30/08/2024
विदर्भ स्तरीय दोन दिवसीय मच्छिमारांचे अधिवेशन सुरेश भट सभागृह नागपूर येथे संपन्न --
दिनांक 26.08.2024 ला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे झालेल्या विदर्भ स्तरीय मच्छिमारांच्या अधिवेशन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा विजयभाऊ वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्ष नेता, अध्यक्ष म्हणून श्री चंद्रलाल मेश्राम, माजी न्यायाधीश व माजी सदस्य राज्य मागासवर्ग आयोग व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ परिणय फुके, आमदार विधामपरिषद, श्री मनोहर चंद्रिकापुरे, आमदार मोरगांव-अर्जुनी तसेच दीनानाथ वाघमारे लेखक-"मच्छिमारामधील गरिबी व विषमता", श्री यशवंत दिघोरे, उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक, डॉ दिलीप शिवरकर, चिमूर, श्री प्रकाश डायरे,श्री अमोल बावणे से. नि. सहसंचालक, जयश्री बावनकुळे व डॉ लता वाघमारे उपस्थित होते. 25-26 आगस्ट ला दोन दिवसीय अधिवेशनात सहाही जिल्ह्यातील मच्छिमार समाजातील कार्यकर्ते, मच्छिमार सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, अभ्यासक, तज्ञ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"मच्छीमारांमधील गरिबी व विषमता याची कारणे व उपाय" या पुस्तकाचे लेखक व संशोधक श्री दीनानाथ वाघमारे हे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले कि एकूण सहा जिल्ह्यातील 31 तालुके व 163 गांवातील 1600 मच्छिमार कुटुंबाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण हे 1 संप्टें 2023 पासून सुरु होऊन अहवाल बनवीण्यापर्यंत एकूण दहा महिण्याचा कालावधी लागला. सर्वेक्षण ते अहवाल बनवितांना प्रत्यक्ष सर्वेक्षण, संगणीकीकरण, डेटा अनलिसिस व अहवाल लिहिणे इत्यादी प्रक्रियेत पदमश्री डॉ सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, भारत सरकार यांचे मार्गदर्शन लाभले तर भय्याजी पांढरीपांडे .इन्स्टिटयूट ऑफ सोसिअल वर्क चे प्राध्यापक डॉ अनिल सरगर यांनी सहकार्य केले. अहवालातील आकडेवारीनुसार सहाही जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत मच्छिमारांची लोकसंख्येचे प्रमाण 10.54 टक्के असून त्यांची एकूण लोकसंख्या 12.36 लाख एवढी आहे. जेव्हा कि भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या 2011 नुसार बारा लाख असून त्यातून तीन आमदार निवडून येतात. जेव्हा कि रामटेक लोकसभेचे खासदार जतीराम बर्वे यांच्या नंतर तीन आमदार निवडून देण्याइतकी लोकसंख्या असलेले परंतु मागील चाळीस वर्षात मच्छिमार समाजाला विधानसभा वा विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मच्छिमार समाजात भूमिहीनतेचे प्रमाण 67 टक्के असून भूमिधारीचे प्रमान 37 टक्के आहेत व मोठ्या प्रमाणात शेतमजूरीवर अवलंबित्व आहे तर वर्षभरातील 365 दिवसापैकी धान पेरणी व धान कापणीच्या वेळी मोठ्या मुश्किलीने 84 ते 131 दिवसच काम उपलब्ध होते व उरलेल्या दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा येथील राज्यात रोहणी, मिरची तोडणे, आंबे फोडणे इत्यादी कामासाठी स्थलांतर होते व उन्हाळ्यात तेंदू पत्ता तोडनीसाठी बालाघाट, गडचीरोली येथे वास्तव्य असतें. तसेच यांची 40 टक्के घरे सिमेंट व विटांची असून उरलेली 60 टक्के घरे हि कुळाची, गवताच्या झोपड्या व मातीची आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय मिळाले असले तरी 16 टक्के लोक आजही उघड्यावर शौचास जातात व 53 टक्के गांवे अजूनही हागनदारीमुक्त झालेली नाहीत. शिक्षणात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अन्य समाजाच्या तुलनेत जास्त असून उच्च शिक्षणातील प्रमाणही कमी आहे. मच्छिमार समाज हा भटक्या जमातीतील ब गटात मोडतो व त्यात त्यांच्या आरक्षणाचे प्रमाण अडीच टक्के आहे तर एकूण लोकसंख्येत मच्छिमारांचे प्रमाण 10.54 टक्के असून हे प्रमाण विषम प्रमाणात आहे, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. तसेच अठरा ते तीस वर्ष वयोगटातील लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के असून बेरोजगारीचे प्रमाण 24.41 टक्के असून राज्याच्या बेरोजगारीच्या प्रमाणात तीन पटीने जास्त आहे, त्यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आहे. वार्षिक उत्पन्नमध्ये पंचवीस हजार उत्पन्न असणाऱ्याची संख्या वीस टक्के असून पन्नास हजार रुपये कमावणाऱ्यांची संख्या 32 टक्के असुन एकूण गरिबीचे प्रमाण 52 टक्के आहे, हे आणखी भयावह आहे. कर्ज घेतांना भूमिहीनतामुळे व तारण नसल्यामुळे बँकेतून कर्ज घेण्याचे प्रमाण केवळ 18 टक्के असून खाजगी संस्था व बचत गटाकडून कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन करतांना श्री विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले कि आतापर्यंत मी स्वतः 35 पेक्षा जास्त पुस्तकाच्या प्रकाशन सोहळाला