02/03/2026
इचलकरंजीत हॉकी स्टेडियम नूतनीकरणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन
इचलकरंजी : शहरातील क्रीडा परंपरेला चालना देण्यासाठी रिंग रोड परिसरातील देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी स्टेडियमचे तातडीने नूतनीकरण करून खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन आज मा. महापौर यांना इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने सादर करण्यात आले.
इचलकरंजी शहराने राज्य व देशाला अनेक नामांकित खेळाडू दिले असून राष्ट्रीय खेळ हॉकीचीही येथे समृद्ध परंपरा आहे. या खेळाच्या विकासासाठी उभारण्यात आलेले देशभक्त बाबासाहेब खंजिरे हॉकी स्टेडियम सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून होतकरू व नवोदित खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची खंत निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
निवेदनात स्टेडियमच्या नूतनीकरणासोबत खालील सुविधांची मागणी करण्यात आली आहे :
१) दर्जेदार हॉकी मैदान व आधुनिक टर्फ
२) प्रेक्षकांसाठी सुरक्षित आसन व्यवस्था
३) खेळाडूंसाठी बदलण्याची खोली (Changing Rooms)
४) स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह सुविधा
५) प्रकाश व्यवस्था (फ्लड लाईट्स)
६) प्रशिक्षक व सरावासाठी आवश्यक साहित्य
शहरातील हॉकी परंपरेचे जतन व संवर्धन होऊन नव्या पिढीतील गुणवंत खेळाडू घडावेत, यासाठी महापौरांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या निवेदनामुळे शहरातील क्रीडाप्रेमी व खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी युवक अध्यक्ष श्री अभिजीत रवंदे , नगरसेवक श्री नंदकुमार पाटील, नगरसेवक श्री सचिन राणे, निखिल जमाले, संतोष पाटील, अनिकेत धुमाळ, सुशांत कोटगी, आनंदा कांबळे ,विष्णू देडे , निसर्ग भुते , संजय अथणे, सचिन नाकिल, गणेश सावरतकर , वाजीद तासगावे यांच्या सह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.