवावं ही जिद्द त्याच्यात होती. त्यानं आपल्या मुलाचं नाव रावसाहेब ठेवलेलं. हाच रावसाहेब कसबे म्हणून पुढं नावारूपाला आलेला विचारवंत. नकळत त्यानं आपल्या वडिलांचा हा गुण उचललेला. सध्या संगमनेर कॉलेजात हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे.

राणूजीच्या घरात वंशपरंपरेनं चालत आलेलं देवीचं ठाणं. घरात कुणी देवीला पुजत नव्हतं, पण सणासुदीला गावातील मराठा स्त्रीपुरुष महारवाड्यात देवीच्या पूजेला यायचे. देवापुढं पाटीभर नैवेद्य जमत. रावसाहेबांचा लहानपणचा मजेदार किस्सा आठवतोय. हा त्यावेळी तालुक्याच्या गावी शाळेत जायचा. ह्या वेळी त्याच्या अंगभर
खरूज झालेली. "घरातली देवी कोपल म्हणून तुला खरूज झालीय" असं गावकरी त्याला चिडवीत. मुठीएवढं ते पोरगं. काय मनात आलं कुणास ठाऊक, घेतली कुदळ आणि देवी खणून काढली. शेंदूर लावलेला दगड खोलवर जमिनीत पुरलेला. त्यानं बेभान होऊन तो बाहेर काढला आणि समोरच्या उकिरड्यावर फेकून दिला! सारा गाव तोंडात बोट घालून हा प्रकार पाहत होतं. राणूजी मात्र गालातल्या गालात हसत होता. आता देवी ह्यांच्या घराचं वाटोळं करणार, असं गावकरी कुजबुजत होते. पण आज एवढ्या वर्षांनीही बघतोय, त्या घराची भरभराटच होते आहे, भौतिक नाही, पण ज्ञानवृक्षाची शाखा बहरलीय.
*क्रमशः*

सौजन्य :-
लोकसेवा सार्वजनिक वाचनालय, नागठाणे

10/10/2023

*भाग :- 16*
*पुस्तक :- बलुतं*
*लेखक :- दया पवार*

ह्या संदर्भात माझ्याच गावची महारवाड्यातील एक घटना आठवते. तुला उमा आज्याबद्दल सांगितलं ना? त्याचा बाप कडू ह्या नावाचा होता, अर्थात तो मी पाहणं शक्य नव्हतं. पण कडूबद्दल महारवाड्यातील म्हातारी मंडळी अनेक गमतीदार गोष्टी सांगत. हा कडू उंचीनं अवघा तीन फूट. फेटा बांधायचा. मिश्यांचे आकडे वळलेले. वाजंत्र्यांच्या ताप्यात तो संबळ फारच छान वाजवी. संबळ वाजवीत असला, म्हणजे गावोगाव त्याला पाहण्यास गर्दी व्हायची. एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना एकादा वाजंत्री त्याला सहज खांद्यावर घेऊन जायचा. त्याचाच मुलगा उमा. कडूची बायको मात्र खूपच धिप्पाड. उंच धडंग - एखाद्या पठाणासारखी. ही म्हातारी मात्र मी पाहिलेली. ह्या दोघांचा संसार कसा चालत असेल, हा सर्वांनाच सतावणारा प्रश्न. हा कडू एकदा नातेवाइकांना भेटायला मुंबईला गेला. तिथं चर्चमध्ये जाऊन त्यानं बाप्तिस्मा घेतला, ही बोंब गावापर्यंत आलेली. त्याचं म्हणणं असं की, "मी फक्त पाव खाल्ला.” झालं. भोवतालच्या चाळीस गावच्या महार मंडळींनी कडूला स्वतः शिक्षा देण्याऐवजी आमच्या गावावर म्हणजे महारवाड्यावर बहिष्कार टाकला. ही त्या वेळची रीतच होती. हुक्का, गुडगुडी, सोयरीक संबंध बंद केले. समाजापाशी हे फार मोठं हत्यार होतं. कडूमुळे आपल्या गावावर ही विटंबना आली, म्हणून आमच्या गावातील महार मंडळींनी एका समारंभात चाळीस गावाचे मेहेत्तर जमले हे पाहून त्यांच्यापुढे पदर पसरला. त्यांना प्रायश्चित म्हणून तोंडात निंबाचं पान घ्यावं लागलं. कडूचा गुन्हा महारांनी पदरात घेतला. दंड म्हणून चाळीस गावच्या महारांना भंडारा घालण्याचं मान्य केलं. गावचा भंडारा म्हणजे सर्वांना गुळवणी-पुऱ्यांचं जेवण देणं. हा भंडारा कसा साऱ्या परगण्यात गाजला, त्याचे अनेक किस्से जावजीबुवा रंगात आला म्हणजे मला कथन करायचा.

मला वाटतं, ह्या गोष्टींचाही माझ्यावर बालवयातच खोलवर परिणाम झाला असावा आणि त्यामुळंच पुढं पुढं मी खरातांना टाळू लागलो.

वसतिगृहावर जेवणाची मात्र चंगळ होती. अर्थात, एवढं चांगलं जेवण प्रथमच आयुष्यात मिळत होतं, म्हणूनच चंगळ समजायची. आठ-पंधरा दिवसांनी फीस्ट असायची. फीस्ट म्हणजे नुसता आनंद. लाडू किंवा जिलेबीचं जेवण मिळायचं. मटण मात्र वसतिगृहात मिळायचं नाही. फीस्टच्या वेळी हमखास आई-बहिणींची आठवण व्हायची. आपण इथं मिष्टान्न जेवण जेवत आहोत; घरी मात्र आई-बहिणी वाळलेले भाकरीचे तुकडे चहाबरोबर खात असतील. कालवाकालव व्हायची. बहिणीसाठी एखादा लाडू तांब्यात लपवून ठेवावा असं खूपदा वाटायचं, पण धाडस व्हायचं नाही. फट म्हणता चोरीचा आळ यायचा. पेटी, दप्तर घेऊन घरी जावं लागायचं. आई केव्हा केव्हा वसतिगृहात मोळी विकायला घेऊन यायची. सर्व मुलांसमक्ष मी आईशी बोलत नसे. आई मोळी विकून गेली म्हणजे दूरवर तिच्या मागे पळत जात असे. तिच्याशी चोरून बोलत असे. हे सारं सांगताना मात्र माझी मलाच लाज वाटते. शिक्षणामुळं खरंच का अशी नाळ तुटली जाते ?

