22/07/2021
मावशीच घर ! 🏡
Your Aunt’s Home !
आयुष्याच्या या वळणावर मला मुली- महिलांनासाठी काहीतरी कराव वाटतय पेक्षा ‘कराव लागतय’,तस पाहायला गेल तर याला कारण खूप आहेत आणि नाहीतही....प्रत्येकाच्या घेण्यावर आहे.या क्षणी 'मावशीच घर' (किंवा जे म्हणता येईल ते) हा उपक्रम मी माझ्या लेकीच्या मदतीने उभा करतेय किंवा आम्ही दोघी मिळून राबवतोय म्हंटल तरी जमेल. तर हे किती दिवस सुरु राहील,काळाच्या ओघात टिकेल कि नाही?कस टिकेल, रीसोर्स, पैश्याचं काय हा विचार मी सध्या करत नाही कारण एकादा निर्णय घेण किंवा कुठलही काम आपण पुढे होऊन सुरु करण गरजेच असत.ती त्या ,त्या काळाची गरज असते. आणि स्वतःसाठी तर झगडत आहोतच कि आपण आपल्या आजूबाजूंच्यासाठी केल तर एकमेकांना आपलीच मदत होईल.मग ठरवल एक अस घर उभा करायचं तिथे कुठलीही बाई येईल, आमच्सासोबत मोकळेपणाने राहील, आम्ही खातो तेच ती खाईल, गप्पा मारील, चर्चेतून मार्ग काढू आणि तिला बर वाटल की तिच्या मार्गाने निघून जाईल. या निखळ भावनेतून मावशीच घर उभ राहील.मागे दोघी-तिघी येऊन गेल्यावर खर्या अर्थाने सुरुवातदेखील झाली.आता या वयामध्ये एवढ नक्की कळल आहे बाई जिथे उभी असते तिथली खोली आणि बारकावे तिला माहित असतात आणि समाज नेमकी हीच (स्त्री- पुरुष) गोष्ट गृहीत धरतो. तर काय आहे हे ‘मावशीच घर’?आणि का सुरु करावस वाटल?हा प्रश्न कोणालाही सहज पढू शकतो.साहजिक आहे.आणि त्याच उत्तर खूप सोप आहे.
या जगात राहणाऱ्या प्रत्येकच मुलीला, बाईला, स्त्रीला जर तिच्या राहत्या घरात किंवा कुठेही काही अडचण आली,घरात हाणल-मारल, तिच्यावर खोटे-नाटे आरोप झाले, त्यातून अन्याय,पिळवणूक झाली, शारीरिक, मानसिक,आर्थिक, शोषण, अत्याचार झाला (घरी कितीही आनंदीआनंद असला तरी कित्येक स्त्रीया एकदा तरी यातून जातात,गेलेल्या असतात,मीही गेलेली आहे.)किंवा तिला ४ दिवस कुठे ‘जावच’ वाटल तर तिने काय करायचं, कुठे जायचं, कुठे राहायचं हा प्रश्न उद्भवतो. वरती म्हंटल्याप्रमाणे प्रत्येक मुलीला, बाईला, स्त्रीला आई, बहीण, मावशी, आत्या, काकू किंवा चुलत-मालत-मानलेल्या मामे-आतेबहीणी, मावश्या-काक्या, मैत्रिणी असतील अस काही नाही.आणि असल्या तरी त्या ऐकून घेण्याच्या, मदत करण्याच्या परीस्थितीत असतील अस नाही. कधी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात,समज जाणीव नसते किंवा कौटुंबिक परिस्थिती तसी नसते. बऱ्याचदा आपले 'वयक्तिक हितसंबंध' जपण्याच्या नादात आपल्याच घरातल्या एखाद्या प्रामाणिक माणसाची आपण इतर सदस्य मीळून ससेहोलपट करत राहतो.आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला किंवा कारभाऱ्याच्या बायका हे घरात अत्यंत कुशलपणे चालू राहू देतात. कौटुंबिक राजकारण व ह्या विषयाला लागणारा समजदारपणा किंवा एकूणच उदासीनता घरात दिसते. उद्या सकाळी उठून सगळ ठीक होईल हि आप्तईश्तांची भूमिका बाईला खोलवर जखमा करत राहते (कुटुंबातील ज्यांना अधिक कळत अस वाटत किंवा दुसर्यांना ह्यांच्याबद्दल तस वाटत राहत ह्यांचे गहन विषय आज गावात, कट्ट्यावर, व्हात्साप्प- फेसबुकवर काय चर्चा हे असतात) किंवा कधी आजूबाजूची मंडळी मजबूरही असतात.
