26/01/2022
आदरणीय खा.लोकनेते शरद पवार साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा.सतीश राऊत यांनी आदरणीय शरद साहेबांचे आजरापण आणि त्यावर साहेबांची लढण्याची जिद्द यावर लिहलेला लेख अवश्य वाचा.
साहेबांचे आजारपण : बचेंगे भी और लडेंगे भी !
समाजात काही पेशे असे आहेत की, त्या पेशातील व्यक्तींशी चांगले संबंध असावेत परंतू त्यांच्याकडे जाण्याची कधी वेळ येऊ नये. पोलीस, कोर्ट, डॉक्टर हे त्यापैकी महत्वाचे पेशे आहेत. वैद्यकीय पेशाबाबत हेच मत साहेबांनी ७ जुलै,२०१८ रोजी बाणेर-बालेवाडी मेडीकोज असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं. साहेब म्हणाले '' वैद्यकिय क्षेत्रातील अनेक डॉक्टर मंडळींशी माझे कायम जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतू असे असले तरी दवाखान्यात जाण्याची पाळी कुणावरही येऊ नये अशी माझी भावना असते.... मला मात्र डॉक्टरांकडे अधून-मधून जावें लागले. '' पुढे भाषणात साहेबांनी कर्करोगासारख्या दूर्धर आजाराविरूद्धच्या त्यांच्या समरप्रसंगाला उजळणी दिली. ह्या निकाराच्या लढाईचा प्रत्येक प्रसंग वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत आणि अनुभवी तज्ज्ञांच्या अंगावर काटा उभा करत होता. मी हे पुन्हा ऐकले होते परंतू साहेबांच्या त्या लढाईचा थरार काही कमी झाला नव्हता.
साहेबांचा डॉक्टरांकडे जाण्याचा पहिला मोठा प्रसंग घडला तो २००२ सालच्या प्रारंभी. दाढ सारखी दुखते म्हणून ते कुलाब्याच्या डॉ. व्हीक्टर रॉड्रीग्ज ह्या दंतवैद्यांकडे गेले. दाढेची तपासणी करताना साहेबांच्या डाव्या गालाला आतून लहानशी गाठ असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यांना कॅन्सरबाबत शंका आली. तपासणी केली तर शंका खरी निघाली. सगळ्या कुटूंबांसाठी हा फार मोठा धक्का होता. कॅन्सर नाव उच्चारलं तरी काळजाचं पाणी होतं. इतकी भयानक दहशत पसरली आहे ह्या आजाराची ! निदान झालं तसं तपासण्यांचं प्रमाण वाढलं. शस्त्रक्रिया कधी-कुठे करायची ? ह्यात पारंगत डॉक्टर कोण ? वगैरे शोधकार्य सुरू झालं. कुणीतरी अमेरिकेत न्युयॉर्कमधील स्लोएन केटरींग कॅंन्सर सेंटर ह्या हॉस्पीटलचं नाव सुचवलं. साहेब न्युयॉर्कला गेले..तिथेही तपासण्या झाल्या. शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. तपासण्या दरम्यान तेथील डॉक्टरांच्या तोंडी आलं की, ते अशा प्रकारच्या आजारावरील शस्त्रकिया करायची असली की भारतामध्ये मुंबईतील माझगांव भागात असलेल्या प्रिन्स अली खान इस्पितळातील डॉ. सुलतान प्रधान यांचा सल्ला आवश्यकतेनुसार घेतात. साहेबांना आश्चर्य वाटलं. त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, अमेरिकेत आपणाला झालेल्या आजारावर महिन्याकाठी तीन-चार ऑपरेशन्स आम्ही करतो. परंतू डॉ. सुलतान प्रधान अशी ऑपरेशन्स दिवसाला ३-४ करतात, त्यामुळे त्यांचा हात अधिक सफाईदार आहे. साहेब म्हणाले ''तुम्ही अमेरिकावाले भारतातून सल्ला घेत असाल तर मी भारतातच तेही मुंबईत जाऊन ऑपरेशन करतो.''
झालं ! साहेबांनी अमेरिका सोडली आणि कर्करोगाची गाठ काढण्यासाठी गाठ घेतली मुंबईतल्या डॉ. सुलतान प्रधानांची ! डॉ.सुलतान प्रधान मुस्लीम समाजातील जवळपास साहेबांच्याच वयाचे ,सडसडीत नाजूक बांध्याचे ,नेहरूंसारखे गोरेपान ,अतिशय मृदू वाणीचे आणि कोमल स्वभावाचे सज्जन गृहस्थ ! त्यांच्याकडे आज ही पाहिले तर वाटते की, शस्त्रक्रिये करीता का होईना इतक्या निरागस माणसाकडून धारदार सुरी कशी चालवली जात असेल ? पण ह्या तारणहाराला परवरदिगारने तेवढा जिगरपणा दिला आहे. लालबहादूर शास्त्री नव्हते का प्रसंगी 'मेणाहून मृदू आणि वज्राहूनी कठीण ! ' निश्चयाच्या महामेरूची आणि सुश्रूताची पहिली गाठ पडली तशा पुन्हा नव्याने तपासण्या झाल्या आणि शस्त्रक्रियेचा करण्याचा दिवस ठरला ११ मार्च २००२. साहेबांच्या गालावर शस्त्रक्रिया झाली. सर्व काही ठिकठाक पार पडलं आणि थोड्याच दिवसांत साहेब पुन्हा कामाला लागले.