वसतिगृहाचा कारभार मात्र चोख होता. लोकल बोर्डाकडून प्रत्येक मुलापाठीमागे बारा रुपये मासिक ग्रँट यायची. बाजारहाट आम्हीच करत असू. व्हाउचर सुपरिटेंडंटकडे देत असू. वर्षाकाठी काही शिल्लक आमच्या नावे उरायची, ती आम्हाला परत दिली जायची. आजच्या जवळजवळ सर्वच वसतिगृहातून ही पद्धत बंद झालेली. सरकारी पैशाला किती ठिकाणी गळती लागते, हे आजचे संचालकच जाणोत.

त्या काळात वसतिगृहात आम्हांला सक्तीनं खादी विणावी लागे. टकळ्यांवर सकाळ-संध्याकाळ सूत कातावं लागे. ठराविक पेळू कातून झाले नाहीत तर जेवण बंद. ह्याच कपड्यांतून आम्हाला खादीचा पायजमा आणि सदराही मिळे. वसतिगृहात सूतकताई तर शाळेत शेतीकाम. वार्षिक परीक्षेला शेतीकामाचे मार्क असत. शाळेच्या अभ्यासापेक्षा ह्याच कामात आमचा वेळ जायचा. शेतीकाम म्हणजे आम्ही शेतात जाऊन कष्ट करीत होतो, असं काही नाही. शेतावर बाकीचे मजूर मोलानं काम करायचे. आम्ही जायचो ते निरीक्षण करायला - झाडाला पानं किती आली आणि फुलं किती ? प्रयोगवहीत त्याचं चित्र काढलं जायचं. शेतीच्या थिअरीसंबंधी ४००-५०० पानांची वही भरलेली. फायनलला मी शेती विषय घेऊन पास झालो. पण पुढे जीवनात सूतकताई काय, शेतकीकाम काय, ह्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. सारंच ज्ञान अर्धवट.

सायकल चालवणं ते काय, पण हे मात्र जिद्दीनं शिकलो. सायकल भाड्यानं घेण्याकरिता पैसे नसायचे. आठवड्याच्या बाजारात ग्रामपंचायतीच्या पावत्या फाडायचो, कमिशन मिळायचं. गंमत वाटायची. आपले पूर्वज कातडी फाडीत, तर आपण पावत्या ! तसंच पोहणं, बोर्डिंगच्या पाठीमागे प्रवरेला फार मोठा डोह होता. तिथं पाण्याचा रंग काळाभोर. दुपारी हमखास तिथं पोहायला जायचो. गावच्या वरच्या बाजूला हा डोह. पोहताना वाटायचं, आपण इथं आंघोळ केलेली चालते; पण महारवाड्याचा पाणवठा मात्र सर्वांच्या खाली. आपण आंघोळ केल्यामुळं खालचे सारेच सवर्ण बाटत असतील, नाही? कोळ्यांची मुलं सरसर डोह पार करायची. आपल्याला मात्र हे कधीच जमलं नाही. काठालाच आपण डुबुक डुबुक करायचो. बराच काळ हा अक्राळविक्राळ जबडा वासलेला डोह अंगाचा थरकाप करायचा. शेवटी नादच सोडला.

नदीवरून एक आठवण उभारून आलीय. नदीच्या वाहत्या पाण्यातून कपड्यात बांधलेलं गाठोडं वाहत चाललेलं. ते सुपात ठेवलेलं. एक मुलगा पाण्यातून सपासप हात मारत जातो आणि गाठोडं किनाऱ्याला आणतो. सोडून बघतो. तो मोठ्यानं किंचाळतो.. आम्ही सारे भोवती जमलेलो. गाठोड्यात नुकतंच जन्माला आलेलं मूल असतं. खरं म्हणजे तो आधुनिक कर्णच. गावात बातमी जाते. घटनास्थळी पोलिस येतात. पंचनामा होतो. नदीच्या वरच्या बाजूला जेवढी घरं असतात, तिथं 'कुंती'चा शोध घेतला जातो. शेवटी पिवळी पडलेली एक गोरीपान कुमारिका पकडली जाते. तिची डॉक्टरी तपासणी होते. बाजाररस्ता ते कचेरी अशी तिची धिंड निघालेली. पाठीमागून हुर्यो करणारं पब्लिक. पुढं तिला शिक्षा झाली म्हणतात.

अशा दैनंदिन घटनांचाही मनावर खोल परिणाम व्हायचा. बाकीच्या मुलांच्या मानानं त्या वयातही मी जादा मनस्वी होत चाललेलो. भोवताली घडणाऱ्या व्यवहाराचं आकलन व्हायचं नाही; पण आपली प्रचंड घुसमट होते आहे हे जाणवायचं. मराठीच्या तासाला खूपच तन्मय होऊन कविता ऐकायचो. खांडगे नावाचे मराठीचे शिक्षक होते. ते कविता शिकवताना देहभान विसरायचे. कविता गोड गळ्यानं गाऊनही दाखवायचे. एखादे वेळी मी भावनाविवश व्हायचो. आतल्या आत हुंदके फुटायचे. टिळकांची 'केवढे हे क्रौर्य ?' ही कविता, कुसुमाग्रजांची 'अहि-नकुल' किंवा 'जमीन- आगगाडी' ह्या कविता विशेष आवडायच्या. एकांतात तारसप्तकात गायचो. एकाच वेळी विद्रोह आणि वेदना ह्यांचा मनात कल्लोळ उठायचा. बोर्डिंगमधील भीषण वास्तवात ह्या कविता बहुधा किंचित रिलीफ देत असाव्यात.

