14/04/2026
आज (१४ एप्रिल) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती...
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मेजर सुभेदार रामजी आंबेडकर आणि भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. उपेक्षित जातीत जन्मल्याने तत्कालीन समाजाकडून मिळणारी भेदभावाची वागणूक पाहून ते अस्वस्थ झाले. ही अवस्था बदलण्यासाठी उच्च विद्याविभूषित होण्याचे त्यांनी ठरवले.
१९०७ साली मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळवली. १९१२ साली मुंबई विद्यापीठातून एम.ए. झाल्यावर सयाजीराजांचेच आर्थिक साहाय्य घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जर्मनीतील विद्यापीठांतून एम. एससी., पीएच. डी., बॅरिस्टर, डी. एससी, डी.लिट. आदी पदव्या प्राप्त केल्या.
उच्च शिक्षणानंतर त्यांनी शोषित, उपेक्षितांच्या उद्धारासाठी मंदिर प्रवेश, शिक्षण, पिण्याचे पाणी या हक्कांसाठी तसेच अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलने केली. या समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असे सांगून प्रेरित केले. देशासाठी आदर्शवत अशी ‘राज्यघटना’ तयार केली, जिचे जगभरात कौतुक झाले. स्त्रिया, उपेक्षित वर्ग, कामगार, शेतकरी यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. या अलौकिक कार्यामुळेच जनतेने त्यांना प्रेमाने ‘बाबासाहेब’ असे संबोधले.
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त शतश: नमन...
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #घटनाकार #महान_समाजसुधारक #शिक्षणतज्ज्ञ #जयंती #अभिवादन