21/04/2026
नाशिक शहरातील गणेश चौक परिसरातील ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या नाशिक महानगरपालिका हायस्कूल बंद करण्याच्या हालचाली थांबवून सदरील शाळा आधुनिक सुविधांनी सुसज्ज करून सुरू ठेवण्यात यावी, तसेच प्रस्तावित १०० बेड हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
गणेश चौक येथील मनपा हायस्कूल ही गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. आज अनेक माजी विद्यार्थी विविध शासकीय पदांवर, उद्योग क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यामुळे ही शाळा परिसरासाठी अभिमानाची बाब असून ती बंद करणे अन्यायकारक ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शाळेची जागा शैक्षणिक कार्यासाठी कायम ठेवून तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात, विद्यार्थ्यांना मूळ शाळेतच शिक्षण द्यावे आणि हॉस्पिटलसाठी पेलिकन पार्क येथील उपलब्ध जागेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, शहर उपाध्यक्ष तुषार जगताप, मिलिंद कांबळे, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, राहुल गोडे, अमित गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.