बोर्डिंगच्या मुलांना खरा हिसका दाखवला तो तुकाराम शिरकांड्यानं. त्याची शाळेतली पहिली एंट्री आठवते. धोतर, डोक्याला जरीचा पटका, अंगात नवा कोरा कोट, त्यावर हळदीचे डाग तसेच. त्याच वर्षी लग्न झालेले. त्याच्या पेहेरावाकडे पाहूनच वर्गात हास्याची कारंजी उडालेली. बोर्डिंगमधील परवड सांगतो. तो पहिल्याच दिवशी जेवणाच्या हॉलमध्ये जातो, तो कोळ्याच्या मुलांच्या मांडीला मांडी लावून ऐटीत बसतो. बोर्डिंगमध्ये खळबळ उडते. तसा तो हाडापेरानं मजबूत असतो. त्याची नजरच आव्हान देत असते. झालेल्या प्रकाराकडे मी मोठ्या आश्चर्याने पाहतो. तो माझ्याकडे पाहून मिस्किलपणे हसतो. त्या दिवशी तुकाराम बाजी मारतो. मी विचार करू लागतो, खरंच तुकारामासारखं आपल्याला धाडस का बरं झालं नाही? आपल्या बुळेपणाची लाज वाटते. तुकारामाच्या धारिष्टाची आज संगती लावू शकतो. त्याचे वडील मुंबईला टांकसाळीत कामाला असतात. म्हाताऱ्यानं गावी जमीनजुमला घेऊन ठेवलेला. तुकारामाला बोर्डिंगच्या गोळाभर अन्नाची का बरं मातब्बरी वाटावी! आपल्यासारखा तो काही बाहेर पडला म्हणजे अळीसारखा वळवळणारा नव्हता. तुकाराम आपल्या आडनावाचा उल्लेख श्रीखंडे असा करायचा. शिरकांडे हे आडनाव त्याला आवडायचं नाही. त्या नावामुळं आपली जात जाहीर होते, असा त्याचा युक्तिवाद असे.

तुकारामाची सारी गंमत असे. शाळेला आठवड्याची सुट्टी पडली म्हणजे तो स्वतःच्या गावाला पळायचा. तिथं नुकतीच वयात आलेली त्याची बायको त्याची वाट पाहत असायची. परत आला, म्हणजे त्याच्या बायकोच्या कथा-सारं साग्रसंगीत कथन करायचा. कधीकधी त्याचा बाप मुंबईहून यायचा. त्याला नवीन कपडे, मिठाई देऊन जायचा. पुढं कुठल्या तरी वर्षी तुकाराम नापास झालेला. त्याच्या बापानं माझ्याकडे तक्रार केली, "अरे, हा एकाही परीक्षेत पास झाला नाही... घरी तरी त्याला कुत्रं- मांजर व्हावं की नाही?" मुलगा परीक्षेत नापास झाल्यापेक्षा आपल्याला नातू झाला नाही ह्याचंच जादा दुःख त्याच्या चेहऱ्यावर तरळलेलं. बापलेकांचं खूपच हसू यायचं.

सणासुदीला मामाच्या गावी औरंगपूरला जायचो. ते तालुक्याच्या गावापासून दोन मैलांवर होतं. जाताना रस्त्याला दोन्ही बाजूंना वडांची गर्द सावली. रमतगमत जायचो. रस्ता सोडला आणि पांदीनं चालू लागलो म्हणजे भोवताली शेतकऱ्याचे लगडलेले मळे लागायचे. मोटेच्या चाकाचा कुईकुई आवाज. मध्येच रस्त्यानं तहान लागली, तरी विहिरीवर जाऊन पाणी पिण्याचं धाडस व्हायचं नाही. माझ्या स्वतःच्या गावापेक्षा औरंगपूर मात्र खूपच आवडायचं. सारी घरं ओळीत. महारवाडाही कमालीचा स्वच्छ. हे गाव औरंगजेब बादशहानं पाटलाच्या विधवा सुनेला चोळीबांगडी म्हणून दान दिलेलं, अशा खूप आख्यायिका ऐकायला मिळत. मामाचं घर मात्र तसं खूपच लहान. आत जाताना उंबऱ्याची चौकट लागायची. कौलांच्या खाली किती तरी काळापूर्वी घातलेलं वमान. त्याचे काळपट पुंजके अंगावर पडायचे. मामाच्या घराच्या समोरच त्याच्या मूळच्या घराचे पडलेले अवशेष दिसायचे. हे घर शापित, म्हणून तिथं ते नवं घर बांधीत नाहीत. उलट, ते खोपीसारखं घर पसंत करीत. पडक्या घराबद्दल त्यांच्या घरात खूपच गोष्टी चालत. तिथं भुजंग फिरतोय, हीही अशीच एक गोष्ट. त्या घराच्या खाली मात्र मोठं डबोलं आहे आणि ते तुझ्या आजोबानं ठेवलंय, असं मला नेहमीच सांगितलं जायचं. हे आजोबा म्हणजे म्हणजे माझ्या आईचे वडील. लहान असताना ते मरण पावले होते. हे आजोबा दरोडेखोरांच्या, भिल्लांच्या टोळीत होते, त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी खूपच माया जमविली होती, आणि ती त्यांनी त्या समोरच्या पडिक घरात खाली खोलवर पुरलीय, असं मामा-आजी सांगत. रात्री झोपलो म्हणजे फिरणाऱ्या भुजंगाचं स्वप्न पडायचं. आजोबानं लपवलेल्या डबोल्याच्या आकर्षणापेक्षा त्यानं लपवलेल्या बंदुकीचं आणि तलवारींचं खूपच आकर्षण वाटायचं. झोपेत ह्या वस्तू माझ्या हातात यायच्या. बोर्डिंगच्या कोळी मुलांबरोबर तुंबळ युद्ध करतोय, त्यांत आपला जय होतोय, असंच स्वप्न पडायचं.
*क्रमशः*

सौजन्य :-
लोकसेवा सार्वजनिक वाचनालय, नागठाणे

10/10/2023

*भाग :- 15*
*पुस्तक :- बलुतं*
*लेखक :- दया पवार*

तसं अनेकदा मी आईबरोबर ढग्या डोंगरावर जायचो. त्याची नकटी पायरी चढणं म्हणजे दिव्यच. ढग्या डोंगरावरून दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात यायचा. लांबवर कळसूबाई दिसायची, तर मुळेची धार चांदीच्या रसासारखी लकाकायची. पण ह्या सृष्टि-सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा झाडाची करवंदं तोडून खाण्यातच आम्हाला रस होता.

रात्रीच्या वेळी घरातूनही डोंगराला वणवा लागलेला दिसायचा. अंधारात सरकणारी जळती रेघ. ह्यातील सौंदर्यापेक्षा दुसरेच प्रश्न मला सतावायचे... आता सकाळीच फॉरेस्ट-शिपाई येऊन ठाकरांना धारेवर धरतील; "वणवा तुम्हीच लावला" म्हणून गुन्हा नोंदवतील... उभी झाडं तोडण्यापेक्षा जळालेली लाकडं घेणं हा तसा गुन्हा नव्हता. ठाकर मंडळीच झाडांना वणवा लावतात, जळती लाकडं मिळावीत म्हणून ते ही युक्ती करतात, असाच शिपायांचा समज होता. पण ठाकर हे फारच भाबडे. त्यांना फक्त चार आण्यांचं नाणं ओळखता यायचं. मोळीचा कुणी रुपया दिला, तरी घ्यायचे नाहीत. "व्हते चारी आणे" अशीच साद घालायचे. असे भाबडे ठाकर वणवा पेटवीत असतील ह्यावर विश्वास बसायचा नाही.

