29/08/2026
राष्ट्रीय क्रीडा दिन : कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याचा संकल्प!
क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेला आधुनिक आणि दर्जेदार क्रीडा पायाभूत सुविधांची जोड मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.
मी खासदार असताना तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री श्री किरेन रिजिजू यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खेलो इंडिया योजनेअंतर्गत कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी ₹५.५० कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून स्टेडियमच्या विकासासोबतच हॉकी मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे एस्ट्रोटर्फ उभारण्यात आले. विशेष म्हणजे, मैदान काही तांत्रिक कारणांमुळे खेलो इंडियाच्या निकषांमध्ये बसत नसतानाही, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या प्रस्तावाला नामदार रिजिजू यांनी मान्यता दिली होती, त्यांचे नंतरचे तत्कालीन क्रीडा मंत्री नामदार अनुराग ठाकूर यांनी देखील या प्रस्तावासाठी सकारात्मकता दाखवली.
याचबरोबर, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ३२ एकर जमीन मंजूर करून घेतली. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम तसेच इतरही खेळांना आवश्यक व उपयुक्त ठरतील अशा दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देखील माझे प्रयत्न सुरु आहेत.
कोल्हापूरच्या मातीतून देशाला अनेक नामवंत खेळाडू मिळाले आहेत. आता या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे हीच पुढची दिशा आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशाच्या क्रीडा क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संस्था आणि क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा!
- संभाजीराजे छत्रपती