जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

  • Home
  • India
  • Nanded
  • जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

03/06/2026
परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाईशेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारानांदेड, द...
03/06/2026

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई
शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

नांदेड, दि. ३ जून : राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७ अंतर्गत आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने, संस्थेने, शेतकरी उत्पादक कंपनीने अथवा शेतमाल व्यापाराशी संबंधित इतर घटकांनी आवश्यक परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी दिला आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये अनेक व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची खरेदी-विक्री विनापरवाना होत असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असतानाही काही व्यापारी व संस्था परवान्याविना शेतमाल व्यापार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. ५ जुलै २०१६ रोजी अध्यादेश क्रमांक १५ राजपत्रात प्रसिद्ध केला असून, त्याच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना ८ जुलै २०१६ रोजी निर्गमित करण्यात आल्या होत्या. तसेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार मुख्य अधिनियमाच्या कलम ६ (२) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार कलम ५ (ड) अंतर्गत परवाना घेणे आवश्यक राहील; मात्र अशा परवानाधारकांकडून बाजार समितीला कोणतेही बाजार शुल्क आकारता येणार नाही. कायद्यातील कलम ५ (ड) नुसार थेट पणन, खाजगी बाजार शेतकरी-ग्राहक बाजार आणि ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म या प्रयोजनांसाठी परवाने देण्यात येतात.

त्यामुळे शेतमाल व्यापार करणाऱ्या सर्व व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व अन्य संबंधित घटकांनी कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पणन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
०००००

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून...
03/06/2026

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावे

ॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

नांदेड, दि. ३ जून :- केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲप (BSA) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करता येणार असून वेळेची बचत होण्यासोबतच कार्यालयीन हेलपाट्यांपासूनही दिलासा मिळणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, जेणेकरून त्यांचे अनुदान बंद होणार नाही, असे आवाहन तहसिलदार, संगायो (शहर) डि . एन गायकवाड यांनी केले आहे.

राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणारे वृद्ध, विधवा, निराधार पुरुष-महिला तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांना यापूर्वी बँक, पोस्ट ऑफिस किंवा तहसील कार्यालयात जाऊन हयात प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागत होते. अनेकदा विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्याने लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत होते.

या अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी बेनिफिशरी सत्यापन ॲप (BSA) द्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्यास मान्यता दिली आहे.

लाभार्थ्यांकडे स्वतःचा मोबाईल उपलब्ध असल्यास ते स्वतः किंवा नातेवाईकांच्या मदतीने हयात प्रमाणपत्र सादर करू शकतात. तसेच ग्राम महसूल अधिकारी, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र आदींच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

विशेष सहाय्य योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत हयात प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0000

03/06/2026

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

नांदेड दि. 3 जून :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक-युवतीसाठी १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CDS कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी १४ जून २०२६ सकाळी १० वा. प्रशिक्षण केंद्रात उपस्थित रहावे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. नांदेड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा संनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 7 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW Portel (Resources - PCTC Nshik-CDS-६७) किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या, प्रवेशपत्र, त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परीक्षेसाठी आनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ई-मेल आयडी [email protected] व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

03/06/2026
2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना                                                      ...
02/06/2026

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड दि. 2 जून :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 2 व 4 जून 2026 हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 2 जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा व दि. 4 जून 2026 यादिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
00000

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणीभारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक 'गोजातीय प्रजनन व नियमन' विषयावर...
02/06/2026

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी

भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक 'गोजातीय प्रजनन व नियमन' विषयावर कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 2 जून:- राज्यातील खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवेची संख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व गुणवत्ता आणखी वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले.
औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू हॉल येथे 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ अधिकारी, सेवा पुरवठादार आणि संस्थात्मक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन (AI) सेवा आणि नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगच्या तांत्रिक एकत्रीकरणावर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या भविष्यकालीन धोरणांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन सेवा आणि NDLM डिजिटल ट्रॅकिंग आवश्यक असल्याने या तांत्रिक बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाच्या संख्यात्मक वाढीसाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी कृत्रिम रेतनाच्या कार्यात अधिकधीक पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे. खाजगी कृत्रिम सेवादातांनी याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या सोबतीने काम केले पाहिजे. या कामात खाजगी कृत्रिम सेवादातांना पशुसंवर्धन विभाग सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही उपस्थितांना डॉ. किरण पाटील यांनी दिले.

तज्ज्ञांचे सादरीकरण आणि तांत्रिक सत्र

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी आपले अनुभव आणि तंत्रज्ञान याविषयी सादरीकरण केले. बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-ABS जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास कशी सुधारावी, याबद्दल तांत्रिक माहिती दिली.
भारत पशुधन प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खाजगी कृत्रिम सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित सर्व प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन विविध मुद्द्यांवर अभिप्राय घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.
0000

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन                                                                  ...
02/06/2026

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन
नांदेड दि. 2 जून :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जून-2026 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

कृष‍ि विभागाची धडक कारवाई व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल                                    ...
02/06/2026