ठाकरवाडीत मी केव्हा केव्हा जात असे. घराजवळ आमची थोडीशी शेती होती. आईनं ती जिवापलीकडे जपलेली. रंडकीच्या जमिनी घशात घालणं हा भाऊबंदांचा खेळ. पण आईनं डोळ्यांत तेल घालून तुकड्याचा सांभाळ केलेला. आई गावच्या मराठ्यालासुद्धा जमीन वाट्याने लावत नसे. एक तर मराठा शेतकरी फारच लोभी. “इथं तुहा बाप मेला, इथं तुही आय मेली" म्हणून सारं उत्पन्न हडप करायचा. एक-दोन पायल्या दिल्या तरी मेहेरबानी. पेरणीच्या वेळी वापरलेलं बी-बियाणंही तो सुगीत कापून घेत असे, त्यामुळं आई नेहमीच ठाकराकडे जमीन वाट्यानं लावी. आमचा सरकती ठाकर कमालीचा प्रामाणिक माणूस. सुगीत धान्य झालं म्हणजे घरी म्हारवाड्यात ओझं डोक्यावरून घेऊन यायचा. कडधान्याचा वानवळा आणायला विसरायचा नाही. काही कामानिमित्तानं खळ्यावर मी जायचो. घरापाशीच ठाकरवाडीत त्याचं खळं असायचं. ठाकरवाडी लक्षात राहिली ती तिथल्या कमालीच्या स्वच्छतेमुळं. त्यांची घरं तशी छोटीच; पण खूपच सुबक, वर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या. भिंती लाल मातीनं सारवलेल्या. त्यावर चुन्यानं रंगीबेरंगी नक्षी काढलेली. अंगणही स्वच्छ सारवलेलं. पाण्याचा तांब्याही घासूनपुसून लखलखीत. महारवाड्यात अशी स्वच्छता कधी दिसायची नाही.

स्वच्छता टापटीप सोडली, तर त्यांच्यात अज्ञान भयानक. शाळेत मुलं शिकायला पाठवत नसत. शेरडं-मेंढरं वळायला जात. गावात देवीचा डॉक्टर आला, म्हणजे एखाद्या घरात मूल जन्मलं असेल, तर भीतीनं ते त्याला रानात पळवून नेत. तशी खूपच सोशिक जमात. स्वत: होऊन कुणाची कागाळी काढत नसत.

एका गोष्टीची मात्र मला ठाकरांची चीड यायची. तसे ठाकर हे आदिवासीच; स्वत:ला महादेवाचे वंशज समजत. आम्हा मंडळींचा त्यांना बाट लागे. पाणीही वरून
पाजायचे. चटणी-भाकरी द्यायची असेल तर तीही वरूनच. ठाकरांच्या व्यवहारात जातीयता आली कशी, हाही प्रश्नच आहे. त्यांनी गावातील मराठ्यांचं तर अनुकरण केलं नसावं ना!

गावात जातीयतेच्या इंगळ्या डसलेल्या. ठाकरांनाही विटाळ पाळावा, हा कळसच. शहरात हा जाच नव्हता, असं दिसतं.

हेही काही तितकंसं खरं नाही. शाळेतील मित्र बदलले होते, याचा अर्थ तालुक्याच्या गावी बदल होत होता, असंही काही नाही. हॉटेलबाहेर प्रथम अस्पृश्यांकरता वेगळा कप पाहिला तो तालुक्याच्याच गावी. हा कप कोणत्या साली गेला, हे काही सांगता येत नाही; पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो काही वर्ष होता, एवढं मात्र नक्की आठवतंय. कायदा झाला होता; पण कुणाला धाडसच होत नव्हतं. तालुक्याच्याच गावच्या एका मांगानं धाडस केलं. त्याचा कित्ता बाकीच्या अस्पृश्यांनी गिरवला. मालकांनी किंवा गावातील मंडळींनी विशेष खळखळ केली नाही. हे जसं कपाचं, तसं न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेणं हे आम्हा पोरांना खूपच दिव्य वाटायचं. एकदा मात्र दुकानात जाऊन केस कापावयास जाण्याचं धाडस केलं. दुकानदारानं कसं ओळखलं कुणास ठाऊक? त्याला आपल्या चेहऱ्यावरील जात तर वाचता येत नसावी ना, या शंकेनं हैराण झालो. कान पाडलेल्या गधडीनं मागं परतावं तसा परतलो. आम्ही, शाळेत जाणारी मुलं सुदामबुवाकडून केस कापून घेत असू. पण तालुक्याच्या गावी शाळेत गेलो म्हणजे हे केस फारच बेंगरूळ दिसत. तालुक्याच्या गावी महारवाड्यात जाऊन पुढं आम्ही रामजी ह्या माणसाकडे जाऊन केस कापून घ्यायचो. दुधाची तहान ताकावर भागविण्याचा तो प्रकार. दुकानात केस कापतात एवढं ते स्किल्ड वर्क नसायचं. पुढं पुढं दुकानातही आमचे केस कापू लागले. पण आत जाताना मात्र बराच काळ काळीज धडधडत असायचं. शहरात केस जरी सर्रास कापले जायचे, तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार- चांभारांचे केस कापायचा नाही. वाटायचं, खुशाल म्हशी भादरतो, पण म्हशीपेक्षाही आमची किंमत जादा नसावी ना? आपलं गावचं गिऱ्हाईक तुटेल ह्या भीतीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करीत नसावा.