उपस्थित होतो, मात्र एखाद्या व्यक्तीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढा मोठा समुदाय उपस्थित राहतांना मी पहिल्यादाच बघतोय. पूर्व विदर्भात या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळण्याची गरज आहे. आणि तुम्हाला हमी देतो कि 2025 मध्ये या समुदायाचा एक तरी प्रतिनिधी म्हणून विधानसभा / विधानसपरिषदेत कांग्रेस पक्षातर्फे आमदार दिला जाईल. मच्छिमार समाजात मागासलेपणा व शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे ते वाढविण्याची गरज असून त्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात वसतिगृहाची व्यवस्था सुरु होत आहे. तसेच येणाऱ्या काळात जातनिहाय करून त्यात वंचित असलेल्या समुदायाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आमचे सरकार आल्यावर मच्छिमारांमधील गरिबी कमी करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी जतीरामजी बर्वे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येऊन त्या द्वारे युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येईल व व्यवसायासाठी आर्थिक विकास महामंडळ द्वारा कर्ज उपलब्ध केले जाईल. तसेच माझ्या मतदार संघात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सात हजार पेक्षा जास्त घरांची मंजुरी व निधी प्राप्त झालेला आहे. तसेच प्रत्येक घरासाठी असणारा दीड लाख निधी वाढवून तीन लाख पर्यंत वाढ़ करण्यात येईल. झिरो माईल, नागपूर येथील विदर्भ मच्छिमार संघाची जागा संघाला देण्यात येईल. हा समुदाय नदी, नाले, ढोडे, तलाव याच्या आसपास मोठ्या प्रमाणात वसलेला असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो, परंतु मत्स्योत्पादन वाढीसाठी व त्यांच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान रुजविण्यासाठी पूर्व विदर्भात नवीन मत्स्य प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येईल. मच्छिमार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी अहवालात करण्यात आलेल्या धोरण बदलासाठीच्या शिफारशी लागू करण्याची हमी देतो.
आमदार डॉ परिणय फुके आपल्या भाषणात म्हणाले कि मच्छिमार संस्थासाठी असलेला जून 2019 चा शासन निर्णय मच्छिमारांच्या हिताचा असून त्यात कसलाही ही बदल करण्यात येणार नाही व पाटबंधारे विभागाचे कोणतेही तलाव वा जलाशय खाजगी संस्था वा ठेकेदाराना देण्यात येणार नाही, याची हमी देतो. व मच्छिमार समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच केंद्र सरकार द्वारा मत्स्य उत्पादन दुप्पट करणारी निल क्रांती योजना 2015 पासून सुरु झाली व मत्स्य संपदा योजना 2020 पासून अंमलबजावणीसं आलेली आहे, त्याचा सर्व मच्छिमारांनी लाभ घ्यावा. तसेच मच्छिमारांच्या समस्या समजून घेणे व त्या सोडविण्यासाठी लवकरच मुंबई येथे सचिवसोबत बैठक बोलावन्यात येईल. या प्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले कि भंडारा गोंदिया जिल्हा हा माजी मालगुजारी तालवांचा जिल्हा असून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते व त्यांना मत्स्य विभागाच्या विविध योजनाचा लाभ देण्यासाठी माझे सततचे प्रयत्न राहिले आहेत. अध्यक्ष स्थानी असलेले श्री चंद्रलाल मेश्राम म्हणाले कि मागील कांही वर्षांपासून जिल्हा मच्छिमार संघावर असलेले एनसीडीसीचे कर्जची सबब पुढे करीत राज्य सरकार जिल्हा संघांना तलाव/ जलाशयाचे वाटप करीत नाही, हे अन्यायकारक आहे. जिल्हा संघांचे उत्पन्न वाढीचे प्रयत्न झाले पाहिजेत व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे. तसेच येऊ घातलेले नवीन मत्स्य धोरण मच्छिमारांचे उत्पन्न वाढीचे व त्यांच्या विकासाचे असावे हीच अपेक्षा करतो.
याप्रसंगी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी संजीव भुरे व सचिन मेश्राम यांनी सहा महिनेपर्यंत न थकता श्रम घेतले व डेटा एन्ट्री व सांगणकीकरण प्रक्रिया करण्यात व अहवाल पूर्ण करण्यास दादा इंटरनशनलचे गजेंद्र चाचरकर, देवानंद वावरे, मयुरी शिंदे व रुचिका जाधव यांनी अथक प्रयत्न केले. यासाठी पाहुण्यांच्या हस्ते सर्वांचे शाल, श्रीफळ व मोमेन्टो देऊन सत्कार करण्यात आला. मच्छिमार अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलतांना मुकुंद अडेवार म्हणाले कि सर्वेक्ष न ते अहवाल व अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यातील मच्छिमार संस्था व त्यांचे पदाधिकारी व समाजिक संघटनाचे पदाधिकारी, नोकरवर्ग, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने, आर्थिक सहकार्याने व प्रत्यक्ष सहभागाने हे अधिवेशन यशस्वी होऊ शकले, त्या सर्वांचे संयोजन समीतीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.
संयोजन समिती,
विदर्भ स्तरीय मच्छिमाराचे अधिवेश
BJP INDIA BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Dr. Parinay Rama Ramesh Fuke