पण हे दुखणं एवढ्यावरंच थांबणारं नव्हतं. दोन वर्षात खालच्या जबड्याच्या डाव्या बाजूला पुन्हा त्याच आजारानं डोकं वर काढलं. हा मोठा धक्का होता. पण साहेबांनी दूसऱ्या मिनिटाला ह्या आजाराशी पुन्हा लढायचं ठरवलं. हे द्वंद्व असं होतं की, ज्यात दोघांपैकी एकाचा अंत हा ठरलेला. साहेबांनी कॅन्सरशी अटीतटीची लढाई करण्याचा निग्रह केला. पण त्या निग्रहाची कसोटी घेणारा क्षण लवकरच आला. तपासणीचे रिपोर्ट पाहून एक नवीन डॉक्टर इतर सहकाऱ्यांच्या कानात कुजबूजू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे आशा मावळल्याचे भाव साहेबांनी ओळखले आणि ' काय ते स्पष्ट सांगा ! ' असे त्यास सुनावले. '' साहेब , तुमची काही इच्छा असेल, कागदपत्रांची पुर्तता करायची असेल तर ते करून घ्या. तुमच्याकडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ नाही.'' असं म्हटल्यावर दूसरा कुणीही असता तरी तिथेच अर्धमेला झाला असता. पण ह्या लढवय्याने त्या नवख्या डॉक्टरला तात्काळ सुनावलं '' अरे माझं जगणं-मरणं तू कोण सांगणार ? तो यम का काही असतो ना , येऊ दे त्याला ; वाटेतच आडवा करीन आणि दर आठ-दहा वर्षांनी तुझ्या तब्येतीची चौकशी करीत जाईल !'' त्या डॉक्टरने नंतर स्वत:च आटोपतं घेऊन पोबारा केला असेल. ह्या लढाईत साहेबांनी एकच चिंता डॉ. सुलतान प्रधानांकडे बोलून दाखवली. शस्त्रक्रियेत डाव्या जबड्याजवळचा बराचसा भाग कापून काढावा लागणार , अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेनंतर बोलता येईल का ? ही ती शंका ! डॉ.सुलतान प्रधानांनी आयुष्यातलं सगळं कसब पणाला लावून वाणी शाबूत ठेवण्याचं वचन दिलं. ३ एप्रिल,२००४ रोजी कर्करोगाचं दुसरं आणि अखेरचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं.
डॉ. सुलतान प्रधानांना कोटी-कोटी धन्यवाद द्यावयास हवेत. त्यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज जिवंत ठेवला. ऑपरेशन झाले परंतू नंतरचा त्रास कमी होत नव्हता. पुन्हा उद्भव होऊ नये म्हणून साहेबांवर रेडिअशन थेरेपी सुरू झाल्या . रेडीयेशनच्या झळांनी त्यांचा चेहरा लाल व्हायचा; अगदी भाजून निघायचा . पण सहन केलं साहेबांनी. खाण्या-पिण्याचे हाल झाले ;अन्न द्रवरूपातच घ्यावं लागलं; गिळताना होणारा त्रास सोसावा लागला ; शस्त्रक्रियेने चेहऱ्याचां आकार बदलला. हा बदल ही साहेबांनी स्विकारला. अशातच निवडणूक आयोगाने २० एप्रिल,२००४ पासून लोकसभा निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला. साहेब नुकत्याच झालेल्या ऑपरेशनची तमा न बाळगता प्रचारासाठी बाहेर पडले. साहेबांचे मित्र डॉ. रवी बापट सतत सोबत राहतील असे ठरले. धुवाळीसाहेब सांगतात की, साहेबांना भाषण करताना जबड्याला वेदना होत. तोंडातून रक्त बाहेर येई. पण साहेब लाळेसोबत येणारे रक्त पांढऱ्या रूमालाने पुसून पुन्हा भाषण करायचे. उच्चारांच्या स्पष्टतेवर मर्यादा आल्या होत्या. पण साहेब मागे हटले नाहीत. ते बोलत राहिले-चालत राहिले. त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. कॅन्सरला हरवले आणि निवडणूक जिंकली. १५ वर्षे झाली कॅन्सरने पुन्हा तोंड वर काढले नाही. साहेबासारखी विजिगीषू वृत्तीची माणसं नशीबाला किंवा नियतीला दोष देत बसत नाही. संकटाने हतबल होत नाहीत. ' झाले ते झाले , रडत काय बसायचे ? आता पुढे जायला हवे !' अशी खूणगाठ मनाशी बांधतात आणि पुन्हा झेप घेतात. लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये असं म्हणतात. ह्या पोशिंद्याने तर नंतर दहा वर्षे कृषि आणि अन्न खात्याची जबाबदारी सांभाळून देशाच्या भुकेचा प्रश्न मिटवला. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं.
