सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा Suvardhini foundation, satara

  • Home
  • India
  • Satara
  • सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा Suvardhini foundation, satara

सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा Suvardhini foundation, satara एक पाऊल जाणिवेतून जागृतीकडे!

11/06/2024
प्रिय उमाताई आज तुमचा ५० वा वाढदिवस होता आणि आपण तो मोठ्या आनंदाने साजरा करणार होतो... पण एका क्षणात तुम्ही हा जीवनाचा ड...
11/06/2024

प्रिय उमाताई
आज तुमचा ५० वा वाढदिवस होता आणि आपण तो मोठ्या आनंदाने साजरा करणार होतो... पण एका क्षणात तुम्ही हा जीवनाचा डाव अर्ध्यावरच सोडून गेलात आणि वर्तमानातील गोष्टी आम्ही भूतकाळात बोलू लागलो.

तुमच्यासोबत सतत सावलीसारखी असणारी आपली मैत्रीण सरिता आणि तुम्ही दोघींनी मिळून आज तुमच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त नियोजन केले होते. "पन्नास वर्षांनंतरचं आयुष्य हे बोनस असतं. त्यानिमित्त सर्व जिवाभावाच्या माणसांना भेटता येईल आणि समाजातील दुर्बल घटकांतील लोकांसाठी यानिमित्त काही करता येईल" असे म्हणत तुम्ही हा वाढदिवस कसा करायचा याचे नियोजन केले होते. तुम्ही व्यक्त केलेल्या इच्छा आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या परीने पूर्ण करत आहोत तुमच्या इच्छेनुसार गरजू विद्यार्थ्यांना वह्या भेट देणं असो की, "मला काही गिफ्ट्स भेट वगैरे नको, तू अमूक गरजू व्यक्तीला हव्या त्या वस्तू दे" असं तुमचं सरिता यांना सांगणे असो... हे आमच्या परीने पूर्ण करत आहोत.

आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे जमलो आहोत. सारं काही तुमच्या इच्छेनुसार होत आहे. पण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये "बर्थडे गर्ल" चं नाही. उमाताई तुमच्याशिवाय तुमचा ५०वा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आज निर्दयी काळाने आमच्यावर आणली आहे. आमच्यासाठी खूपच कठीण वेळ आहे ही.
स्वतःचं डोंगराएवढं दुःख, आजारपण, जीवनातील सर्व अडचणी बाजूला ठेवून तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करत राहिलात, ग्रामीण भागातील गरीब निराधार महिलांसाठी सतत मदतीचा हात देत राहिलात. या महिलांच्या व्यथा वेदना दुःख दूर करण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मोठ्या बहिणीच्या भूमिकेतून सतत त्यांच्या सोबत राहिलात. आम्हाला या कामामध्ये जोडत गेलात. याविषयी काय आणि किती लिहायचं... अंगणवाडी शिक्षिका, सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला, कोणत्याही निमित्त तुमच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक महिला मुले बालकांसाठी तुम्ही किती तळमळीने, निस्वार्थपणे, आपलेपणाने काम करत होतात हे तुमच्या अंतिम संस्कार भर पावसात जमलेल्या महिलांचे तुमच्यासाठी धाय मोकलून रडणे, सावडण्याच्या विधीसाठी जमलेल्या तीनचारशे महिलांचे एकमेकींच्या गळ्यात पडून रडणे, तुमच्या आठवणी सांगणे, तुम्ही कशी मदत केली किंवा तुमच्या जाण्याने त्यांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी व्यक्त करणे... हे सारं तुम्ही समाजासाठी तळमळीने केलेल्या कामाचे फलित आम्ही तुमच्याशिवाय अनुभवत आहोत.

अंगणवाडी हा विभाग आणि त्यात काम करणार्‍या सर्व महिला आज ग्रामीण भागातील आणि शहरातील वस्त्यांमधील महिला बालकांसाठी खूप भरीव काम करत आहेत. सक्षम भारत बनविण्यात या विभागाचे मोलाचे योगदान आहे. पण ना शासकीय पातळीवर ना सामाजिक पातळीवर या कामाची दखल घेतली जाते ना इथल्या समस्या जाणून त्यावर काम केले जाते. पण उमाताई तुम्ही व तुमचे सहकारी प्राप्त परिस्थितीत खूप तनमनधन अर्पूण काम करत होतात. पद छोटे असो वा मोठे आपल्याला मिळालेले कर्तव्य केवळ कागदी घोडे न नाचवत आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहून १००% समर्पण देवून करत होता. अधिकारी कर्मचारी यांचेतील दुवा असो की शासन समाजिक संस्थांमधील दुवा असो की अंत्योदय घटकातील महिला बालकांसाठी समाजातील सक्षम, कार्यशील महिलांना जोडणे असो... या सार्‍या घटकांची एकत्रित मोट बांधून तुम्ही काम उभा केले होते.
एक काम करताना समाजातील दुसरीच कोणती समस्या तुम्हाला दिसली, जाणवली तर त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित व्यक्तीला सांगून तुम्ही त्या समस्येचे निराकरण करत होता. मग भलेही ती समस्या तुमच्या विभागाशी संबंधित असो वा नसो. बस्स समाजातील दुर्बल घटकात समस्या आहे ना... शासन किंवा संस्था तिथे पोहचू शकत नाही ना... तुम्ही या कोणत्याच गोष्टींची चिंता न करता, किंवा साधन, माणसं याची कमतरता, शासन वा समाजातील अनास्था या कशाचाही विचार न करता सकारात्मक राहून संबंधित व्यक्तीला सांगून ती समस्या तुम्ही दूर करत होता. तेही स्वतःच्या समस्यांचा डोंगर पार पाडून... उमा साळुंखे या एका धाग्याने हे सगळं गुंफलं होतं. आज तो धागाचं क्षणात तुटून गेला आहे.

