08/01/2026
*सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूल, विवरे खुर्द येथे शारदोत्सव उत्साहात व दिमाखात संपन्न*
विवरे खुर्द (ता. रावेर) येथील सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूल येथे दिनांक ०७ जानेवारी २०२६, बुधवार रोजी शारदोत्सव (वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम) अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. रात्रीच्या वेळेस रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण शाळा परिसर उजळून निघाला असून कार्यक्रमास उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रावेर तालुका तहसीलदार श्रीमती दिपा जेधे मॅडम, रावेर बी.ई.ओ. श्री साहेबराव वत्सला रामदास शिंदे सर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री जे. के. पाटील सर, निंभोरा पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय. मीरा देशमुख मॅडम उपस्थित होते. तसेच शाळेचे अध्यक्ष श्री सीताराम दयाराम पाटील सर, प्रशासक श्री महेंद्र दयाराम पाटील सर, सह-प्रशासक सौ. संगीता पाटील मॅडम, संचालक डॉ. पियुष पाटील सर, मुख्याध्यापिका सौ. मनिषा संजय पाटील मॅडम व माजी सरपंच विवरे बु. श्री वासुदेव नरवाडे सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या लेझीम पथकाने वाजत गाजत मान्यवरांचे स्वागत करीत त्यांना मंचापर्यंत आणले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश व सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांच्या सन्मानार्थ स्वागत गीत सादर करण्यात आले. भारतीय संस्कृतीनुसार पुष्पगुच्छ, शाल, सरस्वती मातेची मूर्ती व रोपटे देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच याप्रसंगी मागील वर्षीच्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भावेश विलास सपकाळ (प्रथम), भावना प्रमोद सपकाळ (द्वितीय) व स्नेहल लिलाधर चौधरी (तृतीय) यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा संजय पाटील मॅडम यांनी शाळेची प्रस्तावना मांडली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त व संस्कारांचे महत्त्व पटवून दिले व शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात नर्सरीच्या चिमुकल्यांच्या गणेश गीतावरील नृत्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नृत्य व कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी खुशी लोखंडे, लोकिता पिंपळे व अनुष्का पाटील यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शारदोत्सव शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा ठरला.