मग अश्या वेळी त्या बाईने तीच मन कुठे मोकळ करायचं.आता तुम्ही म्हणाल पोलिस,स्त्री आधार गृह,सामाजिक संस्था अश्या ठिकाणी ती जाऊ शकते.अगदी बरोबर आहे.पण प्रत्येकीला ते जमतच किंवा माहिती असते अस नाही( खूप कंगोरे आहेत) तिची केस करण्यापेक्षा सल्ला घेण, मदत, फक्त मन मोकळ करण्यावर जास्त भर असतो. ज्यामध्ये ती व्यक्ती सोडून आई -वडील, सासू-सासरे किंवा मुल नवरा अश्या कुटुंबातील इतर सदस्यांना काही त्रास होणार नाही आणि तिचीही घुसमट कमी होईल,सुटका होईल अस काहीतरी तिला हव असत, करायचं असत.खुपदा हीच भूमिका असते(अनुभवातून).
तर मागच्या दोनेक वर्षापासून आम्ही कुटुंब, आणि काही समविचारी माणस मिळून देहू व पिपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात अश्या सगळ्या महिलांना हॉस्पिटलपासून,समुपदेशन,लीगल-एड व एकूणच तिला पुन्हा उभा राहता याव,जगावस वाटाव,उमेद मिळावी यासाठी लागेल आणि आम्हाला जमेल ती मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत.पण कोरोना काळात या विषयाने कहर केला. हे रोजच झाल होत पण ठोस काम करता येत नव्हत. खूप विचार केल्यावर मी माझ्या मुलांशी बोलले आणि यातून ‘मावशीच घर’ ची निर्मिती झाली.
दोन-तीन महिन्यापूर्वी मी एक छोटस घर घेतल आहे.सध्या तिथे मी आणि माझी मुलगी आम्ही मायलेकी राहत आहोत.आम्ही त्यातच ‘मावशीच घर’ सुरु करायचं ठरवल आहे. तर महाराष्ट्रातील व कुठलीही,ओळखीची महिला कुठल्या अडचणीतून जात असेल आणि पुढे काय कराव,कुठे जाव,कस जाव हे सुचत,समजत नसेल तर अश्या प्रामाणिक,गरजू महिलेने आमच्याशी संपर्क करून, बिन्दास्त आमच्याकडे राहायला याव. अगदी १ तास ते एक-दोन -तीन व चांगला मार्ग निघेपर्यंत ती मुक्कामीदेखील ती महिला इकडे राहु शकते. मायेची उब, आधार,दोन घास निवांत झोप व पुढे समुपदेशन ते कायदेविषयक मदत केली जाईल व तश्या लोकांशी जोडून दिले जाईल, लागणारी सेवा/माहिती पुरवली जाईल.आम्ही इतर सामाजिक संस्थाशी देखील चर्चा करत आहोत.
आयुष्यात आज सकाळी उठायचं आणि एक क्रांती करायची म्हणून कोणीच झोपेतून उठत नसतो (किमान मातीची बनलेली माणस) किंवा तस काहीच नसत.पण एखाद्याने स्वतःसाठी उचलेल पाऊल किंवा एखादी घेतलेली भूमिकासुद्धा उद्या समाजात क्रांतिकारी म्हणून ओळखली जाऊ शकते. पण ते उद्याच झाल.आजच काय ?
खर तर सगळ्यांना आयुष्य सहज जगायचंय,अगदी साध,शांत,नदीकाठी एक कौलारू घर आणि दारात नातवंड खेळतात ,आणि आपण जोडीने किंवा घरात अनेक जोड्या बसून गप्पा-गोष्टी, विनोद करत व्हरांड्यात बसून चहा /कोफी आणि रम्य सायंकाळ, अस कोणाला नकोय.सांगा.
पण तस होत नाही,जगण्यासाठी हातपाय हलवावे लागतात, निर्णय घ्यावं लागतात. तर म्हणून ह्या कामाला वेळ मिळेल तस करायचं न ठरवता आलेल्या प्रत्येक बाईला मदत कशी करता येईल ह्यावर आम्ही लक्ष द्यायचं ठरवल आहे. यातून महिलांना मावशीच घर समुपदेशन, निवारा, कायदेशीर मदत व प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळेल.तूर्तास त्यासाठी तुम्ही सध्या इकडे मेसेजबोक्स मध्ये संपर्क करू शकता.बाकीची माहिती ही वेळोवेळी पुरवली जाईल.
या ........तुमच स्वागत आहे ! 🙂
Your Aunt's Short Stay Home.
#मावशीचघर