साक्रीचे सांस्कृतिक वैभव “श्री छत्रपती शिवाजी वाचनालय”
व्यक्तीची बौद्धिक जडण घडण करण्यात साहित्य अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. हे साहित्य जनमानसात पोहोचवण्यासाठी वाचनालयाची भूमिका मोलाची असते. अशी सामाजिक मुल्ये जागणारी व संस्कार रुजवणारी वाचनालये म्हणजे त्या-त्या शहराचे सांस्कृतिक वैभव असतात. यामुळेच साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालय साक्री शहरासोबतच तालुक्याचे सांस्कृतिक वैभव म्हणून
ओळखले जाते. स्थापनेची १०४ वर्ष पूर्ण केलेले साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाने येथील वाचन संस्कृती वृद्धिंगत करीत वाचकांची ज्ञानाची भूक भागवण्याचे काम आजवर केले आहे.
ब्रिटीश राजवटीत ४ जून १९१७ ला तत्कालीन जिल्हाधिकारी वेल्स यांच्या पुढाकारातून साक्रीत सुरु झालेले हे वाचनालय आज शहरासह तालुक्याची सांस्कृतिक ओळख बनले आहे. स्थापनेवेळी वाचनालयाचे नाव “वेल्स लायब्ररी” असे होते. मात्र असंख्य वाचकांच्या आग्रही मागणीने २४ जून १९७४ ला त्याचे नामकरण “श्री छत्रपती शिवाजी वाचनालय” असे करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाची लिखित घटना १९४९ मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली व त्यानुसार तालुक्याचे तहसीलदार हे वाचनालयाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर अन्य सदस्य निवडणुकीतून सभासद निवडून देतात. शहराच्या मध्यवर्ती भागात वाचनालयाची वास्तू असून, यात प्रशस्त वाचन कक्ष, महिला विभाग, बालविभाग, ग्रंथविभाग, बैठक हॉल, कार्यालय आदी विभाग आहेत. वाचनालयाच्या प्रांगणात प्रख्यात शिल्पकार वाल्मिक सुतार यांनी तयार केलेला श्री छत्रपती शिवराय यांचा अर्धाकृती पुतळा देखील बसवण्यात आला आहे. वाचनालयास उत्पन्नाचे साधन म्हणून या लागतच वाचनालयाच्या मालकीच्या जागेवर व्यापारी संकुल देखील उभारण्यात आले आहे.