साहेब खाजगीत अथवा जाहीर चर्चेत कॅन्सरवर भाष्य करणं टाळतात कारण त्यांना कोणत्याही गोष्टीचं भांडवल केलेलं आवडत नाही. साहेबांसारख्या वीराला सहानुभूती त्याज्य असते. साहेब कॅन्सरवर पहिल्यांदा बोलले ते २०१३ साली अकोल्यामधील शेतकरी मेळाव्यामध्ये ! विदर्भातील शेतकऱ्यांना ' लढा, आत्महत्या करू नका !' असा सल्ला देण्यासाठी. ' संकटावेळी मन घट्ट करायचं असतं ; प्रतिकुलतेचा आणि दु:खाचा धीराने सामना करायला हवा ' हे त्यांना त्यातून सांगायचं होतं. नंतर बोलले ते साताऱ्यामधील गौरीशंकर शैक्षणिक संस्थेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी. ह्या संस्थेचे संस्थापक मदन जगताप यांचे शरीर अपघातामुळे कमरेखाली पुर्णत: लुळे पडले होते. मात्र जगतापांनी कुबड्यांवर देखील चालता येत नाही अशी अवस्था असली तरी जिद्दीच्या जोरावर साताऱ्याजवळ इतके सुंदर शैक्षणिक संकूल उभारले याचे साहेबांना भारी कौतूक वाटले. ही बहादूरी पाहून कार्यक्रमाप्रसंगी साहेब त्यांच्या आजारपणाचे अनुभव व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
साहेबांनी कर्करोगावर यशस्वी मात केल्याबद्दल जाहीर गौरवोद्गार काढले ते राजसाहेब ठाकरे यांनी ! सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने साहेबांच्या पंच्चाहत्तरी निमित्त वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये राज्यातील सर्वपक्षीयांतर्फे महाराष्ट्राच्या आधारवडाचा सत्त्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी साहेबांबाबत काढलेले उद्वार आजही युट्यूबवर ऐकले की अंगावर शहारा येतो.
'' मी अनेकदा साहेबांबद्दल अनेक मथळे वाचले, त्यातला एक परिचित मथळा की साहेब म्हणजे तेल लावलेला पहिलवान ! हातालाच लागत नाही !.... हाताला लागत नाही याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा ... मला माफ करा पण एका आजाराच्या देखील हाताला ते लागले नाहीत. तिथूनही निसटले ! हे काही साधं सोपं नाही. पवार साहेब नावाचं असं एक वेगळं रसायन परमेश्वराने बनवलं. महाराष्ट्राचं नशीब की ते महाराष्ट्राला दिलं. ह्या रत्नाला मी मन:पुर्वक सलाम करतो. ''
साहेबांचा दैवावर विश्वास असो वा नसो पण कण्हेरीच्या मारूतीच्या कृपेनेच हा पहिलवान कळी-काळाच्या हाती लागला नाही असं मला वाटतं.
हा होता ऐकलेला अनुभव. पण साहेबांकडे मी २००९ मध्ये रूजू झाल्यापासून किरकोळ प्रसंग वगळता तीन-चार लक्षात राहण्याजोगे प्रसंग अनुभवास आले.
डिसेंबर महिना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा. दिल्लीतली थंडी अतिशय कडाक्याची , बोचरी थंडी. ह्या थंडीपासून संरक्षण करायचं म्हणजे केवळ स्वेटरवर भागत नाही. अंतर्वस्त्रावर थर्मल वेअर्स, त्यावर कपडे, कपड्यांवर स्वेटर आणि झालंच तर त्यावर कोट असे अनेक थराचे ( मल्टीलेअर) कपडे घातल्याशिवाय थंडीपासून सुटका होत नाही. घराघरात उब राहण्यासाठी दिवस-रात्र विजेवर चालणारे हिटर्स असतात. २ डिसेबर,२०१४ रोजी अशाच एका कडाक्याच्या थंडीत साहेब , सुप्रियाताई आणि वहिनी संध्याकाळच्या जेवणानंतर बाहेर शेकोटी पेटवून तिच्या कडेने खुर्चीवर बसून हात शेकत बसले होते. गप्पा चालू असताना शेकोटीत काटकी टाकण्यासाठी साहेब खुर्चीवरून खाली झुकले तशी खुर्ची कलंडली आणि साहेबांचाही तोल गेला. सावरले त्यावेळी उजव्या मांडीच्या वरच्या भागातून कळा येऊ लागल्या. वेळ जाईल तशा वेदना असह्य होऊ लागल्या. दिल्लीतील दवाखान्यात तपासण्या केल्या असता उजव्या पायाच्या खुब्याचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. खुब्याचे हाड बदलणे म्हणजे हीप रिप्लेसमेंट नावाच्या शस्त्रक्रियेवाचून पर्याय नाही हे कळल्यावर सुप्रियाताईंनी साहेबांना मुंबईला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश्वर शिंपी आणि किरण ह्या दिल्लीच्या पी.ए. मंडळींनी धावपळ करून एअर अम्ब्यूलन्सची जुळवाजूळव केली.
