24/08/2026
लेखन प्रमाद दुरुस्तीबाबत महसूल विभागाचे परिपत्रक जारी; ५ वर्षांपेक्षा जुन्या चुकांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५५ अन्वये अधिकार अभिलेखातील लेखन प्रमाद (मानवी व तांत्रिक चुका) दुरुस्त करण्याबाबत महसूल विभागाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.
यानुसार, कलम १५५ अंतर्गत लेखन प्रमाद किंवा मानवी चुका दुरुस्त करण्याचे मूळ अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचेकडून सदर अधिकार सर्व तहसीलदारांना प्रदान करण्यात आले होते, परंतु सदर अधिकारांचा गैरवापर टाळण्यासाठी तसेच मूळ तरतुदीचा उद्देश साध्य होण्यासाठी सदर अधिकार आता तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना अटी व शर्तींसह पुनर्प्रदान करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर अधिकारात केवळ खातेदाराच्या नावातील चुका, गट किंवा सर्व्हे नंबरमधील अंकांची अदलाबदल, जमिनीचे क्षेत्रफळ लिहिताना झालेल्या चुका किंवा चुकून वगळलेली नावे अशा मूळ आशयात बदल न होणाऱ्या मानवी व तांत्रिक चुकाच दुरुस्त करता येतील. तसेच, संहितेच्या कलम १०६ नुसार किंवा कलम २४७ व २५७ अंतर्गत अपील व पुनरीक्षण (Revision) अपेक्षित असलेल्या विषयांवर या कलमाखाली कारवाई न करण्याबाबत ताकीद देण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ५ वर्षांपेक्षा जुन्या चुकांच्या दुरुस्तीसाठी तहसीलदारांना उपविभागीय अधिकारी (SDO) तर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षक (SLR) यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. याशिवाय, ज्या जमिनीच्या हस्तांतरणावर कायदेशीर निर्बंध आहेत, दुरुस्तीमुळे शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे, किंवा ज्या जमिनी शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या प्राधिकरणांच्या नावावर आहेत, अशा प्रकरणांमध्ये हे अधिकार वापरता येणार नाहीत. शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्देशांची सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.