18/04/2025
फायनली आज तो दिवस आला ज्याची आमचा मित्र परिवार गेली अनेक महिने वाट बघत होता... आज आमचा मित्र तेजा म्हणजेच तेजस बर्वे मोठ्या पडद्यावर झळकला आणि तो देखील साक्षात संत ज्ञानेश्वरांच्या रुपात... आम्ही सगळेच या दिवसाची मनापासून वाट बघत होतो कारण तेजसचा संघर्ष आम्ही खुप जवळून पाहिला आहे... न थकता, विना तक्रार, स्वप्नाशी प्रामाणिक राहुन तेजा चालत राहिला आणि आज त्याच्या पहिल्या मुक्कामावर पोहचला...
तेजसच्या ह्या प्रवासात शिवराज अष्टकाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक आमचा मित्र दिग्पालचे मार्गदर्शन आणि विश्वास निर्णायक ठरले.
दिग्पालने दिग्दर्शित केलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा आज जगभर प्रदर्शित झाला आहे. शिवराज अष्टकामुळे दिग्पालचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे आणि मुख्यत्वे ह्या चाहत्यावर्गा मध्ये लहान मुलामुलींची संख्या खुप मोठी आहे. दिग्पालचे सगळेच सिनेमे सिनेमागृहामध्ये जोरदार चालतातच पण त्यानंतर सुध्दा घराघरांमध्ये रिपिट मोडवर सुरु असतात. म्हणूनच दिग्पालचा संत परंपरेतला हा पहिला सिनेमा मला ह्या अर्थाने मोठा वाटतो की आता पुढच्या पिढ्यांपर्यंत महाराष्ट्राची ही संत परंपरा देखील चित्रपटांच्या माध्यमातून पोहचायला सुरुवात होईल.
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पार्श्वगायक म्हणून ज्याने धुव्वा केला आहे तो आमचा मित्र अवधूत गांधी संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे...
मित्र म्हणून दिग्पालच्या कामाचा नेहमी अभिमान वाटतोच पण त्याच सोबत आज तेजसच्या मुख्य नायक म्हणून आणि अवधूतच्या संगीतकार म्हणून पदार्पणाचा विशेष आनंद आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई च्या सर्व टीमचे खुप मनापासून अभिनंदन...
तुम्ही देखील आमच्या सर्व माऊलींनी खुप मनापासून बनविलेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा ही नम्र विनंती.