26/03/2025
*||श्रीराम समर्थ||*
🌷🌷🌷🌷🌷🌷
आजचे प्रवचन खूप छान!
🌷🌷🌷🌷🌷🌷
आजच्या प्रवचनामध्ये ,
*दशक विसावा समास दहावा*
*विमळब्रह्मनिरूपणनाम*
याचे विवेचन खूप छान केले आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷 परब्रह्म ही काही एखादी वस्तू आहे का धरली, सोडली ?त्याला पकडूनही ठेवता येत नाही आणि सोडूनही देता येत नाही, असं जे आहे ते परब्रह्म तत्व आहे. जिथे जाल तिथे तेच भेटणार आहे.
*जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया*
आपण त्याच्याशी विन्मुख व्हायचं म्हटलं तरी ते पुढे येतंय म्हणजे आपल्या डाव्या हाताला आहे, उजव्या हाताला आहे, पुढे आहे, मागे आहे, सर्व ठिकाणी ते आहे. म्हणजे ते नाही असं ठिकाण नाही.
*जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना*
कुठेही पाहिलं तरी आकाश समोरच आहे. कुठेही पळून जाता येत नाही. इथे आकाश आहे तिकडे पळून जातो, कुठेही गेलं तरी आकाश आहेच. आकाश सोडून कुठे पळून जाता येते? आकाशाच्या बाहेर कसं जाता येईल? जिकडे पहाल तिकडे तो सन्मुख आहे.
*मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे*.
तो सन्मुखच आहे. माध्यान्ह काळी सूर्य मध्य ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी तो कुठेही गेला तरी डोक्यावरच आहे. जरी मी तुम्हाला सूर्याची उपमा दिली की तो डोक्यावर असतो कुठेही गेलं तरी, ती उपमा अपुरी पडते कारण परमात्मा हा त्याच्याही पलीकडे आहे. तुम्हाला कळण्यासाठी सूर्याची उपमा आहे .
🌷नाना तीर्थी देव आहे. अनेक तीर्थ आहेत, स्नान करावं म्हणून जातात. बारा ज्योतिर्लिंग,बद्रीनाथ, केदारनाथ सगळीकडे जातात. तिथे देव आहेच जर तो सर्वत्र भरलेला आहे तर तिथेपण आहे. तिथे जायचं म्हणजे कष्ट आहे. गिरणार पर्वत चढून जायचं म्हणजे कष्ट आहेत. या परब्रह्माला तुम्हाला पाहण्यासाठी कष्ट करावे लागतील. निरनिराळ्या ठिकाणच्या देवस्थानाला पहायला जाण्यासाठी माणसाला कष्ट घ्यावे लागतील. जेवढी तीर्थस्थानं आहेत, पवित्र आहेत. तो देव तेथे आहेच. तसं परब्रह्म पाहण्यासाठी ना रिझर्वेशन, काही चार पैसे खर्च करायची गरज नाही, चार पावलं पण जायची जरूर नाही. तो आहे तिथेच आहे, त्याला शोधायला कुठे जायचं?
*कुठे शोधिसी रामेश्वर ,अन् कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला उपाशी*
तो तुझ्याजवळच आहे.
*तुज आहे तुजपाशी परी, तू जागा चुकलासि*
एकाच जागी बसा आणि मन एकाग्र करा तो तुम्हाला तिथेच दिसणार आहे. पाय थकले, शरीर थकलंय आता, थकलं तर थकलं कुठे लांब जायचंय एका जागी तुम्ही मन एकाग्र करा तिथे परमात्मा आहेच की. तुम्ही बसलात तरी परब्रह्म तिथेच आहे आणि तुम्ही चाललात तरी परब्रह्म तुमच्या बरोबर चालतंय."चालविसी हाती धरोनिया".
पक्षी आकाशात गेला तरी त्याला व्यापून परब्रह्मच आहे. त्याच्या आतमध्ये तेच आहे आणि बाहेरही तेच आहे. म्हणायला गेलं तर ब्रह्म पोकळ आहे, घनदाट आहे. सगळ्यामध्येच ते आहे ना. जड दिसणाऱ्या लाकडामध्ये सुद्धा चैतन्यरूपाने वास करतो. या जमिनीवरून तुम्ही एखादी वस्तू ओढत न्या, तर आपल्या अंगावर कोणीतरी खराटे ओढतंय असं वाटतं.असं का वाटतं? तर हे चैतन्याशी एकरूप आहे म्हणून वाटतं. ते आणि आपण वेगळं नाही, ते परब्रह्म सगळ्यांना व्यापून आहे. ते विमळ आहे म्हणजे शुद्ध आहे. माणसाचं मन सुद्धा शुद्धच असतं.