बुधवार ,दिनांक ३ डिसेंबर,२०१४ रोजीचा तो दिवस ! भल्या सकाळी धुवाळीसाहेबांना घडलेल्या प्रकाराबद्दल फोन आला आणि मुंबई विमानतळावर सज्ज राहण्याच्या सुचना मिळाल्या. मी आणि सुनील रानडे साहेबांच्या घरापासून जवळच असलेल्या ब्रिच कॅंडी हॉस्पीटलमध्ये साहेबांना आणण्याची वाट पाहत थांबलो. साहेब पोहोचेपर्यंत साहेबांचे मित्र आणि फॅमिली डॉक्टर रवी बापट यांनी हीप रिप्लेसमेंट सर्जरी डॉ. मुल्लाजी या नामवंत शल्यविशारदांकडून करावी असे ठरवले. शस्त्रक्रिया खरोखर आव्हानात्मक होती. साहेबांच्या वयाला आठवडाभरात ७४ वर्षे पुर्ण होणार होती. वाढते वय, साहेबांची उंचीपूरी देहयष्टी व त्यामुळे शंभरी पार असलेले वजन ही मुख्य आव्हाने होती. मांडीच्या वरच्या भागात खोल रूतलेले व मोडलेले हाड बाहेर काढून त्याऐवजी कृत्रीम प्रोस्थेटीक अवयव अगदी वरच्या सांध्यापर्यंत बसवणे हे जिकिरीचे काम होते. हीप रिप्लेसमेंट सर्जरीत मोजमापात फरक पडला तरी चालण्याची लय बिघडते. त्यामुळे बिनचूक आणि तंतोतंत जोडणी होणे हे गरजेचे असते. शुक्रवारी ,५ डिसेंबर रोजी डॉ. मुल्लाजींनी साहेबांवर यशस्वी हीप रिप्लेसमेंट सर्जरी केली . हे ऑपरेशन सुमारे दीड तास चालले. साहेबांची भूल उतरल्यावर डॉ. मुल्लाजी आणि डॉ. रवी बापट सर्जिकल आय.सी.यू. मध्ये साहेबांकडे गेले. डॉ. मुल्लाजींनी ऑपरेशन उत्तमच केले होते. त्यामुळे साहेबांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होती. मुल्लाजी 'साहेबांना कसे वाटतेय?' हे विचारायला जवळ गेले तसे साहेबांनी मिश्किल मुद्रेने विचारले- " झाले का तुमचे सुतारकाम ?" मुल्लाजींना मराठी समजत होतं तरी ते गोंधळून गेले .' सुतारकाम ?' साहेब नेमके कशाबद्दल बोलतायेत हे त्यांच्या ध्यानी येईना. डॉ.रवी बापटांनी मध्यस्थी केली. "डॉक्टर , फर्निचर तूटलं की सुतार म्हणजे कारपेंन्टर असाच जोड देवून सांधण्याचं काम करतात, तुम्ही हाड जोडून एकप्रकारे हाडाचं कारपेंटरींग केलंय असं साहेब विनोदानं म्हणतायेत." मुल्लाजींची पेशंट कडून विव्हळण्याची ,'मला चालता येईल की नाही ? 'या विवंचनेची धारणा होती. भूल उतरल्यावर साहेब थेट विनोद करू लागल्याने ह्या धारणेला धक्का बसला पण तो आश्चर्याचा होता. हे झालं सुतारकाम पण ह्रदय हे तर शरीराचे पंपींग स्टेशन असते. ते नादूरूस्त झाल्यावर प्लंबींग, फिटींग, स्टिचींग,इलेक्ट्रीकल अशी कामे करावी लागतात. मोठ्या विकारावर किंवा आजारावर जर मात करायची असेल तर त्याला असंच रिडीक्यूल केलं पाहिजे असं मलाही वाटलं. पेशंटवरील दडपण कमी होण्यासाठी ते कधीही चांगलं पण डॉक्टर्स मंडळींनी मुल्लाजींसारखं स्पोर्टींगली घ्यायला हवं.
दोन-तीन दिवसांत साहेबांना सर्जिकल आय.सी.यू.मधून ४ थ्या मजल्यावरील ४०४ रूममध्ये हलवण्यात आलं. तिथे गेल्यावर समजलं की, जवळच्याच रूममध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील साहेब सुद्धा आहेत. साहेबांच्या देखील ते कानी गेलं. आर.आर. आबांच्या गालावर कर्करोगाचीच शस्त्रक्रिया झाली होती. जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून भेटीगाठीबाबत मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोहोंना एकमेकांना भेटणं शक्य नव्हतं. साहेबांनी तशाही परिस्थितीत आबांच्या तब्येतीची विचारपूस त्यांची काळजी पाहणाऱ्या डॉक्टरांकडे केली. मी आर.आर.आबांना एकदा दरवाज्यातूनच पडद्या आडून पाहिलं आणि शेवटचं पाहिलं ते दूसऱ्या हॉस्पीटलमध्ये रेडीयेशन साठी निघाले होते तेव्हा. लिफ्टमधून आबा उतरताना मी आबांना केलेला तो शेवटचा नमस्कार !
साहेबांचं यशस्वी ऑपरेशन झालं पण पुढचा खरा कसोटीचा काळ होता. साहेबांचं जीवन म्हणजे जनमाणसांसाठी वाहिलेलं. पण आता प्रवासावर मर्यादा येणार ,त्याचा सार्वजनिक कार्यावर परिणाम होणार अशी अनामिक भिती सर्वांच्याच मनात होती. यापुढे साहेबांनी मुंबईत बसून रिमोट कंट्रोल हाती ठेवावा असा सूर बऱ्याच जनांचा होता. पण हार मानणार ते साहेब कसले ? डॉक्टर नको नको म्हणत असताना साहेबांनी तिसऱ्या दिवशी बेडवरून उठवून खुर्चीवर बसवण्यास सांगीतलं. प्रचंड वेदना होत असताना उभं राहण्याचा प्रयत्न केला. ओल्या जखमेच्या, कृत्रीम जोड दिलेल्या पायावर जोर देऊन उठणं कसं शक्य होतं? हीप रिप्लेसमेंटचे रूग्ण कितीतरी महिने बिछान्याला खिळून असतात , असं खूप काही कानी यायचं. साहेब देखील किमान सहा महिने चालू शकणार नाहीत असा कयास दबक्या आवाजात ऐकायला मिळे. लोकांना माहित नसावं पण आजाराला पक्कं माहित असतं की, साहेब आपला फार दिवस लाड करत नाही. साहेबांनी आठवडाभरातच वॉकरच्या आधाराने चालायला सुरूवात केली. सुरूवातीला रूममध्ये चालणारे साहेब , रूमबाहेरील पॅसेजमध्ये वॉकरच्या सहाय्याने बाहेर चालताना पाहिलं तेव्हा आनंदालो आणि गहिवरलो आम्ही स्टाफ मंडळी!