कृष‍ि विभागाची धडक कारवाई व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड दि. 2 जून :- मुखेड शहरात व‍िनापरवाना ब‍िटी कापुस बियाणाची विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील श्रीधर पेन्शलवार व‍िरुध्द मुखेड पोलीसात गुन्हा नोंदव‍िण्यात आला या कार्यवाहीत सुमारे 12 लाख 37 हजार 992 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
दिनांक 1 जुन रोजी रात्री मुखेड येथे नवा मोंढा परीसरातील संगमेश्वर कृष‍ि सेवा केंद्राजवळ एका कारमधुन अनाधीकृत र‍ित्या व‍िनापरवाना बिटी कापुस बियाणांची व‍िक्री सुरु असल्याची माहिती कृषी व‍िभागाला मिळाली त्यानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकातील पथक अध्यक्ष मोहिम अध‍िकारी जिल्हा परीषद सचिन कपाळे, ज‍िल्हा भरारी पथकातील सदस्य सचिव व जिल्हा गुणवत्ता न‍ियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, विभागीय कृष‍ि सहसंचालक कार्यालयातील गुणन‍ियंत्रण तंत्र अध‍िकारी बालाजी मुंडे, मुखेड पंचायत समितीचे कृष‍ि अध‍िकारी(गुन‍ि)अरविंद आकात, मुखेड कृष‍ि अध‍िकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक कुलद‍िप वाघमारे यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केली.
तपासणी दरम्यान तेलंगणा राज्यातील भैसा येथील श्रीधर पेन्शलवार हा कारमध्ये (टिजी १८ ए ४९७०) बीटी कापूस बियाण्यांचा साठा घेऊन विक्रीसाठी आला असल्याचे आढळून आले. वाहनातील पोत्यांची तपासणी केली असता आरसीएच-६६८ वाणाचे एकूण 192 पाकिटे आढळून आली. या बियाण्यांची किंमत सुमारे १ लाख ८७ हजार ९९४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय कार १० लाख ५० हजार असा एकूण १२ लाख ३७ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान संबंधिताकडे महाराष्ट्रात बीटी कापूस बियाणे विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना, पक्की पावती अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित वाणाला महाराष्ट्रात विक्री परवाना नसल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

संशयित बियाण्यांचे नमुने घेऊन ते बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी श्रीधर पेन्शलवार (रा. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) याच्याविरुद्ध बीज अधिनियम १९६६, बीज नियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये कुठेही अप्रमाणित बियाणे विक्री होत असल्यास तात्काळ कृषि विभागाकडे संपर्क साधावा तसेच रासायन‍िक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास क‍िंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना व‍िक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत ज‍िल्हा अधिक्षक कृषी अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000

गुटखा-पानमसाला,  खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाईअन्न व औषध प्रशासना...
02/06/2026

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई

नांदेड दि. 2 जून :- सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्यावतीने मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ व इतर अन्नपदार्थांवर, साठ्यांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडण्यात आली आहे.

प्राप्त गोपनीय माहिती व नियमित तपासणीच्या आधारे शुक्रवार 29 मे 2026 रोजी मे. एम.ए. शरीफ जुना मोंढा नांदेड या आस्थापनेची तपासणी करून आस्थापनेतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 718 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 14 हजार 880 किंमतीचा अन्न पदार्थ कायद्याचे उल्लघंन करत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे.

शनिवार 30 मे 2026 रोजी मे. रॉयल बेकरी, धनेगाव, ता.जि. नांदेड या पेढीतून रूपये 25 हजार 840 किंमतीचा मिल्क रस्क या मिथ्याछाप अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. रहिम किराणा दुकान माहूर या पेढीतून रिफाईंड सोयाबीन तेल (खुले) या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा 358 कि. ग्रॅ. रूपये 57 हजार 280 किंमतीचा अन्न पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. भैरूनाथ आईसक्रिम ॲण्ड कुल्फी हदगाव या पेढीतून कुल्फी, मिल्कशेक या अन्न पदार्थाचा 238 लिटर, रूपये 51 हजार 900 एवढया किंमतीचा साठा अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना व्यवसाय करीत असल्यामुळे नमुना घेवून नष्ट करण्यात आलेला आहे.

रविवार 31 मे रोजी मे. शोएब पान शॉप देगलूरनाका नांदेड, मे. दुर्गा पान शॉप इस्लापूर, ता.किनवट तसेच मे. साईश्रध्दा पान शॉप इस्लापूर ता.किनवट इत्यादी आस्थापनेत गुटखा-पानमसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात येवून एकूण 4 व्यक्तीविरूध्द संबंधित पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढया सिल करण्यात आलेल्या आहेत.

मंगळवार 2 जून 2026 रोजी मे. जयगोपाल कृष्णकुमार ॲण्ड कंपनी जुना मोंढा नांदेड या पेढीतून 1 हजार 348 कि. ग्रॅ. रूपये 1 लाख 3 हजार 346 एवढया किंमतीचा चनाबेसन (दिनार) या अन्न पदार्थाचा साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून व मिथ्याछाप असल्यामुळे नमुना घेवून जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मे. सैफ किराणा शिवाजी चौक, किनवट या आस्थापनेतून गुटखा-पानमसाला इत्यादि प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रूपये 47 हजार 445/- किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून संबंधित व्यक्तीविरूध्द पोलीस स्टेशन किनवट येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून सदरील पेढी सिल करण्यात आलेली आहे.

संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार, अ. नं. ‍गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने सहायक आयुक्त संजय चटटे व रा. मा.भरकड यांचे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांचे निर्देशान्वये पार पाडलेली आहे.
00000

Address

Yatri Niwas Road Badpura
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड:

Share