01/03/2020
पुस्तकांच्या गावात लोककलांचा रांगडा आविष्कार
‘भूपाळी ते भैरवी’ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुस्तकांचं गाव भिलार येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांच्या गावात २ दिवस योजलेल्या ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमास भिलार पंचक्रोशीतील गावकरी रसिकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. भूपाळी ते भैरवी प्रतिष्ठान या सांगली जिल्ह्यातील संस्थेच्या कलाकारांनी विविध लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेची वैशिष्ट्ये आणि रुपे रसिकांसमोर उलगडली.
गण, गवळण, भूपाळी, वासुदेव, पिंगळ्या जोशी, बहुरुपी, शाहिरी, भारुड, नंदी बैलवाला, पोतराज, बतावणी, लावणी, सवाल-जवाब, दिंडी, कीर्तन...अशा वैविध्यपूर्ण लोककलांच्या माध्यमातून कलाकारांनी लोकसाहित्याचा आणि लोकसंस्कृतीचा जागर घडविला. मराठीच्या बोली, मराठीची प्रादेशिक वैशिष्ट्ये आणि विविध साहित्यिकांचे लोकसाहित्य यांचा अनुभव रसिकांनी घेतला. लोकसंगीत आणि लोकभाषा यांच्या माध्यमातून लोककलांचा मराठमोळा, रांगडा आविष्कारच रसिकांनी अनुभवला. नंदीबैल, पिंगळा जोशी, पठ्ठेबापुरावांची लावणी, मराठी भाषेचा सवाल-जवाब, गोंधळ, दिंडी या सादरीकरणांना उपस्थितांनी विशेष उत्स्फूर्त दाद दिली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लहान मुला-मुलींनी आणि महिलांनीही कार्यक्रमाचा आनंद घेतला.
दि. २७ व २८ फेब्रुवारी, २०२० रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय लोकसाहित्याच्या उत्सवाचा शुभारंभ कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने झाला. सर्वश्री बाळासाहेब भिलारे, राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारे, सुरेंद्र भिलारे, आनंदा भिलारे, गणपत पाटील, सरपंच वंदनाताई भिलारे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पुस्तकांच्या गावाचे बोधचिन्ह असलेली भेटवस्तू आणि पुस्तके भेट देऊन कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
खाजगी नोकऱ्या करत, इतर व्याप सांभाळत कलांची जोपासना करणाऱ्या हौशी आणि गुणवान कलाकारांचे गावकरी रसिकांनी विशेष कौतुक केले. निर्मिती प्रमुख संपत कदम आणि सूत्रधार कृष्णात पाटोळे यांच्यासह नरेंद्र हराळे, सिकंदर परिजादे, जयश्री जाधव, काजल नरुटे, अभिजीत कदम, कीर्ती पोवार, अबोली कदम... इत्यादी कलाकार सादरीकरणात सहभागी होते. संजय घोलप (ढोलकी), महेश नवाळे (तबला), भालचंद्र डोंगरे (की बोर्ड), प्रकाश कांबळे (संवादिनी), आणि संतोष पाटोळे (तालवाद्ये) या वादकांनी अनुरुप साथसंगत केली.
राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून योजलेल्या मराठी मातीचा सुगंध असलेल्या या कार्यक्रमाद्वारे मनोरंजनही झाले आणि भाषा व संस्कृतीबाबत प्रबोधनही घडले, अशी समाधानाची भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली.