21/04/2026
📍नाशिक | २१ एप्रिल २०२६
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ म्हसरूळ येथील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक १ व माध्यमिक विद्यालय तसेच म्हसोबावाडी येथील मनपा शाळा क्रमांक २ या शाळांमध्ये अनेक मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत असून बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असूनही आवश्यक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
सदर शाळांमध्ये खालील प्रमुख समस्या आहेत..
१) शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने धोकादायक अवस्थेत असून नवीन इमारतीची तातडीने आवश्यकता आहे.
२) अतिरिक्त खोल्या नसल्यामुळे ICT लॅब, प्रयोगशाळा, वाचनालय, व्यावसायिक शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम या सुविधा विद्यार्थ्यांना देता येत नाही.
३) शाळेच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने धोका निर्माण होतो. शाळेच्या आसपास अपराधी आणि गांजा पिणारे अपप्रवृत्ती फिरत असल्याने शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामूळे शाळेला सुरक्षारक्षक यांची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे.
४) विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची अपुरी व निकृष्ट व्यवस्था असल्याने स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नवीन बांधकाम आवश्यक आहे.
५) पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.
६) ICT लॅब, प्रयोगशाळा, वाचनालय, व्यावसायिक शिक्षण, संगणक कक्ष, ई-लर्निंग साधने व आधुनिक शिक्षण सुविधांचा अभाव आहे.
७) विद्यार्थ्यांसाठी खेळाचे व इतर उपक्रमांचे साधनांचा अभाव स्वच्छता व देखभाल व्यवस्थेची कमतरता
वरील सर्व समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार शिक्षणासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
यासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. Dada Bhuse साहेब यांची आढावा बैठकी दरम्यान भेट घेऊन त्यांना प्रभाग क्रमांक १ मधील शाळांना या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे साकडे घातले.
यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या बैठकीत त्यांनी येणाऱ्या काळात शाळांच्या पटसंख्येत वाढ कशी होईल आणि अधिकाधिक विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित कसे होतील, यासाठी प्रत्येक शाळेचा सुस्पष्ट आणि दर्जेदार आराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा केवळ इमारतीपुरत्या मर्यादित न राहता त्या सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त असाव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत.
यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया असल्याने, या शाळांच्या बळकटीकरणासाठी सर्व मनपा नगरसेवकांनी पुढाकार घेऊन नियोजनबद्ध काम करावे, अशी देखील सूचना केली.
यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना, “एकही शाळा बंद पडू नये” यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. उलटपक्षी, जास्तीत जास्त नवीन शाळा उभारल्या जाव्यात आणि विद्यमान शाळांचा दर्जा उंचावला जावा, यासाठी महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देऊन शाळेसाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन देखील दिले.
या आढावा बैठकीला महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
#प्रभाग_१