05/03/2023
महिला दिनानिमित्त ची अनपेक्षित भेट...
खरंतर सुखद धक्काच!!!
अमृता प्रीतम,विश्वास पाटील, रंगनाथ पठारे,माधवी देसाई, रणजीत देसाई...इतक्या मोठ्या दिग्गज लेखकांच्या यादीत आपलं नाव येणे आणि इतकं सविस्तर 'इब्रु' बद्दल व कथासंग्रहात आलेल्या माझ्या मनोगताबद्दल लिहिलं जाणं हे आनंददायी तर आहेच आणि एक लेखक म्हणून जबाबदारी वाढवणारं देखील आहे.
अमृता ते प्रियांका व्हाया नागकेशर आणि सातपाटील कुलवृत्तांत!
स्त्री आणि तिचं स्वतःचं असलेलं भावविश्व, एक लेखक म्हणून तिच्या भावविश्वातील स्त्रियांची व्यथा आणि पुरुष लेखकांच्या नजरेतून स्त्रियांची रेखाटली जाणारी प्रतिमा यांचा थोडक्यात आढावा येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त प्रस्तुत लेखात घेतला आहे. या लेखात अमृता प्रितम यांच्या१९७६ साली प्रकाशित झालेल्या आत्मकथेपासून ते प्रियांका पाटील यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'इब्रु' या कथा संग्रहापर्यंत मला भावलेल्या पुस्तकांमधून स्त्रिच्या भावविश्वाचं असलेलं चित्रण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, सहस्त्रकाची कवयित्री म्हणजे अमृता प्रितम - ज्या आपल्या मर्जीनुसार आयुष्य जगल्या, अगदी मुक्तपणे...पण स्वैर नाही. वयाच्या सहाव्या वर्षी प्रितम सिंह यांच्याशी झालेला विवाह, पण संवेदनशील मनाचा साहिर भेटल्यानंतर त्याच्यावर असलेलं प्रेम न लपवल्यामुळे वैवाहिक आयुष्यात माजलेली खळबळ... पण दुर्दैवाने फाळणीमुळे साहिरचं ही प्रेम हरवलं. त्या विरहातून बाहेर पडताना झालेला इमरोजशी परिचय. अमृता-इमरोज ४० वर्षांचा सहवास... अमृता- इमरोज म्हणजे कविता आणि प्रतिमा यांचं नातं. त्यांच्या बंडखोर निर्णयामुळे बरेचदा शंकास्पद आलेले कटूअनुभव हे त्यांच्या कविता आणि कथांमधून चित्रित झाले आहेत. ' कहानियो के आंगन मे ' या कथासंग्रहातील कथा त्या काळाच्या मनाने अत्यंत धाडसी होत्या. या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद माधवी देसाई यांनी केला होता. त्यातली दुःख भोग वाट्याला आलेल्या स्त्रियांची कहाणी मनाला हेलावून टाकते. त्यांचं 'रसीदी टिकट ' हे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्याच्या जमाखर्चाच्या कागदावर लावलेले पावतीचे तिकीट आहे असं त्या म्हणतात. म्हणूनच मीचं काय माझ्याप्रमाणे अनेकजण आजही अमृताजींचे चाहते आहेत.
'नाच ग घुमा' हे माधवी देसाई यांचं आत्मकथन वाचलं. जेव्हा हे पुस्तक हाती लागलं आणि वाचायला घेतलं... आणि अगदी झपाटल्याप्रमाणे अक्षरशः दोनच दिवसात पूर्ण केलं... केलं पण मन अगदी सुन्न झालं. हृदय अगदी कोणीतरी पिळवटून टाकल्यावर जी अनुभूती येईल तसं मला दोन तीन दिवस जड जड झालं होतं.