दोन आठवड्यानंतर साहेबांना डिस्चार्ज मिळाला. फिजीओथेरेपिस्ट दररोज सकाळी साहेबांचा व्यायाम घ्यायला येत. साहेबांना कितीतरी महिने दौरे करता येणार नव्हते. व्यायाम झाला की , पुन्हा बेडवर व काही वेळ खुर्चीवर बसणं एवढाच दिवसभराचा दिनक्रम. दिवसाचे सोळा-अठरा तास कामाची सवय असणाऱ्या साहेबांसाठी ही तर जखमेपेक्षा वेदनादायी बाब होती. ह्या अस्वस्थतेने साहेबांमधला लेखक जागा केला. साहेबांनी एक दिवस पक्षाचे खजिनदार आणि नाट्य-साहित्यात अभिरूची असलेल्या हेमंत टकलेंना बोलवून घेतलं. टकले साहेबांशी दीर्घ चर्चा करून साहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांची जंत्री तयार केली. दोहोंच्या चर्चेतून सप्तरंगच्या साप्ताहिक पुरवणीसाठी लेखमाला तयार करण्याचे ठरले. साहेब सार्वजनिक जीवनातील हलके-फुलके प्रसंग सांगत आणि टकले साहेब ते कागदावर उतरवत. पक्ष कार्यालयातला जीवन ते टाईप करी व टाईप होऊन आले की , मी ते साहेबांकडे प्रिंट काढून देई. प्रारूप मान्य झालं की, ते प्रकाशनासाठी पाठवले जाई. हा सिलसिला सुरू झाला आणि बिछान्याला जखडून राहिलेले साहेब सप्तरंग मधील लिखाणातून मोकळे होऊ लागले. साहेबांनी अनुभवलेल्या सप्तरंगी प्रसंगांची उधळण वाचकांसाठी एक पर्वणी होती. हा सिलसिला पुढे वर्षभर चालू होता. खरेच आजारासारख्या जर्जर परिस्थितीतही स्वत:ला कसे गुंतवून ठेवावे हे साहेबांकडून शिकावे. ह्याच काळात साहेबांनी आत्मचरीत्र लिहावे अशी कल्पना पुढे आली. सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली दत्ता बाळ सराफ, निलेश राऊत हे शिलेदार सज्ज झाले. हेमंत टकलेंनी सुत्रे हातात घेतली. साहेबांचे राजकीय आत्मचरित्र तयार करण्याचे ठरले. साहेबांच्या जीवनातील ज्ञात गोष्टींवरून प्रश्नावली तयार झाली. ताईंची टीम सुरूवातीला सिल्व्हर ओक निवासस्थानी आणि साहेब बाहेर फिरू लागल्यावर ते जिथे जातील तिथे व्हिडीओ कॅमेरा घेऊन सज्ज असायची. साहेबांना प्रश्न विचारला जाई. त्यावर साहेब मुक्तपणे बोलत , ते रेकॉर्ड होई व नंतर रेकॉर्ड झालेले शब्दबध्द होत असे. आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी यांनी याबाबतीत कष्ट घेतले. पाहता पाहता साहेबांचे पहिले आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' तयार झाले. त्याची 'ऑन माय टर्म्स' नावाची इंग्रजी आवृत्ती ही तयार झाली. ती तयार करण्याकामी नेहमीच्या टिम शिवाय अंबरिश मिश्र, सुजाता देशमुख यांनी लक्ष पुरविले. साहेबांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या अभुतपूर्व सत्कार सोहळ्यात मा. पंतप्रधानांच्या हस्ते हे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
सप्तरंगसाठी आरंभलेल्या लिखाणाने साहेबांच्या विचारचक्रांना इंधन मिळालं , ती अधिक वेगाने फिरू लागली. परंतू ह्या अवस्थेत देखील त्यांच्या मनात आर.आर.आबांच्या स्वास्थ्याविषयी सतत विचार घोळत असे. आर.आर.