ह्याच दरम्यान माझ्या जीवनात एक महत्त्वाचा बदल झाला. पाचवीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो होतो. पुढं शिकावं ही दुर्दम्य इच्छा होतीच. शाळेत सोनवणे नावाचे एक जातीचेच मास्तर होते. त्यांचं माझ्या प्रगतीकडे चांगलं लक्ष होतं. त्यांनी एकदा माझ्याकडून 'तालुक्यात असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळावा' असा अर्ज लिहून घेतला होता. खरं म्हणजे, तो अर्ज तसा मी विसरूनच गेलो होतो. मी परीक्षा पास होतो आणि वसतिगृहात प्रवेश दिल्याचं पत्र अहमदनगर येथील लोकल बोर्डाच्या ऑफिसातून येऊन थडकतं. मला खूपच आनंद होतो. एक तर त्यामुळं, आईचं ओझं थोडंफार हलकं होणार असतं. साचलेल्या पाण्याचा ओघ अचानक कुणी
तरी वळवावा, तसं वाटतं.

तालुक्यात ज्या मैदानात आठवड्याचा बाजार भरायचा, तिथे हे मुलांचं वसतिगृह होतं. लांबच लांब, पांढऱ्या रंगाची इमारत. वर चिंचोळी कौलं. भोवताली तारेचं कंपाउंड. इमारतीपासून जवळच मुलांच्या जेवणा हॉल. मुलांना आंघोळ करण्यासाठी प्रशस्त विहीर. गावातल्या शाळेत जायचं आणि वसतिगृहात मुक्काम करायचा. तिथे मोफत जेवणाची सोय. यापेक्षा मला वेगळं काय हवं होतं? स्वर्गाची कल्पनाही बहुधा अशीच असावी.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वसतिगृहात माझ्या पुढ्यात काय ताट वाढून ठेवलंय याची किंचितही कल्पना आली नाही. वसतिगृह तसं कोळ्यांच्या मुलाचं म्हणून प्रसिद्ध. डांग भागातील सारीच महादेव कोळी मुलं. ह्या मुलांव्यतिरिक्त मीच पहिला महार विद्यार्थी वसतिगृहात आलेला. जातीचा अहंकार- मग तो कितीही खालच्या तळातील असो - हा केवढा मोठा असू शकतो, आणि त्यामुळे आयुष्यभर डसणाऱ्या इंगळ्या तिथं कशा भेटल्या, हे आठवलं म्हणजे आजही अंगाचा थरकाप होतो.

पहिल्याच दिवशी टोळ्याटोळ्यांनी मुलं जमून माझ्याकडे पाहत कुजबूज करू लागली. माझी ज्या खोलीत वर्णी लागली होती, तिथं वरच्या वर्गातील, थोराड शरीराचा एक लंगडा मुलगा होता. त्याला दाढी-मिश्या आलेल्या. त्यानं मला दमात घेतलं, “तू आमच्या पंगतीत बसू शकत नाहीस. हॉलच्या दरवाज्याजवळ बसावं लागेल !” बाकीच्या मुलांनीही त्याचीच री ओढली. तो बहुधा सर्वांचा नेता असावा. मला तर तो तैमूरलंगच भासला. आजवर तसे मी खूपच बरेवाईट अनुभव पचवलेले; पण त्या दिवसाचा डंख आजही विसरू शकत नाही. पुस्तकाची संगत जडल्यामुळं माझं मूळचं संवेदनाक्षम मन हे जादाच संवेदनाशील झालेलं. तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. बोर्डिंग सुपरिटेंडंटही त्यांचाच जातवाला. तांब्या-भांडं घासून, लखलखीत करून जेवणाच्या हॉलकडे गेलो, तेव्हा त्यांनीही समज दिली, "हे बघ, तू महाराचा आहेस. पुढं हॉलमध्ये सरकलास तर तुझा चेंदामेंदा होईल." मी गुपचूप हॉलच्या दरवाज्यापाशी बसतो. थोडं अंतर ठेवण्यास मी विसरलो नव्हतो. मी पंगतीतल्या मुलांकडे बघतो. सारी माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघतात. "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे" ही मुलांच्या तोंडातील प्रार्थना मला आणखीनच डागण्या देते.

खरं म्हणजे हा अपमान मी निमूटपणं सहन करायला नको होता. मी एकदा जरी धाडस दाखवलं असतं, तर साऱ्यांचा विरोध कोलमडला असता.

विद्रोही कविता लिहिणं तसं पाहता सोपं. स्वत:वर बेतलं म्हणजे कळतं. मी स्वाभिमानशून्य जगलो, याचा आज मला विषाद वाटतो हे मात्र खरं. पण तेव्हा वाटायचं, खरंच आपल्याला ताठ कणा नाही काय? सालं, आपण एवढे भित्रे कसे? ही भीती आपल्याला कुणी दिली? एखादं रस्त्यात सरपटणारं जिवाणू असावं आणि येताजात पोरांनी त्याला काठीनं डिवचावं, जिवाणूनं साधा फूत्कारही टाकू नये, असं आयुष्य होतं. कधीकधी वाटायचं, घासभर गोळ्यासाठी आपण किती लाचार! स्वतःच्या हिमतीवर का बरं शिकलो नाही? हातात ताट आणि तांब्या घेऊन मी हॉलबाहेर पडत असे, तेव्हा जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या कैद्यासारखं वाटायचं... पायात लोखंडी साखळदंड आहेत. साखळदंडाचा खुळम् खुळम् आवाज होतोय... दूरवर बघायचो. निळंभोर, भव्य आकाश पसरलेलं दिसायचं. वाटायचं, खरंच का कधीकाळी आपल्याला ह्या आकाशात स्वैर उंच भरारी मारता यायची नाही ?

वसतिगृहात दर शनिवारी मारुतीचं स्तोत्र व्हायचं. सोबत भजन. 'वैष्णव जन तो तेणे कहिये, पर पीडा जो जाणे रे' हे गांधीजींचं आवडतं भजन तिथंच प्रथम ऐकलं. माझा आवाज तसा चांगला. एकांतात असलो, म्हणजे मनसोक्त गायचो. वसतिगृहात भजनं म्हणायला मी सर्वांच्या पुढं. बाकीची कोळ्यांची मुलं मागून साथ करीत. प्रसाद वाटताना प्रसादाचं खोबऱ्याचं ताट मात्र माझ्या हाती केव्हाच दिलं जायचं नाही. हा अपमान थुंकी गिळतात तसा गिळून टाकायचो. अशा वेळी हमखास महारोगानं सडलेल्या गावच्या हरीच्या बापाची आठवण यायची. मी माझ्याच हाताकडं पाहायचो. आपल्या हाताला रक्तपिती तर फुटली नाही ना? जोरात किंचाळावंसं वाटायचं. तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात तो हाच काय? 'गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. खरंच, कशाला झाली पुस्तकांशी ओळख ? बरा ओहोळाचा गोटा...' त्यावेळी थोडं फार असंच वाटत होतं.

