26/08/2024
भाजपा म्हणजे भ्रष्टाचार!
भारताचा इतिहासात भारताला ब्रिटीशांपेक्षाही जास्त कोणी लुटले असेल तर ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने! भाजप म्हणजे भ्रष्टाचार हे समीकरण तयार झाले आहे. यातून महाराष्ट्राचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज देखील सुटलेले नाहीत.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे कामात एक वीटही न रचता २,५८१ कोटींच्या नियोजित कामाची रक्कम प्रशासकीय मान्यतेने ३,६४६ कोटी रुपये केली. या मंजूर रक्कमेपैकी २,५७३ कोटी २३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती उपलब्ध आहे. एकही वीट न रचता हे पैसे कशासाठी खर्च केले? हा भ्रष्टाचार नाही का?
दुसरे उदाहरण म्हणजे ८-९ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाचे औचित्य साधून भलामोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फूट उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. जमिनीपासून १५ फूट उंच बांधकाम व त्यावर २८ फूटांचा पुतळा अशी एकूण ४३ फूट उंची होती.
पुतळ्याची किंमत २, ४०,७१,००० रुपये. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभालीसाठी ५ कोटींची तरतूद केली होती. मालवणचाच सुपुत्र असलेल्या कल्याणच्या जयदीप आपटे याने हे शिल्प तयार केल्याची माहिती मिळाली आहे. नौदलाने उभारलेल्या पुतळ्यात भ्रष्टाचार फक्त मोदीच करु शकतात.
भारतीय नौदल, महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा पुतळा उभारला गेला होता. ज्या छत्रपतींनी नौदल आरमार उभा करुन देशाला नौदलाचे महत्त्व पटवून दिले, त्याच नौदलाकडून छत्रपतींचा पुतळा उभारण्यात योगदान ही मोठी बाब होती. मात्र नौदलाने उभारलेला हाच पुतळा भाजपच्या भ्रष्टाचारामुळे अवघ्या ८-९ महिन्यात जमीनदोस्त झाला आहे.
भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा भाजपाने पार केल्या आहेत. या नीच पक्षाला येत्या विधानसभा निवडणूकीत मुळासहीत उपटून फेकणे ही महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेची जबाबदारी आहे.
- तुषार गायकवाड