22/11/2017
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे छोटेसे शहर. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या आंजर्ले, हर्णे, दाभोळ, उन्हवरे, आसूद, करदे, मुरुड, आणि इतर अनेक गावातून लोक आपल्या कामांसाठी येथे येत असल्यामुळे येथे कायम गजबज असते.
दापोली तालुक्याला बुरोंडी, केळशी ते दाभोळ असा साधारणपणे ५० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील समुद्रकिनाऱ्यांवर सुरुची झाडे नसून नारळाच्या मोठमोठ्या बागा आहेत. जोग, वशिष्ठी आणि भारजा या येथील मुख्य नद्या आहेत.
दापोली शहरापासून समुद्रकिनारा ८ किमीवर असला तरी शहर साधारणपणे ८०० फुट उंचीवर वसले आहे आणि याच गोष्टीमुळे येथील वातावरण वर्षभर आल्हाददायक असते. थंड वातावरण आणि हर्णे येथील मासळी बाजारात मिळणारे वेगवेगळे चविष्ट मासे यांच्यामुळे दापोली येथे एकतर आराम करण्यासाठी किंवा माश्यांवर ताव मारण्यासाठी (पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास) पर्यटकांची कायम वर्दळ असते.
दापोलीत ज्यांना आराम आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरायचे आहे त्यांच्यासाठी हर्णे, दाभोळ, बुरोंडी, मुरुड इ. समुद्रकिनारे आहेत. ज्यांना मच्छी आवडते, त्यांच्यासाठी हर्णे येथील मासळीबाजार प्रसिद्ध आहे. मंदिर, लेणी, किल्ले, इतिहास, इ. गोष्टींमध्ये रूचि आहे, त्यांच्यासाठी दापोली आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध आणि अपरिचित अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
दापोली दाभोळ रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २० किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पहायला मिळतो. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मुर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळीलमार्गे मळे गावात मुख्य मार्गाला आपण लागतो.
मळेपासून दापोलीकडे चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मुळ गाव आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. एखादे मोठे कार्य अडथळ्याची शर्यत पार करून कसे उभे राहते याचे उत्तम उदाहरण या शैक्षणिक परिसरात अनुभवता येते.
दापोलीहून गुहागरकडे जाताना साधारण ३० किलोमीटर अंतरावर देवी चंडीकेचे जागृत देवस्थान आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील दगडांमध्ये कोरीव काम करून मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादिपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादिपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे.मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.
श्री चंडिकेचे दर्शन घेतल्यावर दाभोळच्या खाडीला लागून असलेल्या अंडा मशिदीचे सौंदर्य न्याहाळता येते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हीने १६५९ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले.त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती याठिकाणी मिळते.
दाभोळच्या खाडीतून गुहागरकडे जाण्यासाठी फेरीबोटीची व्यवस्था आहे. पाच मिनिटातच वाहनासह गुहागर तालुक्यात प्रवेश करता येतो. खाडीच्या पलिकडे धोपावे गावातून वेलदूरमार्गे गुहागरला जाताना अंजनवेल येथील गोपाळगडला भेट देता येते. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूरहून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहेदेखील आहे. परतीच्या प्रवासात विस्तीर्ण परिसरात असलेला प्रसिद्ध रत्नागिरी गॅस ऊर्जा प्रकल्प दिसतो. गुहागरला परतल्यावर नारळाची दाट रांग आपल्या स्वागतासाठी तयार असते. निसर्ग सौंदर्याचे आगर असलेल्या या गावातील मुक्काम खरोखर आनंददायी असतो. खरं तर निसर्गाचे सान्निध्यच मुळात आनंद देणारे असते. व्यवहाराचा विचारही मनात न आणता हृदयाचे कप्पे उघडून मोकळा श्वास घेण्याची तयारी आपली असेल तरच हं!
दापोली आणि परिसरातील प्रसिध्द पर्यटन स्थळे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ – कृषी विद्यापीठ या नावाने १८ मे १९७२ या दिवशी महाराष्ट्र शासनाने याची स्थापना केली. १२ फेब्रुवारी २००१ या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे नामांतर केले. या विद्यापीठात शेती आणि मासेमारी या विषयांवर प्रशिक्षण आणि संशोधन केले जाते. शेती, मस्त्यव्यवसाय यांची आवड असणाऱ्यांनी या विद्यापीठाला आवर्जून भेट दिली पाहिजे.