ह्या जखमेवर थोडीशी फुंकर मिळाली, ती खरात पाळक यांच्यामुळे. हे एक ख्रिस्ती धर्माचे प्रचारक होते. गोरेपान. त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मित. मोठं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. बहुधा एका काळचे ते महार असावेत. कारण महारी भाषेतल्या अनेक लकबा त्यांच्या बोलण्यात डोकावत. प्रॉटेस्टंट असल्यामुळे फादरसारखा त्यांना झगा घालावा लागत नसे. संसार थाटूनच ते धर्मकार्य करीत असत. नदीकाठी एका टेकडीवर त्यांच्या राहत्या घरापाशी एक छोटं चर्च होतं. तिथं ते छान आवाजात प्रभूची भजनं म्हणत पेटी वाजवीत, का कुणास ठाऊक, पण वाकडी वाट करून ते वसतिगृहावर मला येऊन भेटत. खूपच आपुलकीनं वागत. हा अनुभव मला नवा होता. त्यांच्याबरोबर एकदा-दोनदा चर्चमध्येही गेलो होतो. पुढं जेव्हा संगमनेरला शिकायला गेलो, तेव्हाही त्यांची भेट होत असे. हिंदू धर्माबद्दल, आठवतं, तसं कधीच प्रेम नव्हतं. ह्या धर्मात हा भेदभाव दिसायचा नाही. खरातांनी मात्र आपल्याला केव्हाच 'धर्म सोड' असं सांगितलं नव्हतं. त्यामुळं असेल कदाचित, पण त्यांच्या धर्माबद्दल आपल्या मनात ओलावा निर्माण झाला होता. आज विचार करतोय, खरंच, का बरं आपण ख्रिस्ती झालो नाही? नाही तर ज्या जिल्ह्यात मी होतो, तिथं तर जवळ जवळ फार मोठ्या संख्येनं अस्पृश्य मंडळी ख्रिश्चन झालेली. आपल्या तालुक्यात मात्र कुणीच ख्रिश्चन झालं नव्हतं.
*क्रमशः*

सौजन्य :-
लोकसेवा सार्वजनिक वाचनालय, नागठाणे

08/10/2023

*भाग :- 14*
*पुस्तक :- बलुतं*
*लेखक :- दया पवार*

हरीला दोन भाऊं होते. थोरला दामू आणि धाकटा भावक्या. ह्या तीन भावांपैकी फक्त हरीलाच कसा महारोग चिकटला, ह्या विचारानं तसा मी बराच काळ हैराण. दामू लक्षात राहिला तो वेगळ्याच कारणामुळं. महारोग्यांची पोरं म्हणून त्यांना भोवताली ओळखलं जायचं. तेव्हा त्याच्या लग्नाचा तसा बिकट प्रश्न. ह्या घरात कुणीही जातवाला आपली लेक बाळ देण्यास धजावत नसे. दामूला कुणी 'दामू' म्हणून हाक मारलेली आठवत नाही. सारे त्याला दाम्याच म्हणत. हा दाम्या तसा अंगापिंडानं वयात आलेला. शरीरातील घुसमटलेली वासना बहुधा त्याला छळत असावी. हा राहायचाही घाणेरडा. हातावर थुंकून दोन्ही तळहातावर घासणे ही त्याची लकब. पाहणाऱ्याला ह्या कृत्याची किळस यायची. हरी गावकऱ्यांची गुरं राखोळीला घेऊन जायचा. तर हा दाम्या गावच्या घोड्या वळायचा. तालेवार असामी आवडीनं घोडे पाळीत. त्यात घोडीच जादा पसंत. आमच्या लहानपणी गावातल्या बामणाची घोडी खूप प्रसिद्ध. बामण तिला अंधारी द्यायचा म्हणतात. काळीजर्द - अंगावर माशी बसू द्यायची नाही. बामण तिला दारू, अंडी पाजतो, असा प्रवाद होता. एकदा निघाली की, रस्त्यात थरकायची. गोरापान बामण हातात छडी घेऊन तिच्यावरून वाऱ्यासारखा जाताना दिसे. बामणाच्या घोडीशी स्पर्धा करण्याकरिता पाटील मंडळीही घोडी पाळत. ह्याच दोन-चार घोड्या घेऊन दाम्या त्यांना धोंडाळीवर चरायला घेऊन जायचा. ह्या पैकी एका घोडीवर बसण्याचा मी लहानपणी प्रयत्न केलेला. कळवा सोडून त्यांचा लगाम करण्याचं मला हरीनं शिकवलेलं असतं. पण घोडीच्या पाठीमागे उभा राहिलो आणि घोडीनं मागच्या लाथा अशा काही झाडल्या की आईचं दूधच आठवलं; दूरवर फेकला गेला होतो.

दामूच्या लैंगिक विकृतीची ही घटना, तर दुसऱ्या टोकाला सीताची घटना. वासना आतल्या आत कोंडल्यामुळं तिची हिस्टेरियाची भयानक केस झालेली. अर्थात त्या काळी हिस्टेरिया हा काय प्रकार होता, हे समजत नव्हतं म्हणा. पण सीताला नवऱ्यानं सोडलं आणि तिला वेडाचे झटके येऊ लागले. तरुण वयात आलेली पोरं पाहिली की सीता बेभान व्हायची. लैंगिक हावभाव करायची; चक्क लुगडं फेडायची आणि रानोमाळ पळायची. तिचे नातेवाईक तिला घरात कोंडून ठेवत. तिच्या नवऱ्यानं मुंबईला दुसरी आऊ ठेवलीय आणि सीताला तो नांदवायला नेणार नाही, हे जसं सीताला समजलं तसं तिचं वेड जास्तच झालं. गावानं काय करावं? चक्क तिला डाव देण्याकरिता साखळदंडांनी मारूतीच्या देवळापुढं बांधून आणलं. स्त्रियांनी नागडं फिरणं म्हणजे त्यांच्या इभ्रतीला तो डागच होता. तिला वेडाचा झटका आला म्हणजे एक-दोन पुरुषांनाही ती सहज हेलपाटत असे. डाव देण्याचा प्रकार म्हणजे खूपच अमानुष. आठवला की अजूनही अंगावर सर्रकन् काटा उभा राहतो. गावात एक म्हातारा माणूस डाव देण्याकरता प्रसिद्ध होता. लांबलांबचे लोक त्याला डाव देण्याकरता आमंत्रण देत. फाशीचा दोर ओढणारा एखादा शेवाळलेल्या काळजाचा माणूस असावा, तसा तो मला दिसायचा. डाव देताना वेड्या माणसाच्या बाजूलाच खैराच्या लाकडाची धुनी पेटवली जायची. त्यात लोखंडी सळ्या लालजर्द तापविल्या जात. डाव देणारा हातात पेटती सळई घेऊन उत्साहानं पुढं सरसावयाचा. डाव कसे देतात हे बघण्यासाठी भोवताली गर्दी जमलेली. ह्याच गर्दीत मीही श्वास कोंडून उभा. सीताला जेव्हा माथ्याला, दोन्ही कानाजवळ, आखाळ्यांना आणि पायाला घोट्याजवळ डाव दिले गेले, तेव्हा तिनं आकाशभर मारलेल्या किंकाळ्या अजूनही आठवतात. पैशाएवढ्या जखमा झाल्या. डाव दिल्यावर एरंडाच्या पानांवर तूप लावून जखमेवर थंडावा देण्यास मात्र ते विसरले नव्हते. एवढं होऊनही सीताचं वेड गेलेलं नसतं. ती जादाच वेडी होते. सीतासारखे डाव शंकरला का बरं देत नाहीत, याचंही कोडं वाटायचं.

