03/09/2026
प्रेस नोट
दिनांक : 03/09/2026
पुण्यात चाललंय तरी काय? कुठे मुस्कटदाबी तर कुठे मारहाण !
संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी पार्टीकडून तीव्र निषेध !
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारल्याची ही शिक्षा आहे का?
चंद्रकांत पाटील हे पुण्याचे व्हाइसरॉय आहेत का ?
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध !
सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे तसेच सत्ताधाऱ्यांना आपल्या Instagram Reelsच्या माध्यमातून थेट आणि कठीण प्रश्न विचारणारे संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे. संतोष पंडित यांनी गेल्या काही काळात रस्ते, सार्वजनिक सुविधा, प्रशासनातील अनियमितता आणि जनतेच्या पैशांच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्तेत असलेल्या व्यक्तींना थेट प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, अशा प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी किरकोळ स्वरूपाच्या आरोपांवरून संतोष पंडित यांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ज्यांच्या बद्दल संतोष पंडित यांनी विधाने केली आहेत, त्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील व नगरसेविका मिताली ताई साळवेकर यांची तक्रार मुळीच नाही. त्यामुळे कोथरूड पोलिस स्टेशनने दाखल केलेले गुन्हे हे राजकीय दबावापोटी आकसाने हेतू पुरस्सर त्रयस्थ व्यक्ती करवी दाखल केले आहेत, असे दिसते. विशेषतः अटकेची रात्री १:३० ची वेळ आणि पद्धतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री उशिरा कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या अटकेची कायदेशीरता संशयास्पद आहे. या तक्रारीत उल्लेख केलेले तथाकथित आक्षेपार्ह शब्द हे बोली भाषेत अनेकदा वापरले जातात. या शब्दांची निवड योग्य आहे का हा वेगळा मुद्दा असला तरी केवळ त्यावरून गुन्हा दाखल करुन अटक करणे म्हणजे पुण्याला हुकुमशाहीकडे नेणे होय. हा सत्तेचा गैरवापर आहे.
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या काही कामांबद्दल प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या प्रभागासाठीचा निधी शून्य केला गेला. संतोष पंडित यांनी ओपन जिमच्या कामातील दुपटीने फुगवलेले बजेट व आर्थिक अनियमितता याबद्दल बोलले तर त्यांच्या वर गुन्हा दाखल होऊन अटक केली. माननीय चंद्रकांत दादा पाटील हे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पुण्याचे व्हाइसरॉय नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून आणि जबाबदार मंत्री म्हणून राजकीय टीका सहन करण्याची सवय करून घ्यावी. राजकीय टीकेला राजकीय प्रत्युत्तर द्यावे. यंत्रणांचा दुरुपयोग करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.
तसेच वाढीव आवाजातील डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर आज झालेल्या मारहाणीचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत आहे. पुण्यात कायद्याच्या राज्यापेक्षा झुंडशाही फोफावत चालली आहे. सुसंस्कृत पुणे शहरासाठी ही खेदाची बाब आहे. लोकशाहीत सगळ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. पण सध्या मुद्द्यांऐवजी गुद्द्यांची लढाई वाढत चालली आहे.
कळावे,
Abhijit More (प्रदेश सचिव), Amit Mhaske (प्रदेश समन्वयक), Sanjay Kone (प्रदेश संघटक- कामगार आघाडी), आरती करंजावणे Aarti Karanjawane (महिला आघाडी शहर अध्यक्षा), Sunita Kale (माजी शहर अध्यक्षा), Madhuri Matth, Sunil Sawadi, Nitin Kute Patil (कार्याध्यक्ष - कामगार आघाडी)