सुवर्णदुर्ग – सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णे बंदरापासून साधारणपणे १ किमी अंतरावर समुद्रात असलेल्या बेटावर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. किल्ल्याला १५ बुरुज असून किल्ल्याची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आणि पायरीवर कासव कोरले आहे. किल्ल्यावर वाड्याचे अवशेष असून धान्यकोठारे, पाण्याचे तलाव आणि टाके, पश्चिम तटबंदीत असलेला चोरदरवाजा, दारूगोळ्याचे कोठार इ. वास्तू आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुळणीत तोफा पडलेल्या आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी नियमित बोटसेवा नसल्यामुळे हर्णे बंदरावरून स्थानिक कोळी लोक विनंती केल्यास किल्ल्यावर घेऊन जातात.
ह्या किल्ल्याचे बांधकाम शिलाहारकालीन असून १६व्या शतकात किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६०च्या सुमारास हा किल्ला शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात सामील केला आणि डागडुजी करून किल्ला बळकट केला.
कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला – हे तिन्ही किल्ले सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी हर्णे समुद्रकिनाऱ्यावर बांधले आहेत. तिन्ही किल्ले चिंचोळ्या भूभागाने हर्णे बंदराला जोडले आहेत. फतेदुर्गाची समुद्राच्या दिशेला असलेली थोडीशी तटबंदी आणि कनकदुर्ग व फतेदुर्ग यांना जोडणारा दगडी पूल वगळता बाकी वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. किल्ल्यावर सद्यस्थितीत कोळी लोकांची वसाहत आहे. कनकदुर्ग किल्ला समुद्रात घुसलेल्या कातळाच्या माथ्यावर बांधला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या असून जवळच डाव्या हाताला दगडी बुरुज आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि थोडीशी तटबंदी साबूत आहे. सद्यस्थितीत किल्ल्यावर दीपगृह आहे. तिन्ही किल्ल्यांमध्ये बऱ्यापैकी सुस्थित असलेला किल्ला म्हणजे गोवा किल्ला. या किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक आणि समुद्राच्या दिशेने एक अशी दोन प्रवेशद्वार आहेत. समुद्राच्या दिशेने असलेले प्रवेशद्वार दगडांनी बंद केले आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातास गंडभेरुंडाचे शिल्प आहे. जमिनीच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दक्षिण भागात असलेल्या नैसर्गिक उंचवट्यावर बालेकिल्ला आहे. तटाला असलेल्या पायऱ्यांनी तटावर चढून फेरी मारता येते. सुवर्णदुर्गाचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची प्रचिती गोवा किल्ल्यातून सुवर्णदुर्ग पाहताना होते. किल्ल्यांचे हे त्रिकुट कोणत्या काळात बांधले गेले असावे याची काहीही माहिती उपलब्ध नाही आहे. पण ज्या काळात सुवर्णदुर्ग बांधला गेला त्याच काळात ह्या किल्ल्यांची बांधणी केली गेली असावी.