स्नायूंच्या आजारपणामुळे आलेल्या शारीरिक मर्यादा, प्रत्येक पाऊल टाकताना होणार्‍या वेदना सोसून तुम्ही काम करत होता. स्वतःच्या विशेष मुलीच्या अनुभवातून तुम्ही इतर पालकांच्या अडचणी दूर करत होता. विशेष मुलांसाठी काय काम करता येईल यासाठी पालकांना सोबत घेऊन चर्चा करत होता. उपक्रम राबवित होता.

माणूस म्हंटलं की नाती आलीच. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या नात्याचा कडवटपणा असतोच. तुम्ही तोही बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही निरभ्र मनाने जोडला होता. आ.ह. तात्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधील माझं आवडत पुस्तक म्हणजे 'मन निरभ्र व्हावे'. "बाहेर कितीही प्रदूषित कुलुशीत वातावरण असले तरी आपल्या मनाला निरभ्रतेची आस असावी" असे तात्यांनी या पुस्तकात सांगितले आहे. याचे उत्तम उदाहरण तुम्ही होता. उमाताई तुमचं मन सदैव निरभ्र होते. त्याचबरोबर ते खूप विशाल ही होते. जीवनात येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही समावून घेत होता.

आजही आम्ही कोंडवे येथे गेल्यावर तुमच्या सर्व सहकारी सख्यांनी साअश्रू नयनांनी तुमच्या आठवणींनी उजाळा दिला. मुलांना वह्या देताना पालकांच्या मनात तुमच्याविषयी कृतज्ञता होती. तुमच्या आठवणींचा सुगंध दरवळत रहावा म्हणून सुवर्धिनी फाऊंडेशन च्या माध्यमातून सोनचाफा तसेच बांबू, आवळा यांचे वृक्षारोपण केले. तसेच तुमच्या कार्यक्षेत्रातील सर्व २७ अंगणवाडीत लावण्यासाठी सोनचाफा दिला आहे. उमाताईंची आठवण म्हणून आज तुमच्या वाढदिवसानिमित्त या सर्व अंगणवाडीत वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार सर्व अंगणवाडी शिक्षिका सेविका यांनी व्यक्त केला आहे. या महिला-बालकांसाठी तुम्ही करत असलेले काम पुढे घेऊन जायचा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे. आज अशाप्रकारे तुमचा वाढदिवस साजरा करावा लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं...
काय बोलावं तेच कळत नाहीय.
उमाताई आपण खूप सारी स्वप्न पाहिली होती. तासनतास वेगवेगळ्या समस्यांवर समाजातील प्रश्न अडचणींवर चर्चा करत होतो. वेगवेगळ्या कल्पना मांडत होतो. कामात किती यश मिळेल याचा विचार न करता काम उभा करत रहायचं हे आपले विचार होते. सुवर्धिनी फाऊंडेशन च्या स्थापनेपासून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत होता. वेगवेगळे उपक्रम सुचवून त्यात सक्रिय सहभागी होत होता. आजारपण आणि मनातील दुःख बाजूला ठेवून तुम्ही सळसळत्या उत्साहात काम करताना पाहून आम्हाचाही काम करण्याचा उत्साह वाढायचा. तुमच्यातील सकारात्मकतेने आमची काम करण्याची उमेद वाढायची. आज तुम्ही आमच्यात भौतिक अर्थाने नसलात तरी विचारांच्या माध्यमातून सोबत आहात हे मात्र नक्की. तुमचे आचार विचार आमच्या स्मरणात चिरंतर असतील. आमच्या कामातून ते प्रत्यक्षात उतरविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु.
उमाताई तुमच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सर्व सख्यांकडून ही ओंजळभर शब्द सुमनांजली 🌹🌸🌺🪷🏵🌷🌻🌼🪻
- सुवर्धिनी फाऊंडेशन सातारा
- सुवर्णा बोबडे, वैशाली मंडपे, दीप्ती कुलकर्णी, डॉ. ज्योती काटकर, ॲड. अर्चना काटकर, डॉ. धनश्री पाटील, डॉ. पल्लवी शिंदे, शुभांगी दळवी, डॉ. स्वाती साळुंखे, जिजाऊ दडस, सरिता शिंदे, सुचित्रा घोगरे-काटकर

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा Suvardhini foundation, satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category