☘️लहान मूल आहे .आपण म्हणतो निरागस आहे म्हणजे त्याचं मन शुद्ध आहे. त्याला अशुद्ध कोण करतं? आम्हीच करतो. लहान मूल शेजारी सांगतो, आमच्या आईने आज लाडू केले, जिलेबी केली. हे कोणाला सांगायचं नाही असं सांगून आम्ही त्याच्या मनामध्ये शुद्ध आहे त्यात अशुध्द टाकत जातो.
☘️बाबा फोन आला काय सांगू ? घरात नाही म्हणून सांग खोटं बोलायला कोण शिकवतं? आम्ही शिकवतो.
☘️ अरे आज शाळेत जाऊ नको. ?बाईंना काय सांगू पोटात दुखतंय म्हणून सांग.
हे जे आमचं मन सगळ्या गोष्टींनी कलुषित झालेलं आहे, सत्संगामध्ये ते निर्मळ होऊन जातं. हे सगळं नाहीसं होऊन जातं आणि मन निर्मळ होतं.
*गंगा जैसी निर्मळ, जैसे ज्याचे मन त्याचे गळा माळ असू नये*
गंगेसारखं ज्याचं मन निर्मळ झालेलं आहे त्याच्या गळ्यात माळ असली काय अन् नसली काय त्याला कशाचीच आवश्यकता नाही. आपलं मन हे निर्मळंच होतं पण हे कलुषित झालंय ते सत्संगामध्ये गेल्यानंतर जसं फडकं रोज थोडं थोडं घासल्यानंतर थोडं थोडं स्वच्छ होत जातं तसंच अनेक जन्माचं आपलं हे फडकं आहे, ते खराब झालेलं आहे ते सत्संगामध्ये रोज घासलं पुसलं जातं, निर्मळ होऊन जातं.
🌷 ते ब्रह्म काय फक्त पृथ्वीवर आहे का ?नाही. वैकुंठात गेला तरी आहे, कैलास पर्वतावर गेला तरी आहे, सत्यलोकाला गेला तरी आहे. जेवढी चतुर्दश भुवनं आहेत तेवढ्या चतुर्दश भुवनाला व्यापून ते परब्रह्म उरलेलं आहे. काशी विश्वेश्वरापासून रामेश्वर पर्यंत जा, कुठेही फिरा,तेच आहे. परब्रह्म काही वेगळे नाही. परब्रह्म हे एकटेच आहे. त्या एकट्या परब्रह्माने सगळ्याला ब्रह्मांडालाही व्यापलंय आणि पिंडालाही व्यापलेलं आहे. सगळ्याला त्याचा स्पर्श होतो. आतही आहे आणि बाहेरही आहे. हवेचा स्पर्श म्हणजे त्याचा स्पर्श झालेला आहे. परब्रह्म या पावसात सुद्धा आहे पण पावसाने भिजत नाही, पूराबरोबर वाहून जात नाही. एकाच वेळेला ते समोर आहे, पाठीमागे पण आहे, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला एकाच वेळेला त्यानी सर्व व्यापलेलं आहे.
🌷हा आकाशाचा डोह सगळीकडे ओतप्रोत व्यापून राहिलेला आहे. गगन कसं आहे? उदास आहे. या आकाशामध्ये ढग आले तरी ते तसंच आहे. प्रचंड असं वावटळ झालं आणि सगळी धूळ आकाशात गेली वावटळ आकाशात गेलं, माती आकाशात गेली म्हणून मलीन झालं नाही ते तसंच आहे. विजेचा कडकडाट झाला तरी आकाश जळून गेलं नाही. हे सगळं आकाशातच होतंय पण आकाश त्याच्यापासून उदास आहे.
गगनाचे उदाहरण का दिलं?
तिथे काही दृश्य नाही आणि भास पण नाही. जो आहे तो मायेत आहे तिथे काहीच नाही. त्याला कुठला भास नाही काही नाही. आपल्याला जे दिसतं आणि भासतं ते सगळं विश्व नाशवंतच आहे.