त्यापूर्वी माधवी देसाईंची फक्त... रणजित देसाई यांच्या पत्नी, एवढीच एक ओळख मला माहिती होती. १९८८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. आज साधारण ३५ वर्षांनंतरही पुरुषप्रधान मानसिकतेत फारसा फरक पडला आहे, असं मला जाणवतं नाही, हे ही खेदानचं सांगावं लागतं. त्यामुळे ते वाचताना पुरुषांच्या उभारलेल्या खेळात आजची स्त्री ही कुठेतरी रिंगण धरून " नाच ग घुमा...कशी मी नाचू" या ठेक्यात गोल फिरत आहे, तो ठेका, ते रिंगण भेदण्याचं धाडस तिच्याकडे म्हणजे आमच्या पिढीतील स्त्रियांकडे आज ही नाही, कदाचित कुटुंब व्यवस्था मोडकळीस येऊ नये म्हणून ही तिने स्वखुशीने हा फेर स्वीकारला असेल ...कारण रिंगण सोडलं तर मुलांची होणारी ससेहोलपट आपल्यामुळे आहे, हा अपराधभावही जगणं असह्य करतो.
माधवी देसाई या पूर्वाश्रमीच्या सुलोचना भालजी पेंढारकर. त्याकाळचं अग्रेसर असलेले मराठीतील दिग्दर्शक, निर्माता आणि खूप मोठ्ठ नाव... त्यांना तीन बायका आणि चार मुलं. मुलांना मिळालेला सर्वसामान्य मुलांचा संस्कार कुठेही त्यांच्यात अहंकार निर्माण करत नाही. शिक्षण चालू असतानाच लहान वयात चांगलं स्थळ आलं म्हणून गोव्याला नरेंद्र काटकर यांची पत्नी म्हणून गेल्यानंतर एका सर्व सामान्य व्यक्तींप्रमाणे एक साधं आयुष्य विना तक्रार जगत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षिकेची नोकरी धरली. इतकं साधं आयुष्य त्या जगत होत्या की, त्या राहात असलेल्या चाळीत एकदा लतादीदी रात्रभर राहून गेल्या तरी कोणाला साधी शंका ही आली नाही की ह्या त्या लता मंगेशकर असतील. याच काळात लिखाणाची आवडही रुजली. काटकरांपासून तीन मुली झाल्या... पण नियतीने खेळ केला नरेंद्र काटकरांचा अचानक झालेला मृत्यू हतबल करून गेला, पण वडिलांची शिकवण कितीही दुःख असेल तरीही घरात आतल्या खोलीत रडायचं आणि बाहेर हसतंच लोकांपुढे यायचं, कारण जगाला तुमच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. तशातच भेट झाली रणजित देसाई यांच्याशी आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. प्रेमाच्या आणा भाका व्यक्त करणारी कितीतरी पत्र त्यांनी पाठवली. ते म्हणायचे, या जगात माझ्यासाठी लोकसंख्या दोनच... एक मी आणि तू सोबत असशील तर तू,अशी दोन. म्हणजे लेखिका म्हणते की माझ्या जागी दुसरी जरी कोणी असती तर तीही भुलली नसती तर विशेष. त्यांच्या बरोबर लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला जी गेल्या बावीस वर्षांपासून मनोरुग्णालयात होती तिला घटस्फोट दिला, जो सहज सोपा होता. पण लग्न करून देसाई यांच्या घरी कोवाडला गेल्यानंतर एक माणूस म्हणून आलेला अनुभव कसा होता हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. तरीही एका नावाजलेल्या लेखकाची दुसरी पत्नी जिचं पाहिलं लग्न झालेलं आहे अशा स्त्रिला समाजाकडून मिळणारे टोमणे आणि त्यांना नवऱ्याने प्रतिउत्तर ही न देणं ही मनाला अस्वस्थ करणारी बाब नियमीत घडत असे. तरीही २२ वर्षे मनोरुग्णालयात असणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही भेटून तिला चांगलं करण्याचं, त्यांच्या मुलींची आईशी भेट घालून देण्याचं सत्कार्य त्या करत होत्या. त्यांच्या लेखनाचं श्रेयही समाज, देसाई यांची पत्नी म्हणूनच देत होता. पण त्यांची तगमग, होणारी घालमेल आणि १४ वर्षानंतर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवाय असं नवऱ्याकडून ऐकल्यानंतर झालेली घुसमट, कुचंबणा ही बरेचदा अनेक स्त्रियांची होत असते. त्यावेळी त्यांच्या कधीही पदमश्री न मिळालेल्या वडलांनी दिलेली समज- 'वासनेतुन निर्माण झालेल्या नात्यांचा शेवट असाच होतो' हे तत्वज्ञान जास्त मोलाचं वाटतं. समाजाने दिलेल्या पुरस्कारापेक्षाही विचारांमधली प्रगल्भता ही किती श्रेष्ठ असते याचं यथार्थ विश्लेषण या आत्मकथानात आहे.