आबा. ह्यांची ब्रिच कॅंडी मधून सुटका झाली. पण पुन्हा लिलावती हॉस्पीटलमध्ये त्यांना भरती व्हावं लागलं. ऑपरेशन नंतरही आबांचा कर्करोग अधिक बळावला होता. साहेबांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. आबांनी राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी ताकदीची पदे भुषवली पण अतिशय निरपेक्ष व प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. वैद्यकीय खर्च तरी त्यांना झेपेल का ? याची साहेबांना भ्रांत असे. आबांची कन्या स्मिता आणि बंधू पोलीस निरिक्षक राजाराम पाटील यांनी साहेबांची सल्ल्यासाठी गाठ घेतली तेव्हा खूप उशीर झाला होता. आबांनी खरे तर कॅन्सरची कुणकुण लागली तेव्हाच साहेबांना भेटायला हवे होते. पण त्यांनी आजार अंगावर काढला. त्यांचे सहकारी आणि जवळच्या डॉक्टरांनी देखील ह्या गोष्टीला दुजोरा दिला. आपल्यात म्हण आहे की, झाकलं की गजकर्ण वाढतो. पण कॅंन्सर सारखा भयंकर आजार झाकला तर नुसता वाढत नाही तर तो ठार मारतो. उशीरा का होईना साहेबांकडे आल्यावर साहेबांनी आबांची संपुर्ण फाईल मला डॉक्टर सुलतान प्रधानांकडे देऊन येण्यास सांगीतले. दुसऱ्या दिवशी सुलतान प्रधान साहेबांना भेटायला घरी देखील आले. पण आबांची व्याधी दूरवर पसरली होती. साहेब काही बोलले नाहीत . सर्वकाही ठीक होईल असा आम्ही स्मिताला मी आणि रानडेंनी धीर दिला. साहेब मात्र आबांना भेटण्यासाठी अधीर झाले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर २१ व्या दिवशीच साहेब डॉक्टरांचे सल्ले धुडकावून वॉकरच्या मदतीने घराबाहेर पडले. आणि निघाले थेट लिलावती हॉस्पीटलला आबांना भेटायला ! साहेब वॉकरच्या मदतीने मंदगतीने पुढे-पुढे एकेक पाऊल टाकतानाचे दृष्य अजूनही नजरेसमोरून जात नाही. ह्या अवस्थेत साहेब आपल्याला भेटायला आले आहेत हे पाहून आबांचा उर किती भरून आला असेल ना. त्या भेटीच्या प्रसंगाचा साक्षी मी नव्हतो याची मला सतत हूरहूर जाणवते.
प्रवास म्हटलं की साहेब एका पायावर तयार असतात. 'एका पायावर तयार असणे' हे वाक्प्रचारात म्हणणे ठिक पण प्रत्यक्षात किती महाकठीण असते ! साहेब ते ही आव्हान कसे पेलतात हे लवकरच लक्षात आलं. ऑपरेशन होऊन दीड महिना लोटला तशी साहेबांची अस्वस्थता अजून वाढली. वॉकर जाऊन साहेबांच्या हातात आता काठी आली. पण सारखे घरात बसून साहेबांना उबग आला होता. विठ्ठलशेट, कर्नल संभाजी पाटील हि मंडळी साहेबांना कंटाळा येवू नये म्हणून आवर्जून भेटायला यायची. एक दिवस ह्याच मित्रमंडळींशी गप्पा मारताना गीरच्या जंगलात सिंह सफारीला जाण्याचे ठरले. २४ जानेवारी,२०१५ हा तो दिवस. गुजरातच्या दक्षिणेला दीव नावाचा केंद्रशासीत प्रदेश आहे. तेथपर्यंत खाजगी विमानाने आणि पुढे उत्तरेला सुमारे शंभर किमी अंतरावर गीर-सासन च्या जंगलात वाहनाद्वारे जाण्याचा मार्ग निश्चित केला. दीवची धावपट्टी लहान असल्यामुळे लहानसे विमान घेतले. मात्र तीव्र उताराच्या, अतिशय अरूंद पायऱ्यांवरून विमानात चढणे एक दिव्यच होते. विमानाच्या आतील अरुंद जागेत उभे राहून पायलटला देखील साहेबांना आधार देता येईना. शस्त्रक्रिया झालेल्या उजव्या पायावर जोर देता येईना. साहेब वेदना सहन करीत हिंमत करून पायऱ्या चढले पण आत पाय ठेवल्यावर उंचीमुळे त्यांना उभे राहता येईना. दरवाजाच्या खोबणीत साहेब अंग चोरून जखमी पाय गुडग्यातून वाकणार नाही याची काळजी घेत , वाकून , तोल सांभाळत आत घुसू पाहत होते. एखादी चूक आणि पाय जाग्यावर दूमडायची भिती ! पण साहेबांनी शिकस्त केली. आणि दुसरा पाय देखील आत घेऊन उभे राहिले. तेव्हा कुठे आम्ही रोखून धरलेला श्वास सोडला. दीव बेटावर विमान उतरल्यावर विमानातून उतरणे सुध्दा तितकेच अवघड होते. गीरच्या जंगलाजवळच हॉटेल फर्न रेसॉर्टमध्ये साहेब, विठ्ठल मणियार आणि कर्नल संभाजी पाटील हे सहकुटूंब उतरले.