पन्हाळेकाजी लेणी – कोटजाई आणि धाकटी या नद्यांच्या संगमावर प्रणालक दुर्गाच्या कुशीत हि लेणी आहेत. लेण्यांच्या समोरून वाहणारे नदीचे पाणी, काठावर असलेली आमराई आणि पूर्व-पश्चिम अशी २९ लेणी कोणालाही प्रथम दर्शनी भुरळ घालतात. येथील लेणी बौध्द आणि हिंदू प्रकारची आहेत. येथील लेण्यांमध्ये हीनयान, महायान, वज्रयान, शैव आणि नाथपंथीयांच्या स्थापत्यकला दिसून येतात. पहिली २८ लेणी एक ओळीत असून २९वे लेणे जे “गौर लेणे” नावाने ओळखले जाते ते थोडेसे दूर आहे. इसवी सनाच्या ३ शतकात चालू झालेले काम इसवी सनाच्या १४व्या शतकापर्यंत चालू होते. हीनयान पंथीयांनी हि लेणी खोदायचे काम सुरु केले आणि त्यानंतर महायान, वज्रयान हे बौध्द पंथ आणि त्यांच्यानंतर हिंदू धर्मातील शैव आणि नाथपंथीय येथे लेणी कोरायचे काम करीत होते. प्रत्येक पंथाने खोदकाम करीत असताना पूर्वीच्या लेण्यांमध्ये बदल थोडे घडवून आणले, तर काही लेणी नवीं खोदली. येथी लेण्यांमध्ये गौतम बुध्दाच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौध्द स्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, महाभारत आणि रामायणातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान आदी शिल्प ह्या लेण्यांमध्ये कोरलेली आहेत. २९व्या लेण्यात नाथपंथीयांचे ८५ शिल्पपट कोरलेले आहेत. या लेण्यात आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ इ. शिल्प सुध्दा कोरलेली आहेत.
प्रणालक दुर्ग – हा किल्ला लेण्यांच्या वरच्या भागात एका टेकडीवर आहे. हा भूप्रदेश साधारणपणे ११व्या शतकात शिलाहार राजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. शिलाहार राजा अपरादित्य (इ.स. ११२७ ते ११४८) याने कदंब राजसत्तेकडून हा भूभाग जिंकून घेतला. अपरादित्यने आपला मुलगा विक्रमादित्य याला कोकण प्रांताचा अधिपती बनवले. आजचे पन्हाळे गांव हि शिलाहारांची राजधानी. त्यावेळी गावाचे नाव होते प्रणालक. म्हणून हा प्रणालक दुर्ग. किल्ल्यावर असलेल्या वास्तू काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. किल्ल्यावर झोलाईदेवीचे मंदिर आहे. शासनाने डांबरी रस्ता बांधला असल्यामुळे झोलाई देवीच्या मंदिरापर्यंत गाडी घेऊन जाता येते. पण ज्यांना किल्ला चढायचा असेल त्यांनी पन्हाळे गावाच्या थोडे पुढे एक वाट डावीकडे जाते, त्या वाटेने किल्ला चढायला सुरुवात करावी. हा किल्ल्यावर जाणारा राजमार्ग. या वाटेने जाताना पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेवर एक पाण्याचे टाक सुध्दा आहे. येथे किल्ला होता हे सांगणारे दोनच अवशेष आपल्याला दिसतात आणि ते म्हणजे पायऱ्या आणि पाण्याचे टाके.
पन्हाळे हे गाव दापोलीपासून १८ किमी वर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावरून नानटे किंवा तेरे-वायंगणी गावातून पन्हाळे गावासाठी मार्ग आहे. तसेच दापोली-खेड रस्त्यावर असलेल्या वाकवली गावातूनसुद्धा पन्हाळे गावात येता येते. पण ह्या मार्गाने दापोली ते पन्हाळे अंतर आहे ३० किमी.
उन्हवरे येथील गरम पाण्याची कुंड – हि गरम पाण्याची कुंड दापोलीपासून ३५ किमीवर असलेल्या उन्हवरे गावात आहे. हे गांव पन्हाळेकाजी लेण्यांच्याजवळ आहे. येथील गंधकयुक्त पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात अशी लोकांची धारणा आहे.
हर्णे बंदर आणि मासळी बाजार – महाराष्ट्रातील सर्वात मोठा मासळीबाजार अशी हर्णे मासळी बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रीमासे बघावयास मिळतात. येथील बाजारात रोज मास्यांचा लिलाव केला जातो. तसेच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी हर्णे बंदरातून कोळी लोकांच्या बोटीतून जाता येते.