म्हणूनच लेखिका म्हणते "आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं. ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्माची! अनेक रूपांत बदलत गेलेल्या भारतीय स्त्री जीवनाची! ती कपाळावरची रक्तरंजीत खूण असते! मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची आणि मोहाचीही! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा... बहुधा...."
ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांच्या 'नागकेशर ' या कादंबरीत राजकारणातील स्त्री पात्रांचं अतिशय रंजक आणि वास्तवादी चित्रण असल्यामुळे नागकेशरविषयी मला लिहावेसे वाटले. साधारण चारशे पानांची ही कादंबरी अतिशय प्रवाही असल्यामुळे एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. राजकीय पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबाची सत्ता, संपत्ती, अति महत्वाकांक्षा, ईर्षा ह्यामुळे होणारी वाताहत, त्याचे विदारक पण वास्तववादी चित्रण या कादंबरीत आहे.
बरेचदा आपण सर्वसामान्य माणसं राजकारणी लोकांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप अनभिज्ञ असतो आणि जे काही आपल्यासमोर येत असते त्या मागचे राजकारण वेगळेच असते. ज्या प्रमाणे झाडांच्या मूळ्यांची जमिनीखाली गुंतागुंत असते त्याचप्रमाणे मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचे चित्रण ह्या कादंबरीत दिसते.
सहकार महर्षी बापूराव डोंगरे देशमुख व त्यांचे बंधू बबन नाना ह्या दोन कुटुंबांची सत्ता, पैसा, लालसा, अहंकार ह्यामुळे होणाऱ्या वाताहातीचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. बापुरावांचे चिरंजीव प्रिन्स आणि बबनरावांचे चिरंजीव बाजीराव व त्यांच्या बायका शलाका आणि नेत्रा ह्यांच्यातील राजकीय शीत युद्ध हळूहळू चव्हाट्यावर येतं.
त्यांच्यातील रस्सीखेच ही लोकांच्या दृष्टीआड होऊ शकत नाही. प्रिन्स बरोबर विवाहासाठी दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर नाईलाजाने बबनरावांच्या पहिलवान पण गुडघ्यात भेजा असलेल्या बाजीरावाशी विवाहाच्या प्रस्तावास होकार देणारी नेत्रा प्रिन्सच्या सूड बुद्धीने इर्षेला पेटते. प्रिन्स मात्र विवाहित असलेल्या शलाकाबरोबर विवाह करतो. शलाका दोन विवाह करूनही अतिशय विचारी व संयमी असल्याने , राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही आगेकूच करते. यावरूनच सुष्ट आणि दृष्ट प्रवृत्तींमुळे होणारे मार्गक्रमण सकारात्मक आणि नकारात्मक कसे असू शकते ह्याचा अनुभव वाचताना येतो. पोट आणि पोटचं ह्या दोन केंद्रबिंदूभोवती फिरणारं आणि प्रसंगी एकमेकांच्या कमरेखालच्या जीवनाचं सोयीनुसार होणार महाराष्ट्रातील पुरोगामी राजकारणाचं कादंबरीतील चित्रण महत्वपूर्ण आहे. मानवी मन, त्याच्या असणाऱ्या विशेषतः नकारात्मक प्रवृत्ती, संयमाचा अभाव ह्या गोष्टी राजकीय जीवनातही कशा धोकादायक ठरू शकतात , ह्याचे यथार्थ चित्रण करताना लेखक विश्र्वास पाटील यशस्वी झाले आहेत. कादंबरीतील वातावरण, साखरेचं राजकारण, मेडिकल कॉलेज काही पात्रांची आडनावे यामुळे कादंबरीतील कथानक नगर जिल्ह्यातलेच असावे असे वारंवार वाटते. प्रिन्स आणि शलाका ही पात्रे नायक तर बाजीराव आणि त्याची पत्नी नेत्रा हे खलनायकाच्या रूपातील वाटतात. मात्र शलाका विवाहित असूनही घटस्फोटाशिवाय प्रिन्स सोबत दुसरे लग्न करते, तो संसार तडीस नेते हे धाडसही स्त्री करू शकते. मराठी साहित्यात राजकीय पार्श्वभुमीचे चित्रण करणाऱ्या मोजक्या कादंबऱ्यांमध्ये नागकेशरचा समावेश होईल. ज्याप्रमाणे नागकेशर ही वेलवर्गीय वनस्पती शेतात आल्यास उभ्या पिकाला उध्वस्त करते, त्याचप्रमाणे राजकीय ईर्षा, लालसा, अतिमहत्वाकांक्षा राजकारणात फोफावल्याने कसा विनाश होतो, ह्याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे.
