11/10/2020
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांना पुढील मुद्दे मांडले:
-
-
मी पहिल्याप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो, कारण त्यांचा आज स्मृतिदिन आहे.
आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून मेट्रो आणि मेट्रोसाठी आरे येथे बांधत असलेल्या कारशेडचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, निवडणूक लढविणाऱ्या एका पक्षाचा प्रमुख होतो, आजही आहे. तेव्हा आम्ही त्या गोष्टीला विरोध केला होता.
आंदोलने झाली, विरोध झाला, रातोरात झाडे कापली गेली व जे सत्याग्रही होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की,ज्यांनी पर्यावरणासाठी सत्याग्रह केला, आंदोलन केले, त्या पर्यावरणवाद्यांवरील सर्व गुन्हे हे सरकार मागे घेत आहे, तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत.
आरेची जवळपास ६०० एकर जागा, आपण तिथे जंगल घोषित केले होते. आदिवासी, आदिवासी पाडे, तबेले असतील, तिथल्या कोणाच्याही अधिकारावर किंचितसुद्धा गदा येऊ न देता आपण हे जंगल घोषित केले. आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आढावा घेतल्यानंतर या जंगलाची व्याप्ती आता जवळपास ८०० एकर झाली आहे.
आरेमध्ये जी कारशेड होणार होती,ती कारशेड आता कांजूरमार्गला होणार आहे. मग किंमत किती? जमिनीची किंमत कोण देणार? झालेला खर्च वाया जाणार का? त्या बाबतीत मी सांगतो, कांजुरची सरकारी जमीन शून्य रुपये किमतीने मेट्रो कारशेडसाठी आपण दिली आहे आणि तिथे कारशेड उभारण्याचे आदेश मी काल दिले आहेत.
"जे विकेल, तेच पिकेल" ही योजना शासनाने राबविण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरु केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे.
केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी शासन संवाद साधत आहे. कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
शिवभोजन योजनेअंतर्गत लॉकडाऊन काळात आजही ५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत २ कोटी २ लाख लोकांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्यात आतापर्यंत ४४९ कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. १५,१८,७३४ कोरोना रुग्णांपैकी १२,५५,७७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जवळपास ७९ ते ८० टक्के रुग्णांमध्ये मध्यम ते सौम्य लक्षणे आहेत.
महाराष्ट्र हे जगातील एकमेव असे राज्य असेल जिथे जनतेला विश्वासात घेऊन शासन कोविड विरोधात लढा उभारत आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या अभियानात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांसह पोलीस आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो.
मास्क,स्वच्छता व सोशल डिस्टंसिंगची त्रिसूत्री पाळा. लहानपणीपासून आपण ऐकत असतो,बाहेरून आल्यावर हातपाय धुवा,कपडे बदला. आताही तेच करायचं आहे. सोपं आहे,फक्त आपण ते काटेकारेपणे पाळायला हवं. स्वत: मास्क वापराच पण ज्यांनी मास्क घातले नाहीत त्यांनाही सांगा.या आजाराला घरात प्रवेश देऊ नका.
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. वाशिममध्ये कालच आरटीपीसीआर लॅबचे लोकार्पण झाले. आम्ही अधिक प्रमाणात हॉस्पिटल्स, सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. अवघा महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जसं बस, इतर वाहतूक अगदी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही मास्क काढू नका. बाहेर असताना मास्क सतत घाला.
रेस्टॉरंट आता सुरू झालेत. जीमबद्दल आमची चर्चा, विचार सुरू आहे. तिथल्या धोक्यांबद्दल नीट विचार करायला हवा. त्यामुळे लवकरच यासंदर्भात निर्णय होईल.
लोकल हा फार कळीचा मुद्दा आहे. सगळ्यांनाच लोकलमधून प्रवास करायचा आहे. ती फार मोठी गरज आहे, हे मला माहीत आहे. पण, तिथे होणारी गर्दी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांची काळजी, त्यांच्या अडचणी आम्हाला समजतात. विश्वास ठेवा, आम्ही लवकरच यासंदर्भात काही निर्णय घेऊ.
ही निव्वळ जबाबदारी नाही, आमचं आमच्या जनतेवर प्रेम आहे. म्हणूनच आम्ही फार काळजीपूर्वक, हळूहळू पुढे जातोय. मंदिरांचा प्रश्नही आहे. पण, कशावरच घाईगडबडीत निर्णय घेता येणार नाही.
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत मी जेव्हा राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली, त्यावेळी मला काही गोष्टी चांगल्या मिळाल्या. जाहिराती आपण रेल्वे, बस सगळीकडे करत आहोत. कोल्हापूरमध्ये दुकानांवर स्टिकर लावले आहेत, "मास्क नाही, प्रवेश नाही!"
आपण आता विचार करा, मास्क हवा की लॉकडाऊन हवा? हात धुणे बरे की लॉकडाऊन बरा? एकमेकांपासून अंतर ठेवणे बरे की लॉकडाऊन हवा? कामावर जायला हवे की न जाणे?
अनावश्यक घराबाहेर पडू नका. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ द्यायची नाही.
ज्या काही सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत, आजपर्यंत तुम्ही त्या पाळल्या, जे सहकार्य आजपर्यंत तुम्ही केले, तेच सहकार्य मला यापुढे सुद्धा पाहिजे. हळुवारपणे लोक थोडे निर्धास्त होत आहेत, निर्धास्त होऊ नका, मास्क तोंडावर असलाच पाहिजे.
आपण अत्यंत खबरदारीने, सुजाणतेने, सजगतेने, आपल्याला हवे तसे आयुष्य जगणार आहोत, कोरोना व्हायरस वगळून! ज्या ज्या सूचना आम्ही आपल्याला आजपर्यंत देत आलो, त्या सूचना आपण पाळल्या, यापुढे सुद्धा त्या अत्यंत कटाक्षाने पाळण्याची गरज आहे.
एक क्षण सुद्धा बेसावध राहू नका, गाफील राहू नका आणि कोरोनाचा बळी ठरू नका!
जय हिंद, जय महाराष्ट्र!