🌷संत असो, साधू असो, महानुभाव असो, देव असो, दानव असो या सगळ्यांना विश्रांतीचे ठिकाण म्हणजे परब्रह्म आहे. त्यांना विश्रांती परब्रह्माजवळ आहे. *आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलीया*
त्याचं चरण पाहिल्यानंतर बाकी काही पाहण्यासारखं शिल्लकच राहिलं नाही. कुणीकडे जायचंय शेवटंच नाही त्याला. कुठे जाणार त्याला शोधायला? ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही, एकासारखे नाही म्हणजे त्याला उपमा देण्यासारखी दुसरी वस्तूच नाही. हे जाणायचं कसं हा प्रश्न आहे. ज्ञानाची दृष्टी आल्याशिवाय समजत नाही. बाकी सृष्टी दिसेल हे पाहण्यासाठी चर्मचक्षू भगवंतांने दिलेलेच आहे पण त्या परब्रह्माला पहायचं तर ज्ञानदृष्टी पाहिजे. असं ज्ञान कुठल्या मार्केटमध्ये मिळतं? ए टू झेड मध्ये गेला. तुमच्याकडे काय मिळतं? आमच्याकडे डोहाळे जेवणापासून ते तेराव्यापर्यंत सगळं मिळतं. ते ज्ञान मिळतं का तुमच्याकडे ज्या ज्ञानाने परब्रह्म, परमात्मा प्राप्त होतो?नाही तेवढं मिळत नाही. ते कुठे मिळतं ?
*ते ज्ञान पै गा बरवे| जरी मनी आथी आणावे |तरी साधू संतांचिया रिघावे चरण| तनू मनू जीवे चरणासी लागावे |आणि अगर्वता लागावे दास्य सकळ|
संतांसी शरण जावे|*
असा बोध होतो.
मनाचा स्वभाव काहीतरी संकल्प आणि विकल्प चांगलं- वाईट येतच राहणार आहे पण ते संत आपल्याला असा ज्ञानाचा बोध करतील की, ज्या ज्ञानाने आपलं मन शांत होईल. मनामध्ये संकल्पही नसणार आणि विकल्पही नसणार.
🌷संकल्प नाही, विकल्प नाही अशी अवस्था म्हणजे काय ?
*ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान*
*जो हो रहा है भले के लिए,जो होगा भले के लिए*
आपल्याला काय करायचं? सगळं जर त्याच्या इच्छेने चाललंय तर आपल्या इच्छेला विचारतंय कोण? त्याची इच्छा ती आपली इच्छा.
*देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे रहावे,मग सहजचि स्वभावे, कृपाळू देव*
तो द्यायला लागला की किती देतो?
*पुरे पूरे पूरे आता देव देताची विटेना*
नकोनको म्हटलं तरी मागे लागतो.
*टाकीता लावीतो मागे, देव दाताची जाहला*
पण खरा भक्त कोण?
*भक्त तो घेईना काही, दैव त्रैलोक्य दिधले*
तो म्हणतो मला यातलं काहीच नको. तुला काय पाहिजे? देव त्रैलोक्य द्यायला तयार आहे. मग तुला काय पाहिजे?
*तयासि त्याविणे नाही, तयासि भक्त दुल्लभ*
तो म्हणतो, मला तुझ्याशिवाय काहीच नको.जो त्याच्याशिवाय काही मागत नाही असा भक्त दुर्मिळ आहे.
🌷ब्रह्म व्यापक आहे हे खरं आहे. तो व्याप त्याने केलाय म्हणून तो व्यापक आहे. एकटाच होता तिथं काहीच नव्हतं. त्या एकट्याला असं वाटलं "एकोहम् बहुस्याम्" एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून त्याने विश्व निर्माण केलं. त्या ब्रह्माला शब्द लागत नाही म्हणजे शब्दांमध्ये त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. त्या परब्रह्म ,परमात्म्याला कल्पनेने जाणता येत नाही. "येतो वाचो निवर्तन्ते". हे भगवंता, तुझं स्वरूप वाणीला आणि मनाला कळत नाही .
वाणीला कळत नाही आणि मनाला कळत नाही म्हणजे काय? वाणीने वर्णन करून सांगता येत नाही असं काय आहे ?फक्त कळतं असं काय आहे?