मराठी साहित्यातील सध्याचे महान लेखक डॉ. रंगनाथ पठारे , ज्यांच्या चाळीसहुन अधिक साहित्यकृती प्रकाशित आहेत, त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ अभ्यास करून लिहिलेली 'सातपाटील कुलवृत्तांत ' ही सातशे वर्षांचा अजस्त्र पट उलगडणारी कादंबरी, अतिशय रंजक आणि मानवी मनाच्या गुंतागुंती बरोबरच अनेक पैलू उलगडा करणारी कदाचित मराठीतील एकमेव कांदबरी. यातून लेखकाने देवनाथ या सध्याच्या काळातील विज्ञानवादी प्राध्यापक असूनही समाजासोबत राहण्यासाठी कर्मकांड स्वीकारणारा व्यक्ती स्वतःचा सातशे वर्षांचा कुलवृत्तांत उलगडतो. आयुष्यभर ज्या जातीच्या फोल अहंकारात माणूस जगतो पण त्याला त्याचा कुलवृत्तांत अभ्यासल्यावर ब्राह्मण, महार, अफगाण म्हणजेच मुस्लिम अशा विविध जाती-धर्मांच्या मर्यादा ओलांडून आपला वंशवेल कसा वाढला आहे याचे रंजक आणि वैचारिक चित्रण आपणापुढे उभे केले आहे. आपला मूळ पुरुष अफगाणी आहे हे सांगताना ही लेखक कचरला नाही. पण त्याच बरोबर विवाह, लैंगिक संबंध त्यात असलेली मोकळीकता, जी काळाप्रमाणे त्यावर आलेल्या मर्यादा, यावरून एक प्रगतीशील काळाचे दर्शन आपणास होते. त्याचबरोबर सृष्टीची अमर्याद महानता यापुढे माणसाचा कवडीमोल ही नसलेला अहंकार आपण किती जपतो हे लेखकाने यात व्यक्त केले आहे.
मला यात जास्त भावले ते म्हणजे ही सात पाटील -श्रीपती, साहेबराव, दसरत, जानराव, राखमाजी आणि पिराजी, शंभूराव आणि देवनाथ यांची जरी कहाणी असली तरी ती खऱ्या अर्थाने त्यांच्या पाटलीनीची कथा आहे असे वाटते. स्त्री प्रधानता म्हणजेच मातृसत्ताक पद्धती किंवा स्त्रीमधील खंबीर आणि परखड नेतृत्व, हे समाजाच म्हणजेच कुलवृत्तांत विकासास किती मोठ्या प्रमाणात हातभार लावणारा आहे हे कादंबरी वाचल्याशिवाय लक्षात येत नाही.यातील सर्व नायिका आणि सहनायिका ह्या त्या त्या काळाच्या मानाने खंबीर निर्णयक्षमता असलेल्या आणि प्रसंगी आक्रमक देखील आहेत. यातील आरेना, आफुबाई, भीमबाई, देहूबाई या सर्व धडाडीच्या आहेतच पण मला जास्त भावलं ते उल्फीचं पात्र. उल्फी ... तिच्या सोंदर्यावर पाहाताक्षणी प्रेमात पडणारा पिराजी, विवाह न करताही त्याच्या सोबत त्याच्या मुलाला जन्म देणारी ही कोल्हाटी समाजातील स्त्री पिराजीवर विषप्रयोग झाल्यावर घोड्यावरून निघून जाते आणि ऐका इंग्रज अधिकाऱ्याच्या आश्रयाला जाते. त्याच्यासोबत इंग्लंडलाही जाते. खूपच रंजक आणि प्रभावी पात्र आहे. ह्या कादंबरीतील स्त्री नायिका आणि सह-नायिका या धडाडीच्या कर्तृत्व असलेल्या स्त्रिया आहेत. म्हणूनच एक स्त्री म्हणून आपणही आपल्यातील वेगळेपण सिद्ध करणं ही काळाचीच एक गरज झाली आहे.