मी पाहिलेलं खेड्यातील नीतिशास्त्र वेगळंच होतं. महारवाड्यातील काही तरुण श्रीमंत शेतकऱ्यांकडे सालानं होते. अशा वेळी त्यांचा मराठा बायांशी हमखास संबंध यायचा. ह्या स्त्रिया त्यांचा उपभोग घेत; पण त्यांना पाणी वाढताना किंवा भाकरी देताना वरून देत. त्या स्त्रियाही त्यांचा बाट धरीत, ह्या प्रकरणाची गंमत वाटायची.

न्यायनिवाड्यावरून आठवलं. त्या घटनेला मी साक्षी होतो. जे पाहिलं, ऐकलं, त्याचा माझ्या मनावर अजूनही खोलवर परिणाम झालेला. पांढरपेशा समाजाच्या नीतीच्या कल्पना म्हणजे, बाहेर वास उडू देऊ नये. अशामुळे चार भिंतींच्या आत एखादी घटना झाली, तर ती आतल्या आत बुझली जाते. तिचा समाजात ब्रभा होत नाही. पण महार समाजात एखाद्याच्या घरात असं काही झालं तर प्रथम घरातील सासूच अंगणात उभी राहायची. महारवाड्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात गर्जायची, "काय गं, सटवे! कुठं शेण खायला गेली होतीस?"

त्या वेळीही अशीच एक चमत्कारिक घटना महारवाड्यात झालेली. सुनेनं काही वाईट प्रकार केलाय असं नव्हतं. त्या घटनेत सासराच सुनेच्या अंथरुणावर गेलेला. सून खूप नेकीची असते. नवरा नोकरीनिमित्त मुंबईला. मुंबईला राहावयास घर मिळत नाही. त्यामुळं नुकतंच लग्न झालेल्या बायकोला तो मुंबईला नेऊ शकत नव्हता. सासरा विधुर. चारचौघांत बसणारा-उठणारा. ज्या रात्री सासरा अंथरुणावर येतो, त्याच रात्री सून बोंब मारून उठलेली. सकाळीच स्वतःच्या माहेराला निरोप पाठवते. नवऱ्याला तार करून बोलावलं जातं. सारी मंडळी त्याचा निवाडा करायला पारावार बसलेली. महारवाड्यातील कर्त्या जावजीबुवानं विषयास तोंड फोडलेलं. ह्या गोष्टीचा निर्णय काय लागतो, म्हणून भाऊबंद जमा झालेले. जावजीबुवानं सांगितलेली गोष्ट अजूनही आठवतेय. जावजी सांगतो,

"एक राजा असतो. त्यानं दरबारात एका रुमालात गारगोटी बांधून आणलेली. दरबारात सारे सरदार- पंडित उपस्थित. तो सांगत असतो. 'बघा हो! गारगोटी किती बिलबिलीत!' सारे गार चाचपून माना डोलावतात. एक चतुर माणूस निर्भयतेनं म्हणतो, 'महाराज, गारगोटी नाही बिलबिलीत, भीड बिलबिलीत!' "

त्यावर जावजीबुवा सर्वांच्या तोंडाकडं पाहतो. आपण प्रश्नांची दांडी पाडलीय, असा जावजींचा समज असतो. पण नवरामुलगा हा प्रश्न वेगळ्याच पद्धतीने हाताळतो. तो म्हणतो,

"ही मी जी बायको केली आहे, ती माझ्यात आणि बापात समाईक केली आहे.मी काही म्हाताऱ्या बापाला दुखावणार नाही. पायजे असेल तर सासऱ्यानं मुलगी घेऊन जावी."

ह्या उत्तरानं सारेच दिपून जातात. पुढं काय बोलावं ते कुणालाच सुचत नाही. आपण न्यायनिवाडा करू असं जे पंचांना वाटतं, ते त्या दिवशी हिरमुसतात. सासरा काय समजायचं ते समजतो. मी मात्र दिलेल्या निर्णयामुळं अंतर्मुख होतो; शेवटी अशा प्रश्नाकडे पाहण्याचा हाही एक दृष्टिकोण असू शकतो. त्या दिवशी त्या माणसानं असा जगावेगळा निर्णय कसा बरं दिला, हे धारिष्ट त्यानं कसं बरं मिळवलं, हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ सतावत राहिला, हे मात्र खरं.

