30/07/2025
✍︎ अभय दादा साळुंखे यांची लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड — संघर्षाच्या व्रताला सत्तेचं अधिष्ठान
✍︎ अमोल संजय शिंदे
माजी सोशल मीडिया अध्यक्ष, काँग्रेस – निलंगा तालुका
लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणं ही केवळ संघटनात्मक घडामोड नाही, तर जनतेच्या मनात खोलवर विश्वास बसलेल्या नेतृत्वाची अधिकृत ओळख आहे. आज अभय दादा साळुंखे यांच्यावर ही जबाबदारी आली आहे, ती त्यांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचं आणि जनतेशी असलेल्या नात्याचं फलित आहे.
देवणीतील संघर्ष – भाजपच्या फोडाफोड राजकारणाला दिलेला थेट चपराक
देवणी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपने फोडाफोडीचा डाव आखला. काही नगरसेवकांना हाताशी धरून नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, अभय दादांनी संयम, समजूत आणि स्पष्ट भूमिका घेऊन तो डाव हाणून पाडला.
> “भाजपने देशभरात सत्तेच्या जोरावर फोडाफोडीचं जे राजकारण सुरू केलं, त्याला आज देवणीच्या जागरूक जनतेनं जोरदार चपराक दिली आहे,”
असं स्पष्ट शब्दांत सांगणारे दादा, राजकीय स्थैर्य कसं राखायचं याचं उदाहरण ठरले.
दादांनी या प्रसंगी पुढील विधान केलं:
> “गाव करेल ते राव काय करेल या म्हणीप्रमाणे जनतेनं भाजपच्या खोट्या डावपेचांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी दिशाभूल करून भाजपला पाठिंबा दिला, त्यांनाही योग्य वेळी सोबत घेऊन काँग्रेसचा विचार पुन्हा रुजवणार. माजी मंत्री अमित देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस लातूर जिल्ह्यात पुन्हा मजबूत होईल, हे देवणीच्या निकालाने स्पष्ट केलं आहे.”
या संपूर्ण प्रसंगातून दादांचं नेतृत्व – जे संकटातही तुटत नाही, गडबडीतही संयम सोडत नाही – हे अधोरेखित झालं.
नवीन जबाबदारी – काँग्रेस संघटनेच्या नव्या पर्वाची सुरुवात
लातूर जिल्हा काँग्रेससाठी ही निवड सामान्य कार्यकर्त्याला आवाज देणाऱ्या नेतृत्वाची निवड आहे. कार्यकर्त्यांचा आवाज ऐकणारा, प्रत्येक फोन स्वतः घेणारा आणि कोणताही थाट न करता सतत रस्त्यावर असणारा नेता म्हणजे अभय दादा.
त्यांच्या अध्यक्षपदामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षं प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर आता ठाम पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे – मग ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांची अडचण असो वा बेरोजगार तरुणांसाठी संधी असो.
शेवटी एकच गोष्ट…
अभय दादा हे केवळ एक नाव नाही, तर हजारोंच्या आशा, लढ्यांचा अनुभव, आणि सत्यासाठी झगडण्याची हिम्मत आहे.
लातूर जिल्हा काँग्रेससाठी ते एक नवा अध्याय आहेत – जिथं फक्त भाषणं नाही, तर कृती आणि संवेदनशीलता एकत्र दिसेल.