दूसऱ्या दिवशी सकाळी ऑलीव्ह रंगांच्या उघड्या जिप्सींमधून गीर जंगलाची सफर घडणार होती. वनखात्याने सगळी सोय केली होती. पण जंगलातल्या वाटेवरील खाच-खळग्यांचा त्रास दुखऱ्या पायाला होऊ नये म्हणून साहेबांसाठी व्यवस्था केलेली इनोव्हा गाडी जंगलात नेण्याचे ठरले. आम्ही बाकीची मंडळी मात्र उघड्या जिप्सींमध्ये थाटात बसलो. एका लेखात त्या सफरीचं 'The Lion on Lion's Trail' असं मी वर्णन केलं आहे. मी गीरच्या सिंहाला कैद करण्यासाठी कॅमेरा सज्ज ठेवला होता. साहेब आणि सिंहाचे एकत्र छायाचित्र टिपण्याचा माझा मनसुबा होता. अडचण एकच की साहेब खाली उतरणार नव्हते. त्यांची गाडी देखील बंदिस्त होती. अर्ध्या तासातच एका रूंद पण उथळ ओढ्याच्या पात्रात आठ सिंहिणी सकाळचं कोवळं ऊन खात पहूडल्या होत्या. निसर्गाच्या सानिध्यात रूबाबात लोळणाऱ्या बेफिकीर वनरागीणींचं चित्र डोळ्यात साठवलं आणि कॅमेऱ्यात कैद केलं. सिंहिणी दिसल्या पण वनराज दिसेना. पण जाणता राजा पाहण्याची त्याला देखील उत्कंठा असावी. परतीच्या प्रवासात दाट झाडीतून एक डरकाळी देऊन त्या वनराजानेआगमनाची चाहूल दिली. आम्ही गवताच्या मैदानातल्या कच्च्या वाटेवरून तो जवळ येण्याची वाट पाहू लागलो. वनराज आमच्या नजरेच्या टप्प्यात आला. पण त्याने गवताच्या मैदानावर येण्याचे टाळत कडेवरच्या झुडूपाखाली बस्तान मांडलं. आणि आम्हाला निर्विकारपणे पाहत राहिला. हिच संधी होती साहेब व वनराजाचं एकत्र छायाचित्र टिपण्याची. पण साहेब गाडीत , दरवाजा बंद . कसा काढणार फोटो. पण मी जिप्सी मागे-पुढे घ्यायला सांगून आटापिटा केला. तेव्हा साहेबांच्या गाडीतून पलिकडे निवांत बसलेला सिंह दिसला. साहेब पुढच्या सीटवर बसून सिंहावलोकन करत होते. पण वनराज तोवर दूसरीकडे पाहत होते. मी चालत्या गाडीतून क्लिक केलं. नशीब ! पुसटसे का होईना पण दोघे एकत्रित कॅमेऱ्यात आल्याचे मला खूप समाधान वाटले.
आम्ही रेसॉर्टवर परतल्यावर साहेबांना समजले की, माझा वाढदिवस आहे. संध्याकाळी अचानक चॉकलेटी रंगाचा केक आणण्यात आला. मी मेणबत्ती फुंकून केक कापण्यासाठी वाकलो . साहेबांना खुर्चीत बसल्यानंतर उठून उभे राहण्याचा त्रास होई. तशाही परिस्थितीत ते वेदना विसरून उठून उभे राहिले. साहेब , वहिनींच्या साक्षीने , मणियार-पाटील कुटूंबीयांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात आणि हॅपी बर्थ डे टू यू च्या निनादात केक कापला गेला. मणियार सरांनी मला भरवला. जंगलात अचानक भेटवस्तू काय आणणार . मग सर्वांतर्फे विठ्ठलशेठजींनी छोटीशी भेट दिली. त्या भेटीचं मोल कशातच करता येणार नाही. मी कृतार्थ झालो. फर्न रेसॉर्टमध्येच दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहन साहेबांनी केलं. फर्न रेसॉर्टसाठी हा अत्यंत मानाचा दिवस होता. परतीच्या वाटेत सोरटी-सोमनाथाचं दर्शन घेतलं. आणि पुन्हा दीव मार्गे खाजगी विमानाने मुंबईला परतलो.
साहेबांनी पंतप्रधान मोदीजींना बारामती भेटीचे निमंत्रण दिले होते. मोदीजींनी दिवस निवडला १४ फेब्रुवारी, २०१५. दिवस देखील पहा ना ! परस्पर प्रेम व्यक्त करण्याचा व्हॅलेंटाईन डे ! पंतप्रधान महोदय येणार म्हटल्यावर एस.पी.जी.बंदोबस्ताच्या गराड्यात साहेबांना वेगाने चालावे लागणार याची साहेबांना पुरेपूर कल्पना होती. साहेबांनी दौऱ्याच्या पंधरा दिवस अगोदरपासून काठीच्या आधाराने का होईना पण झरझर चालण्याचा सराव घरातल्या घरात सुरू केला. रोज सकाळी साहेब तासभर चालत. फिजीओथरेपीचे व्यायाम करत. दौऱ्यात कोणत्याही प्रकारे थकवा येण्याची नामुष्की येणार नाही हे त्यांनी ठाणले होते. ठरलेल्या दिवसा आधी त्यांनी सरावाच्या बळावर नव्या दमाने ,बिना दिक्कत , विना थकवा कार्यक्रम स्थळी फिरण्याची रंगीत तालीम पुर्ण केली. आणि सकाळी देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बारामती विमानतळावर जातीने हजर राहिले. राजशिष्ठाचार सांभाळला. विमानतळावर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पंतप्रधान उतरले आणि साहेबांना पाहून आस्थेने म्हणाले '' शरदराव , आप यहॉंतक क्यूं आये, सुप्रिया तक ठिक था. '' साहेबांनी हसून पुष्पगुच्छ देऊन मोदीजींचे स्वागत केले. संपुर्ण दौऱ्यात मोदीजी आणि साहेब यांच्यामधील परस्पर स्नेहभाव जगाने पाहिला व मी जवळून अनुभवला. त्यावर पुन्हा कधीतरी वेगळे लिहिल. पण साहेबांनी काठी सोडली तर कोणत्याही आठकाठी शिवाय सर्व दौरा सुलभ पार पाडला. मोदीसाहेबांना विमानतळावर सोडल्यानंतरच ते घरी स्थिरावले. साहेबांच्या पायाचे नुकतेच ऑपरेशन झाल्यामुळे साहेब आणि मोदीजीं व्यतिरिक्त एस.पी.जीं.च्या सुरक्षा कवचात सतत राहण्याची केवळ मला मुभा होती. हा माझ्या साठी ब्लेसींग इन डिसगाईज (इष्टापत्ती) योग होता. मी देखील एस.पी.जी. कमांडोसारखा सूटा-बुटात असल्याने बंदोबस्ताचा एक भाग बनुन गेलो होतो. दोन महारथींना खूपच जवळून पाहण्याचा तो एक दुर्मिळ अनुभव होता.