मेहेत्तरांवर खजील होण्याचा प्रसंग तसा अनेकदा यायचा. आता सुदामबुवांचंच बघा ना. येसकर - पाळी बंद, असं जरी ठरलं गेलं, तरी सुदामबुवा गावात जाऊन पीठ मागायचा. झ्याट कुणाचं ऐकायचा नाही. म्हणायचा, “मग पोसा मला आणि माझ्या बायकोला !” सुदामबुवा म्हणजे महारवाड्यातील वल्ली होती. त्याच्या एका हाती चिपळ्या आणि दुसऱ्या हाती तंबोरा. तो गावात जाऊन एकतारीवर भजनं म्हणायचा. सुदामबुवाला मूठ मूठ पीठ मिळायचं. त्याचा पेहरावही तसा गमतीदार. डोक्याला लाल पागोटं, कपाळाला शेंदराचा टिळा, गळ्यात विठोबाची माळ. वशाट खाताना ती तो माळ घटकाभर खुंटीला लटकावून ठेवायचा. त्याचा अंगात बाहीजवळ फाटलेला जुना पुराणा कोट. कोटाच्या आतल्या खिशात 'मावशी' असायची. मावशी म्हणजे चिंध्यांची बाहुली. तिच्या पायात घुंगूर बांधलेले. डोक्याला केसांचा बुचडा. ही मावशी त्याला काही कमी पडू द्यायची नाही. सुदामबुवाला म्हातारपणापर्यंत काही मूलबाळ झालं नाही. लोक म्हणायचे, “याचा वंसबूड होणार!" त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःख नसायचं. सारखं चेहऱ्यावर चैतन्य खेळायचं. स्वतःचा वंसबूड व्हायला आला; पण वांझोट्या बायांना मुलं देतो; म्हणून भोवतालच्या भागात त्याची प्रसिद्धी. त्यामुळं त्याच्याभोवती नेहमी बायकांचा घोळका. सुदामबुवाजवळ भानामती होती. आज सत्यसाईबाबा हातातून उदी काढतो म्हणून कोण कौतुक! सुदामबुवा हातातून शेंदूर काढायचा. प्रथम हवेत स्वच्छ मोकळे हात दाखवायचा. तुम्हाला तुमचा तळहात पुढे करायला सांगायचा. दोन्ही तळहात एकमेकांवर घासले म्हणजे तळहातांवर शेंदूर पडायचा. खुशीत असला म्हणजे आपल्या वयाच्या पोरासोराच्याही हातावर शेंदूर पाडायचा.

त्याच्या 'मावशी'वरून आठवलं. ह्या मावशीचा प्रताप मी लहानपणी डोळ्यांनी पाहिला. ह्या मावशीबरोबर तो संवाद करायचा. तिला साकडं घालायचा. वडील असताना वडिलांच ताप्यात हा सूर वाजवायचा. असंच एकदा ठाकरांच्या लग्नाची सुपारी मिळालेली. ताप्याबरोबर मीही गेलेलो. मला खूपच भूक लागलेली. लग्न लागल्यावर मध्यरात्री वाजंत्र्याला लापशी किंवा भात मिळायचा होता. तोपर्यंत भुकेनं मी रडकुंडीला आलेलो. ह्या दरम्यान एक बाई सुदाम्याकडे गंडादोरा मागायला आलेली. पोर झालं नाही तर तिचा नवरा सवत आणणार होता. सुदामबुवानं शक्कल लढविली. "समोरच्या आंब्याच्या झाडाखाली बारा अंड्यांची चाणकी, तुपातले बारा परोठे नेऊन ठेव. मावशीचा हा उतारा आहे. तुला मावशी नक्की पावेल!" असं म्हणून तिच्या डोक्यावरून मावशी उतरतो. बाई जाते आणि काही वेळानं उतारा घेऊन येते. आम्ही त्यापूर्वीच जवळपास लपून बसलेलो. बाई उतारा ठेवून निघून जाते, तोच आम्ही त्या उताऱ्यावर तुटून पडतो.

एकदा मात्र मावशीच्या प्रतापाची काही मात्रा चालली नाही. गावातील विठोबाच्या देवळापुढं श्रावणातील पारायणं चालू असताने सुदामबुवा मंडपातून वहाणा घालून गेला. झालं. गावकऱ्यांचं माथं तापलं. त्याला गावकऱ्यांनी लाथा-बुक्क्याखाली कुचललं. गावात पीठ बंद झालं, पण सुदामबुवा तसा डगमगणारा नव्हता. आजुबाजूच्या गावांत तो पीठ मागत फिरू लागला.

उघड नाही, पण चोरून, लपून आम्ही सुदामबुवाकडून पीठ घ्यायचो. वडिलांची आठवण म्हणा किंवा आम्ही पोरके म्हणून म्हणा, सुदामबुवा आम्हाला खुशीने फुकट पीठ द्यायचा. तो घरी आला म्हणजे खूपच गमतीजमती करायचा. त्या वेळी गावात एक तमाशा आला होता. त्यात 'पाथर्डीचा राजा' हा वग होता. पाथर्डी ह्या गावाला नपंसुक किंवा हिजड्यांची संज्ञा कशी मिळाली कुणास ठाऊक; पण वगातील राजा हिजड्यासारखा हावभाव करायचा. "हालव!" तो म्हणायचा, आणि सारा राजदरबार मागून म्हणायचा - "हालवते ना, बाय!" सारी प्रजाही राजाप्रमाणेच हावभाव करायची. ही नक्कल तो करायचा. आम्ही मुलं त्याच्या सन्निध्यात सारखी हसत राहायचो. सुदामबुवाच्या पिठावरच आम्ही आखाड-श्रावणात दिवस काढायचो. बलुतं, येसकर - पाळी बंद झाल्यामुळं त्याचा खरा फटका बसला तो आमच्या घराला. उपजीविकेचं दुसरं काहीही साधन नाही. आई आता कष्टाकरिता सारखी उभी. डोंगरावर मोळीसाठी गेली म्हणजे तिथंही फॉरेस्ट-शिपाई चिरीमिरी मागायचा. सुगीच्या दिवसांत आई सरवा वेचायची. ढेकळातून गाडीरस्त्यानं शिवारातून नेताना पडलेली कणसं वेचायची. त्यावर कशी तरी थंड चूल पेटायची.

निसर्गाचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही, हे मात्र खरं. डामडौल असलेला एखादा श्रीमंत माणूस असावा आणि त्याबद्दल तिटकारा वाटावा, तसं वाटायचं. प्रश्नच एवढे छळणारे होते, की प्रसन्नपणे निसर्गाकडे पाहायला इथं वेळ कुणाला ? मला वाटतं, हे सारं माणसाला भरल्या पोटी सुचत असावं. मला भोवतालचा निसर्ग काट्यासारखा टोचायचा...
*क्रमशः*

सौजन्य :-
लोकसेवा सार्वजनिक वाचनालय , नागठाणे

Address

साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय, बिदाल. ता. माण. जि. सातारा
Satara
415508

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय,बिदाल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to साने गुरुजी सार्वजनिक ग्रंथालय,बिदाल:

Share

Category