19/05/2026
मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार
जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार
...आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
पालघर, दि. १९ मे २०२६ : धानीवरी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व स्वीकारणार असून, जखमींवरील उपचारांचा १०० टक्के खर्च शासन उचलणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.
अंत्यसंस्कारासाठी डॉ हेमंत सवरा, आमदार सर्व श्री. राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
बापूगाव व लाखातपाडा येथील आदिवासी कुटुंब साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमासाठी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना धानीवरी परिसरा मध्ये झालेल्या अपघातात एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पैकी १२ जणांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.यामध्ये बापूगाव व लाखातपाडा येथील १२ तर वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या १७ जणांवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून, औषधे, शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व वैद्यकीय खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.
“कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आदिवासी विकास विभाग या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची तात्काळ दखल घेत मदतीची घोषणा केल्याचे सांगताना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके म्हणाले की, जिल्हाधिकारी, आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बाधित कुटुंबांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांच्या गरजा आणि समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे.
“ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. हा आघात विसरणे शक्य नाही; मात्र या संकटाचा सामना करण्याची शक्ती सर्वांना लाभो,” अशा भावना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केल्या.