22/11/2022
ओढ्यावर येणाऱ्या बाया.....
जुन्या, मळकटल्या, विरलेल्या
वाकळांचे, कापडांचे, साड्यांचे, चादरींचे
ढीग डोईवर घेऊन
पऱ्ह्यावर पाण्याच्या शोधात येणाऱ्या....
एकमेकींच्या केसात माळलेल्या
फुलांचा वास घेत,
हातातली वजनं सावरत,
पोरांना उगाचच दामटवत जाणाऱ्या...
जथ्यात एखाद्या नव्या आलेल्या बाईकडे
शेकडो कुतूहलाने बघणाऱ्या,
पोरांची भांडणं आहे त्या जागेवरून
ओरडून सोडवणाऱ्या,
कपडे बडदताना नवर्याच्या, नणंदेच्या
वागण्यावर धुमसणाऱ्या,
सासूच्या हकीकती सांगत पेटणार्या...
आणि विचारानेच विझणाऱ्या
नियंत्याने दिलेल्या हाडांच्या राशीला कवटाळून
क्वचित एकमेकींशी भांडणार्या...
हसणार्या, खिदळणाऱ्या,
आठवणींची गाणी गाणारे,
पाखरांचे डोळे असलेल्या...
पाण्यातून बाहेर आल्या की...
कातळावर पडलेल्या कापडांसोबत
सुकत जातात...
शोधक नजरा आसपासच्या रानात जळण
धुंडाळत राहतात...
मग अचानक सुन्न होतात
गढूळ पाण्याच्या तळाशी नजर लावून
शोधत राहतात
सुखाची अज्ञात माहेरं....
योगिता जाधव
21.11.2022