23/05/2014
गोपाळ गणेश आगरकर..एक धगधगता विचार प्रवाह..
आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता ,
बुद्धिप्रामाण्य , व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक
तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने
समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे
समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज
परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे,
बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे
अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ
तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ
आगरकरांकडे जाते.
राजकीय
स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे.
बालविवाह,
अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट
रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे
ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय
स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये
त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८
साली त्यांनी ‘ सुधारक (वृत्तपत्र) ’ हे वृत्तपत्र सुरू
केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद,
भौतिकता या मूल्यांचा प्रचार
त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था ,
चातुर्वर्ण्य , बालविवाह, ग्रंथप्रामाण्य -
धर्मप्रामाण्य , केशवपन इत्यादी अन्यायकारक
परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा ,
पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे
इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित
केले जात होते.
इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ
नामदार गोखले यांनी सांभाळली होती.
आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते.
बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य
तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य
ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे
आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते.
स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी
आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते.
राजकीय व सामाजिक बाबतीत समता , संमती व
स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता
शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे,
निदान होईल तितके सारखे सुख
मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक
होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत
विचारसरणी होती. ‘ विचारकलह हा
समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत
होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे
त्यांना टोकाचा विरोध झाला.
सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच
त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.
पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने
त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.