युवा सेना! तरुणांसाठी लढणारी शिवसेनेची बलाढ्य अंगिकृत संघटना. महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ म्हणजे युवा सेना! युवा पिढीतील मत-मतांतरे, युवा वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे युवा सेना...!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी युवा
सेनेची स्थापना केली. लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने १७ ऑक्टोबर २०१० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर युवा सेनेची स्थापना झाली. मुंबईत सुरु झालेल्या युवा सेनेच्या झंझावाताने अल्पकाळातच कधी आंदोलनांचे तडाखे, तर कधी शिष्टमंडळांसह भेटीगाठी घेऊन दिल्लीच्या तख्तालाही धडक दिली.
शिवसेनेचा ताठ बाणा बाळगणारी 'युवा सेना' वर्षभराच्या वाटचालीतच राज्यभरातील तरुणांचे आकर्षण ठरली. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे समाजाच्या सर्व स्तरांमधील तरुणांमध्ये एक ऊर्जा आणि चैतन्यच निर्माण झाले.
तरुणांचे प्रश्न मग कोणतेही असोत, त्यांना वाचा फोडण्यासाठी सदैव अग्रेसर राहिली ती युवा सेनाच! केवळ विरोधासाठी किवा राजकारणासाठी म्हणून विरोध न करता विधायक आणि समाजहिताचे काम करण्याचा विडाच युवा सेनेने उचलला आहे.
सर्वसामान्य नागरिक आणि तरुणाईच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी युवा सेनेने प्रसंगी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने केली आणि केंद्रापासून राज्यापर्यंतच्या मंत्र्यांना शिष्टमंडळांसह भेटून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून दिली.
युवा सेनेचा पहिला दणका म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सेनेटची निवडणूक. सेनेटच्या १० पैकी ८ जागांवर विजयश्री प्राप्त करून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठावर भगवा झेंडा डौलाने फडकवला. सेनेट निवडणुकीच्या माध्यमातून विजयाच्या श्रीगणेशा करतानाच युवा सेनेने नवा इतिहासच रचला.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'युवा सेने'ची 'युवा सेवा' सुरू झाली आणि 'युवा सेवे'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली. विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे हेच युवा सेनेचे उद्दिष्ट आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचा समावेश नसून महाराष्ट्रातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांनाच संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. केवळ तक्रारींचा पाढा वाचत न बसता काही तरी नवीन, विधायक कार्य करून दाखवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुण वर्गालाच संघटनेत स्थान देण्यात आले आहे. युवा सेना म्हणजे खऱ्या अर्थाने तरुणांनी तरुणांसाठी चालवलेली तरुणांची संघटना आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांतिकारक बदल घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून युवा सेनेने जे कार्य हाती घेतले आहे, त्या पद्धतीने आजवर एकही संघटनेने काम केलेले नाही.
शिक्षणाच्या चुकीच्या धोरणावर सरकारला धारेवर धरण्याचे काम युवा सेना करत असतानाच विद्यार्थांच्या हिताच्या विषयासाठी आदित्य ठाकरे स्वतः महाविद्यालयात धडक देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. विद्यार्थी कल्याणाचा झेंडा खांद्यावर घेवून वाटचाल करताना तरुणांच्या आणि विद्यार्थाच्या हिताचे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे यास युवा सेनेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच युवा सेनेला शहरी, ग्रामीण सर्व भागातून व्यापक पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. विविध खेळ, क्रीडा स्पर्धांच्या निवड पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यापासून निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी युवा सेनेने पुढाकार घेऊन काम केले. संस्थाचालकांनी महाविद्यालयांच्या जागांवर टोलेजंग व्यापारी संकुले उभारण्याचा डाव रचला तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेनेच आक्रमक आंदोलने करून महाविद्यालये बंद करून 'शॉपिंग कॉम्प्लेक्स' बांधण्याचे हे कारस्थान उधळून लावले. केवळ मुंबई आणि परिसरात काम न करता आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेचा झंझावात महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला. ग्रामीण भागात शिक्षणासोबतच कुपोषित, जेष्ठ नागरिकांचे प्रश्न, आरोग्यविषयक प्रश्न हाताळून जनसेवेचे कार्य युवा सेनेने सुरु केले आहे. मुंबईतही आदित्य ठाकरे यांनी भव्य आरोग्य शिबीर घेतले.
जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, तरुणांचे संघटन करून युवा शक्तीच्या उर्जेचा पुरेपूर वापर जनसेवेसाठी करावा हीच आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. त्यामुळेच 'शिक्षण, आरोग्य आणि रोजगार' या तीन क्षेत्रांत कार्य करणाऱ्या युवा सेनेचे अवघ्या वर्षभरातच व्यापक युवा चळवळीत रुपांतर झाले आहे. नव्या फळीचे नेतृत्व तयार करण्यासाठी झटणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नेतृत्व असणारी युवा सेना आता महाराष्ट्राबाहेर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीरसारख्या राज्यातही आपले पंख पसरवू लागली आहे. राजकीय पार्श्वभूमी असली तरी युवा सेनेने राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्योग क्षेत्र, समाजसेवा, कला, क्रीडा करमणूक क्षेत्रातील दिग्गजांना जोडण्याचे कामदेखील युवा सेनेने मोठ्या प्रमाणावर केले आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ आणि दिग्गजांना सोबत घेऊन नवा देश घडवण्याच्या देशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे शिवेसेनेच्या धर्तीवरच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणे हेच युवा सेनेचे उद्दीष्ट आहे कोणतेही नेतृत्व न लादता प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये नवे, उदयोन्मुख नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न युवा सेना करते आहे.
आवश्यक असेल तिथे 'सेना' आणि गरज भासेल तिथे 'सेवा' हा नव्या युगाचा मंत्र घेऊन युवा सेनेने आपली घोडदौड सुरु केली आहे. हेच तत्व उराशी बाळगून उद्याचा हिंदुस्थान घडविण्यासाठी देशाला उद्याचे नेतृत्व देण्यासाठी युवा सेना झटते आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेला ' युवा सेवा' हा मंत्र घेऊन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर 'युवा सेने'चे एका देशव्यापी चळवळीत रुपांतर होईल हे नि: संशय!
उद्याचे सुखी भविष्य घडविण्यासाठी या...'युवा सेने'त सामील व्हा!