कड्यावरचा गणपती, आंजर्ले – हे मंदिर आंजर्ले गांवालगत असलेल्या कड्यावर आहे म्हणून हा गणपती “कड्यावरचा गणपती” या नावाने ओळखला जातो. मूळमंदिर साधारणपणे इ.स. ११५० मध्ये बांधण्यात आले तेव्हा मंदिराच्या बांधकामात लाकडीखांबांचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. इ.स. १७६८-१७८० या काळात मंदिराची डागडुजी करण्यात आली. हे देवस्थान जागृत असून येथील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. जेव्हा आंजर्ले खाडीवर पूल नव्हता तेव्हा भाविक मंदिरात जाण्यासाठी बोटीने खाडी पार करून जात आणि नंतर आंजर्ले गावातून असलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढून जात. आता खाडी पार करण्यासाठी पूल असल्यामुळे थेट मंदिरापर्यंत वाहनाने जाता येते. आंजर्ले गावातून येणाऱ्या पायऱ्या चढून आल्यानंतर एक छोटीशी घुमटी आपल्याला दिसते. या घुमटीत आपल्याला पावले दिसतात, ती पावले गणपतीची आहेत असे सांगितले जाते. सुवर्णदुर्ग किल्ला, आंजर्ले खाडी, हर्णे बंदर, अथांग पसरलेला समुद्र आणि नारळी-सुपारीच्या बागेत लपलेले आंजर्ले गांव असा नयनरम्य देखावा आपल्याला ह्या घुमटीच्या जवळून बघावयास मिळतो.
केशवराज मंदिर – केशवराज मंदिर आसूद गावाच्याजवळ असलेल्या टेकडीवर आहे. आसूद गांव दापोली-हर्णे रस्त्यावर आहे. मंदिरात जाण्यापूर्वी छोटीशी नदी ओलांडावी लागते. नदी ओलांडल्यानंतर उभ्या चढणीच्या पायऱ्यांच्या वाटेने आपण मंदिराजवळ येतो. मंदिर देवराईत वसलेले असल्यामुळे आणि वातावरण गारवा असल्यामुळे आलेला थकवा क्षणात नाहीसा होतो. मंदिर साधार्ण्पेने १,००० वर्ष जुने असून मंदिरातील विष्णूची मूर्ती विलोभनीय आहे. मंदिरासमोर असलेल्या गोमुखातून वर्षाचे बाराही महिने थंडगार पाण्याची धार वाहत असते. मुख्य मंदिराजवळच गणपतीचे छोटेसे मंदिर आहे.
वाघेश्वर मंदिर – केशवराज मंदिरापासून अवघ्या २-३ किमी वर वाघेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या सभागृहात लाकडी खांब असून त्यांच्यावर पुराणातील प्रसंग कोरलेले असून गाभाऱ्यात असलेले शिवलिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, काळभैरव आणि झोलाईदेवी इ. देवतांची मंदिरे आहेत. वाघेश्वर मंदिर नदीच्या काठावर असून नदीला सुंदर घाटसुद्धा बांधला आहे.
मुरुड समुद्रकिनारा – दापोलीपासून १२-१३ किमीवर समुद्राच्या जवळ मुरुड गाव आहे. येथील समुद्र किनारा प्रेक्षणीय असून भरपूर मोठा आहे. पावसाळासोडून स्थानिक कोळी लोकांच्या बोटीतून डॉल्फिन बघण्यासाठी जाता येते. गावाच्या मध्यभागी १८व्या शतकात बांधलेले दुर्गादेवीचे मंदिर आहे. सभागृहात कलाकुसरीने परिपूर्ण असे २८ खांब आहे. गाभाऱ्यात दुर्गादेवीची ३-४ फुट उंचीची दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरात मराठी भाषेत लिहिलेला एक शिलालेखसुद्धा आहे. मुख्यप्रवेशद्वाराच्या शेजारी मोठी घंटा असून ती चिमाजीआप्पायांनी वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांकडून जिंकलेली असावी.
महर्षी कर्वे उर्फ भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांचे मुरुड हे जन्मस्थळ. दुर्गादेवी मंदिराजवळ असलेल्या शाळेच्या प्रांगणात महर्षी कर्वे यांचा अर्धपुतळा आहे.
महर्षी कर्वे यांच्याशिवाय साने गुरुजी (पालगड), लोकमान्य टिळक (चिखलगाव) आणि भारतरत्न पी. वी. काणे यांचा जन्सुद्धा दापोलीचाच.
अश्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या दापोलीला भेट अवश्य दिली पाहिजे.