☘️साखर आणि त्याची गोडी, साखर दाखवता येईल साखरेची गोडी दाखवता येत नाही.
☘️ भूक लागली हे कळतं पण कुठे लागली दाखव म्हटलं तर दाखवता येत नाही.
*ते शब्देवीण संवादीजे| इंद्रिया नेणता भोगिजे*
गुरु आपल्याला जे ज्ञान देतात ना ते शब्देवीण संवादीजे म्हणजे नुसते शब्द नाहीत. शब्द हा पाचोळा आहे, शब्द म्हणजे भूस आहे .भूस म्हणजे काय? तांदळातले साळी असतात ते आतले तांदूळ घ्यायचे भूस टाकून द्यायचा. आतले तांदूळ महत्त्वाचे की भूस? शब्द महत्वाचा नाही शब्दामागे दडलेला अर्थ महत्त्वाचा आहे. शब्द भूस आहे ,सोडून द्या. काय सांगायचंय तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. दासबोधातनं काय सांगायचंय ते कळलं पाहिजे. शब्दाचा पसारा सोडून द्या, इंद्रियाला न कळता भोगता आलं पाहिजे.
☘️पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. मिलीटरीत गेलेला मनुष्य बारा वर्षांनी आला. सगळे भेटायला पुढे,त्याच्या बायकोला भेटायला वेळ नाही. ती बिचारी सगळ्यात मागे. आजोबा- आजी सगळे पुढे पुढे, याने तिला फक्त नजरेने पाहिलं. पाहिल्याबरोबर एकमेकांना नजरेने कळलं,बोलले नाहीत. शब्द एक पण नाही पण तिच्या नजरेतनं कळलं, का हो, बारा वर्ष झाली तुम्हाला माझी आठवण नाही का आली? अगं तुझ्यासाठीच आलो.
*ते शब्देवीण संवादिजे, इंद्रिया नेणिते भोगीजे*
🌷कल्पनातीत निर्गुण असणारा ,निरंजन असणारा परमात्मा विवेकाने ओळखायचा. विवेक म्हणजे सारासार विचार, सार काय? असार काय ? अशाश्वत काय?शाश्वत काय हे कळतं म्हणजे विवेक. श्रवण केल्यानंतर सार कळणं महत्वाचं आहे. आधी श्रवण केले पाहिजे, मग मनन करायला पाहिजे, मग चिंतन करायला पाहिजे, मग निदीध्यास झाला पाहिजे. तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो.
परमात्म्याला जाणणं याला विशेष ज्ञान म्हटलंय . चौदा विद्या, चौसष्ट कला या प्रपंचासाठी आवश्यक आहे. भगवंताला जाणायचं म्हणजे "जाणणे आपणांसि आपण या नाव ज्ञान". आपल्या आत्मस्वरूपाला ओळखणे याला ज्ञान म्हटलंय.
🌷साधन फळाला आलं. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जी साधना केली ती आता सफळ संपूर्ण. संसार सफळ झाला म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक झालं. ते निर्गुण निराकार असणारं परब्रह्म आहे तेच माझ्या शरीरात चैतन्यरूपाने वास करतंय हे मला कळलंय. निर्गुण परब्रह्म आहे ते निश्चळ आहे. ते कुठे जात नाही, येत नाही ,ते सदा आहे हे आता मनात पक्कं ठसलंय. आता या मायेचा हिशेब संपला. माया म्हणजे काय ते कळलं. शाश्वत काय ?अशाश्वत काय? कळलं. शरीर हे किती तत्त्वांनी बनलेलं आहे ते मला कळलं. पंचमहाभूतं, उपपंचप्राण,पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी,चित्त, अहंकार या सगळ्या तत्वांनी तयार झालेलं शरीर याचा मला बोध झाला. हा पिंड इतक्या तत्वांनी बनला हे मला कळलं. एवढं सगळं असलं तरी हा जड देह आहे हे मला कळलं. हा जड देह हलतो कशाने तेही मला कळलं.