साहेब आजाराचे जसे भांडवल करीत नाहीत तसे त्याला गोंजारत देखील बसत नाहीत. गोळ्या-औषधे वेळच्या वेळी घेण्यात कधीही हयगय होत नाही. वहिनी साहेबांच्या आरोग्याची सतत काळजी वाहत असतात. साहेबांचे तपासणीचे अहवाल व इतर वैद्यकिय अभिलेखे जपून ठेवणे , सकाळ-संध्याकाळच्या औषध-गोळ्यांची पाकिटे तयार करून ठेवणे, साहेब त्या वेळेवर घेतील यांकडे त्यांचे कसोशीने लक्ष असते. साहेबांसोबत दौऱ्यावर त्या नसतील तेव्हा ती जबाबदारी मी अथवा दूसरे सहकारी रानडे यांच्यावर असते. गामा ड्रायव्हर यांचेही लक्ष असतेच. नव्या ठिकाणी नोकर-चाकरांच्या हाती कधीही गोळ्या दिल्या जात नाहीत. आम्हा कुणांकडून गोळ्या देताना विसर पडल्याचा एकदाही प्रसंग घडला नाही. एकदा मात्र माझ्या मनात धडकी भरली होती. बुलडाणा जिल्ह्यातील श्री. गजानन महाराजांच्या शेगांवास भेट देऊन रात्री विदर्भ एक्सप्रेस ने मुंबईला निघालो होतो. साहेबांसाठी स्वतंत्र कुपे राखीव होता. रात्री नऊच्या सुमारास सुनील तटकरे साहेबांशी चर्चा करण्यासाठी कुपे मध्ये शिरले , मी आणि बबनराव पाचपुते शेजारच्या टू-टिअर डब्यात बसून गप्पा मारण्यात रंगलो. साहेब लवकर झोपत नाहीत हे माहित असल्याने मी निवांत होतो. अर्ध्यातासाने तटकरे साहेब निघून गेले असतील ह्या अंदाजाने मी कुपेकडे गेलो. आतील लाईट बंद झाल्या पाहिल्या तसा माझ्या काळजाचा ठोका चुकला. तटकरे साहेब एव्हना निघून गेले होते.साहेब तर नेहमीच्या वेळे आधी झोपी गेलेत , कुपेचे दार तरी कसे वाजवायचे ? पण वाजवले नाही तर साहेबांच्या गोळ्या चुकलेले कसे चालेल ! साहेब रागावले तर ? मनाची घालमेल झाली , धाडस करून दरवाजा वाजवला. साहेबांना नुकतीच तंद्री लागलेली असावी. त्यांनी लाईट लावून दरवाजा उघडला. मी धाकधुकीने '' सर गोळ्या घ्यायच्या राहिल्यात '' एवढे म्हणालो. साहेबांना झोपेतून उठवल्याने रागावतील अशी भिती होती. परंतू साहेबांनी ' अरे हो !' एवढेच म्हणून अगदी शांतपणे मी पुढे केलेल्या गोळ्या हाती घेतल्या. मी ग्लासातून पाणी दिले. साहेबांनी गोळ्या घेतल्यावर माझ्या जीवात जीव आला. तेव्हापासून साहेबांसोबत कुणीही असले तरी गोळ्या घ्या म्हणून सुचवायची भीड मी बाळगली नाही.
शुल्लक का असेना पण साहेबांच्या आजाराबद्दल आम्ही सारेच कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न करतो. मागेच सांगीतल्याप्रमाणे साहेबांना त्याचं भांडवल नको असतं. आणि सर्वात महत्वाचं कारण की राईचा पर्वत करणाऱ्या महाभागांचा सध्या सोशल मिडियाच्या जमान्यात सुळसूळाट झाला आहे. लष्कराच्या भाकरी भाजणाऱ्या ह्या उपटसुंभांना घरातल्या भाकरीची काळजी नसते. पण साधी घटना घडली तरी तिला तेल-मीठ लावून चमचमीत चर्चा करण्याचा त्यांचा सततचा खटाटोप असतो. इलेक्ट्रॉनीक माध्यमांमध्ये एवढी प्रचंड स्पर्धा लागलेली आहे की, अगोदर बातमी झळकावयाची आणि त्यानंतर वस्तूनिष्ठता तपासायची. ब्रेकींग न्यूजच्या नादात विश्वासार्हता ब्रेक होते कि नाही याची तमा ते बाळगत नाहीत. वॉट्स अप सारख्या सामाजिक म