02/08/2026
“ज्यांच्या डोळ्यांना प्रकाश नाही, तेच आज अनेक गरीब मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि संस्कारांचा प्रकाश पसरवत आहेत…
ही ओळ आहे संत भगवान बाबा मृदुंग गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथील सेवाव्रती ह.भ.प. आसाराम महाराज आव्हाड यांची. दृष्टी नसली तरी त्यांची दूरदृष्टी मात्र हजारो डोळस माणसांपेक्षा कितीतरी मोठी आहे. त्यांना खंबीर साथ लाभली आहे परमेश्वर आव्हाड यांची. या दोन्ही बंधूंनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब आणि वंचित मुलांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.
या गुरुकुलात वय वर्षे ७ ते १७ मधील सुमारे २५ ते ३० गरीब, ऊसतोड कामगार आणि गरजू कुटुंबातील मुले राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना केवळ शालेय शिक्षणच नाही, तर वारकरी संस्कार, मृदुंगवादन, कीर्तन, गायन, भागवत आणि अध्यात्माचे शिक्षण दिले जाते. आज या संस्थेतून घडलेले अनेक विद्यार्थी समाजात कीर्तनकार, मृदुंगवादक, गायक आणि भागवत कथाकार म्हणून सेवा बजावत आहेत.
अशा निःस्वार्थ सेवेला हातभार लावण्याचे भाग्य शारदमाई फाउंडेशनला लाभले. संस्थेच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी आवश्यक स्टील तसेच विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी पिठाची गिरणी देऊन या पवित्र कार्यात आमचाही छोटासा सहभाग नोंदवला.
ही मदत कोणावर उपकार म्हणून नाही, तर अशा महान सेवेला केलेला साष्टांग नमस्कार आहे. कारण गरीब मुलांच्या आयुष्यात संस्कारांचे बीज पेरणारे हात हेच समाजाचे खरे शिल्पकार असतात.
शारदमाई फाउंडेशन