District Agriculture Office Nandurbar

District Agriculture Office Nandurbar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from District Agriculture Office Nandurbar, Government Organization, Nandurbar.

29/09/2022

घोणस अळी ओळख व व्यवस्थापन

नंदुरबार, दि.29(जिमाका वृत्तसेवा) : काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमामार्फत ऊसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती दिसुन येते तसेच त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले असल्याने घोणस अळी बाबतची माहिती, अळीच्या दंशानंतर करावयाच्या उपाययोजना विषयी थोडक्यात माहिती...

अळीची ओळख :- या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्वः संरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या कीडीला अकाली आपला स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.

आढळ:- ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये ही आढळून येते.

खाद्य वनस्पती:- ही बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.

पिकांसाठी किती धोकादायक:- ही अळी पिकाचे फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.

अळीच्या काट्यांचा दंश झाल्यास काय होऊ शकते:- या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात. त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात, दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरुपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या अॅलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, अॅलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार:- काही तज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.

अळीचे नियंत्रण:- कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. तरी सर्वांनी कोणत्याही "केसाळ" किंवा "काटेरी" अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
0000

23/09/2022
23/09/2022

शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे. तरी काही वि...

21/09/2022

कृषी यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 816 लाभार्थ्यांना
11 कोटी 12 लक्ष अनुदानाचे वाटप
शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीनही योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात सन 2021-2022 या आर्थिक वर्षांत 1 हजार 816 लाभार्थी शेतकऱ्यांना 11 कोटी 12 लक्ष रूपयांचे तर सन 2022-2023 या चालू आर्थिक वर्षांत आजपर्यंत 266 शेतकऱ्यांना 1 कोटी 43 लक्ष रूपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सन 2021-2022 मध्ये 272 लाभार्थ्यांना 1 कोटी 21 लक्ष तर 2022-2023 मध्ये 46 लाभार्थ्यांना 18 लक्ष रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेतंर्गत सन 2021-2022 मध्ये 1 हजार 109 लाभार्थ्यांना 6 कोटी 33 लक्ष तर 2022-2023 वर्षांत 112 लाभार्थ्यांना 64 लक्ष रूपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतंर्गत सन 2021-2022 वर्षांत 435 लाभार्थ्यांना 3 कोटी 57 लक्ष तर 2022-2023 मध्ये 108 लाभार्थ्यांना 61 लक्ष रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पल्टी नांगर, ट्रॅक्टर ट्रॉली, मिनी दाल मिल, कंम्बाईन हार्वेस्टर, रिपरकमबाईंडर (ट्रॅक्टरचलित) मिनी राईस मिलसाठी कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी https://mahadbtmahait.gov.in पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली एकाच अर्जाद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी जमिनीचा सातबारा उतारा, 8 अ उतारा, बॅक पासबुक, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र या कागदपत्राची माहिती पोर्टलवर नोंदवावी. लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यााना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस संदेश देण्यात येतो.

सन 2022-2023 वर्षांपासून कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही बदल केले असून ते पुढील प्रमाणे आहेत. ट्रॅक्टर चलित औजारांसाठी आर.सी.बुक बंधनकारक राहील. रोखीने खरेदी न करता कॅशलेस पद्धतीने औजारांची खरेदी करणे बंधनकारक असेल. पुर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व रिपोर्ट प्रमाणेच औजाराची खरेदी करणे बंधनकारक राहील. एकाच वर्षात जास्तीत जास्त 3 औजारे किंवा अनुदान रक्कम 1 लाख पर्यंत लाभ देण्यात येईल. ज्या औजारासाठी अनुदानाची रक्कम रुपये 1 लाखापेक्षा जास्त आहे. अशा औजारासाठी एका वर्षांत फक्त एकच औजारासाठी अनुदान देय राहील. अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान 6 वर्ष ट्रॅक्टर चलित औचाराची किमान 3 वर्ष विक्री करता येणार नाही. 1 लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्र, औजारांसाठी एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधीत औजारासाठी अनुदान देय असेल.

लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून औजारे, यंत्रांचे दर कोटेशन, टेस्टिंग रिपोर्ट, मागास प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची छाननी झाल्यानंतर कृषि विभागामार्फत पुर्वसंमती प्रक्रिया पुर्ण होते. पुर्वसंमती दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत औजारे व यंत्रे खरेदी करुन बिल अपलोड करणे बंधनकारक आहे. जे पात्र शेतकरी दिलेल्या विहित मुदतीत सदर घटकांचा लाभ घेणार नाही त्यांची निवड आपोआप रद्द केली जाईल.

यांत्रिकीकरण औजारे व यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने कमी वेळात सर्व प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
0000

15/09/2022

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते किटकनाशक वापर
जनजागृतीच्या प्रचार वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार, दि. 15(जिमाका वृत्तसेवा) : किटकनाशकांचा सुरक्षित वापर व विषबाधा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग तसेच मे.आदामा इंडिया कंपनी प्रा.लि.तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, आदामा इंडिया कंपनी प्रा.लि.चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यासाठी आदामा इंडिया प्रा.लि.या कंपनीची सन 2022-2023 करीता नोडल कंपनी म्हणून निवड झालेली असून कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किटकनाशके हाताळणी व त्यांचा सुरक्षित वापराबाबत शेतकरी प्रशिक्षण, चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांमध्ये फवारणी पंप समवेत किटकनाशके हाताळणी, फेरोमन साफळ्याच्या वापराबाबत मार्गदर्शन, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी निष्कर्ष आधारीत फेरोमन साफळ्याच्या आधारे पहिली व दुसरी फवारणी बाबत मार्गदर्शन, तसेच फुलधारणा, आंतरमशागत, शेती बांधणी, पिकाला भर देणे, इत्यादी महत्वपुर्ण विषयासह किटकनाशकांचा सुरक्षित वापर व विषबाधा टाळण्यासाठी प्रचारवाहनाद्वारे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
00000

30/08/2022

Welcome to Department Of Agriculture, Government of Maharashtra

Address

Nandurbar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Agriculture Office Nandurbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share