02/05/2026
धार्मिक पर्यटनाला खासदार राजभाऊ वाजेंच्या सातत्याच्या पाठपुरवठ्यामुळे बळ; नाशिक ते अयोध्या-वाराणसी थेट रेल्वेसेवा
नाशिकहून अयोध्या-वाराणसीसाठी थेट अमृत भारत एक्सप्रेस, खासदार वाजेच्या मागणीला यश*l
नाशिक, दि. ३० एप्रिल २०२६: परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक विकास यांच्या संगमावर उभ्या असलेल्या नाशिक शहरासाठी अजून एक महत्वाच पाऊल पडलं आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अखेर साकार झाली असून, या यशामागे खासदार राजभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण आणि दूरदर्शी पाठपुराव्याची ठळक छाप उमटली आहे. नाशिकसारख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहराला देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांशी थेट जोडण्याची गरज अनेक वर्षांपासून प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम दि. २ डिसेंबर २०२४ रोजी खासदार वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत अयोध्या, तिरुपती, कटरा, वाराणसी आणि अजमेर या तीर्थक्षेत्रांसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
ही मागणी केवळ पत्रापुरती मर्यादित न ठेवता, तिचा सातत्याने पाठपुरावा करत ती केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणण्यात खासदार वाजे यशस्वी ठरले. परिणामी, भारतीय रेल्वे कडून नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा नाशिकच्या दृष्टीने विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
विशेषतः अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि बनारस – पुणे (हडपसर) या मार्गांवरील गाड्यांमुळे नाशिककरांसाठी धार्मिक प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुसंगत झाला आहे. यामुळे केवळ भाविकांनाच नाही, तर नाशिकच्या पर्यटन आणि अर्थकारणालाही नवी चालना मिळणार आहे.
या सेवांचे लोकार्पण दि. २८ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देखील या गाडीचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
‘'अमृत भारत एक्सप्रेस"’ ही केवळ एक रेल्वे सेवा नसून, ती आधुनिक भारताच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक मानली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षितता, स्वच्छता आणि आरामाच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा, स्वयंचलित दरवाजे, उन्नत आसनव्यवस्था आणि ‘कवच’सारखी सुरक्षा प्रणाली यांचा समावेश या गाडीत करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे नाशिक आता देशातील प्रमुख धार्मिक स्थळांशी अधिक घट्टपणे जोडले गेले असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.