*चाले हे शरीर कोणाचिये सत्,ते कोण बोलते हरी वीण*
स्वप्नामध्ये मी घाबरलो होतो.भय इथले संपत नाही असं वाटत होतं ते स्वप्नामध्ये, पण जागं झाल्यानंतर ते भय उडून गेले. भय शिल्लकच राहिलं नाही. अज्ञानात भय होतं. ज्ञानामध्ये भय नाही .तुम्ही घाबरला होता आणि आता तुमचं भय गेलं हे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. ते कळतं, तो सगळ्याचा साक्षी आहे. मी जागा आहे हे तो जाणतो. मला आज नीट झोप लागली नाही, स्वप्न पडत होते हे तो जाणतो. मला गाढ झोप लागली हेही तो जाणतो असा जो साक्षीभूत परमात्मा आहे तो मला कळला. असं हे सगळं विवेकाने जाणता येतं. आपल्याला प्रत्यक्ष त्याची प्रचिती आली पाहिजे.
🌷खरंच आहे का हे शरीर? जड आहे का? हो जड आहे. कशावरून?
माझ्या देखत कितीतरी माणसं गेली. लहान मुलं गेली, तरुण माणसं गेले, म्हातारी माणसं गेली, बरोबरची माणसं गेली हे मी पाहिलं. हे शरीर जड आहे आत्तापर्यंत चालत होतं आता ते पडलंय. कुणीतरी त्याला चालवत होते एवढं मला कळलं. प्रत्ययाने मला कळलं की हे शरीर जड आहे. कोणीतरी चालवतो हेही मला कळलं. जो कोणी चालवतो त्याचं नाव "चैतन्य" आहे हेही मला कळलं. कुणी जन्मत नाही आणि कुणी मरत नाही. हे जन्म- मरण काय आहे? ती वासना आहे. ती तुम्हाला जन्माला घालते.
*जन्म घेणे लागे वासनेच्या संगे*
ज्याची वासनाच संपली त्यांचा "विषय तो त्यांचा झाला नारायण". ज्याचा विषय हा परमात्माच झाला त्याची वासना काहीच शिल्लक राहत नाही. जन्मत नाही आणि मरतही नाही. येतो तो वासनात्मक देह येतो, जातो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जन्म नाही मरण नाही.
*जन्म- मरण नको देवा, नको येरझार, व्यर्थ ऐहिकाचा देह व्यर्थ भडिमार*
मग हा जन्म मरणाचा फेरा चुकवायचा म्हणून तर सद्गुरूला शरण जायचंय. रामरायाने माझ्यावर कृपा केली. या रामाने भक्ताचा अभिमान धरला म्हणजे समर्थांचा. समर्थ म्हणतात, मी रामाचा भक्त आहे ना, मग आपलं आहे त्याची पाठराखण करावी लागते. म्हणून त्या रामरायाने माझ्यावर कृपा केली. या देहाच्या माध्यमातनं *दासबोध* ग्रंथ घडवला. मोठेपणा दिला समर्थांनी केला म्हणून. ही जी वचनं मी लिहिलेली आहे ती रामरायाची वचनं आहेत.या दासबोधामध्ये वीस दशक आहेत. दोनशे समास आहेत .जो कोणी याचं मनन करेल त्याला परमार्थ कळतो. वीस दशक, दोनशे समास साधकाने शांतपणे पाहायला पाहिजे. जसजसं तुम्ही वाचत जाल तसतसं तुम्हाला कळत जाईल. ग्रंथाची स्तुती करण्यापेक्षा हा ग्रंथ वाचल्यानंतर जो काही तुम्हाला अनुभव आला तो महत्त्वाचा आहे.
🌷 हा ग्रंथ वाचून काय कळलं?
हा ग्रंथ वाचून देह हा पंचमहाभूतांचा एवढं कळलं पण या पंचमहाभूतात्मक देहाला चालवणारा कर्ता आत्मा आहे. सगळं हा देह पंचमहाभूताचं, चालवणारा तो परमात्मा, माझं काय आहे? तुम्ही म्हणता, समर्थांनी कार्य केलं. हे सगळं कर्तृत्व त्याचंच आहे .सगळंच परमात्मा करतो तिथं मी काव्य केलं असं तरी कसं म्हणू? असं अप्रमाण बोलून कसं चालेल? सगळ्या देहाचा झाडा केला, मग मला कळलं यातलं माझं काहीच नाही. नाक म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही कळलं. यातलं मी काहीच नाही.
*चिदानंदरूप शिवोहम् शिवोहम्* हे कळलं.
अशा प्रकारे खूप छान विवेचन केले आहे.
खूप खूप धन्यवाद गुरुजी!!
🌷जय गजानन🌷