अमृता प्रितम यांच्या प्रमाणेच धाडसाने स्त्रियांच्या आजच्या काळातील व्यथा व्यक्त करणारी लेखिका प्रियांका पाटील ही तरुण मुलगी. तिचं 'इब्रु' हे पुस्तक वाचताना मन सुन्न होतं. स्त्री-पुरुष या मानवी नाते संबंधातील स्त्री मनाची होणारी घुसमट ही ह्या नव्या युगातील स्त्रीची आहे. 'इब्रु' या मूळ कन्नड शब्दाचा अर्थ दोघी असा होतो. ही समलिंगी संबंधांवर आधारित कथा आहे. यातील प्रत्येक कथा ही लेखिकेच्या वैचारिक प्रगल्भतेचं अवलोकन करते. समाजातील तृतीयपंथीयांना मिळणारी उपेक्षा अगदी सहजपणे 'त्याच्यातील ती' या कथेत मांडली आहे. मला सर्वच कथा जसं नास्तन, डेस्टिनेशन, निळावंती, रणमर्दिनी, बोगदा, मोक्ष या खूप भावल्या पण त्यातही रांजण या कथेत रूपकात्मक केलेला रांजणाचा उल्लेख तरुण स्त्रिच्या तारुण्य सुलभ भावनांचा होणारा कोंडमारा व्यक्त करतो. ब्रेस्ट कॅन्सरमुळे स्तन काढल्याने आलेलं अपुरेपण कथेतील नायिकेला तिच्या नवऱ्याकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे भरून निघतं. रणमर्दिनी या कथेतील बलात्कारीत स्त्री बाळाला जन्म देऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून यश शिखरावर जाते, ही खूपच प्रेरक कथा आहे.
लेखिका प्रियांका पाटील म्हणते "समाजाच्या साचेबद्ध चौकटीतून बाहेर फेकलेल्या या बायका- कुणी विधवा, घटस्फोटित, कुणी नवऱ्यानं वाऱ्यावर सोडलेली बाई, कुणी बिन बापाची, तर कधी वेश्या, तर कधी तृतीयपंथी, कधी अफाट बुद्धिमत्ता आणि सौंदर्य असूनही शापित आयुष्य जगणारी, तर कुणी तारूण्य सुलभ मोहाला-वासनेला संयमित करणारी, कुणी समाजातल्या थोतांडरूपी चालीरीतीना फाट्यावर मारणारी, तर कधी बलात्कारीत, तर कधी स्तन गमावलेली ...अशा अनेक हाडामासांच्या पात्रांनी माझं आयुष्य व्यापलं आणि मग त्या साऱ्या व्यथा कथारूपात माझ्या लेखणीतून अवतरु लागल्या" अशा समर्थ लेखिकेला प्रियांका पाटील या नव्या दमाच्या, धडाडीच्या लेखिकेला माझा सलाम!!!
म्हणूनच साहित्यातील स्त्री प्रतिमांचा त्यांच्या भावविश्वाचा अभ्यास हा अत्यंत महत्वपूर्ण असून काळाचे पडणारे पडसाद हे त्यांच्या व्यथा , वेदनांमधून लक्षात येतात. त्यांच्या विकासासाठी प्रेरणादायी वातावरण देणं,तिच्या निर्णयांना समजून घेणं ही समाजाची जबाबदारी आहे.
जागतिक महिला दिनाच्या सदिच्छा!!!
प्राचार्या डॉ.अनुश्री खैरे, Anuradha Dubey
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय, लोणी
Rangnath Pathare Sir Vishwas Patil Sir😊🙏