25/06/2026
https://www.facebook.com/share/18s2Kzcu2z/
धावत्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये आरोग्य सेविकेचे धाडस; सुरक्षित प्रसूती करून माता-बाळाला दिले जीवनदान
गोंदियाच्या राजश्री भोंडे यांचे प्रसंगावधान; सर्व स्तरांतून कौतुक
#गोंदिया - कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि सेवाभाव यांचा प्रेरणादायी प्रत्यय नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये नुकताच आला. गोंदिया जिल्ह्यातील काटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मरारटोला उपकेंद्राच्या आरोग्य सेविका (ए.एन.एम.) श्रीमती राजश्री भोंडे (नेवारे) यांनी धावत्या ट्रेनमध्ये एका गरोदर महिलेची यशस्वी व सुरक्षित प्रसूती करून माता व नवजात बाळाला जीवनदान दिले. त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दि. २४ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस भुसावळ स्थानक ओलांडून जळगावच्या दिशेने वेगाने धावत होती. याच दरम्यान एका गरोदर महिला प्रवाशाला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. दुरंतो एक्सप्रेसला मर्यादित थांबे असल्याने पुढील स्थानक बरेच दूर होते. महिलेसोबत केवळ तिच्या दोन लहान मुली होत्या. त्यामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
योगायोगाने, त्याच डब्यातून मुंबईला प्रवास करणाऱ्या आरोग्य सेविका राजश्री भोंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने पुढाकार घेतला. प्रसूतीसाठी आवश्यक वैद्यकीय साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रसूतीची जबाबदारी स्वीकारली. अवघ्या वीस मिनिटांत, पहाटे सुमारे २.५० वाजता त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच महिलेची सुरक्षित प्रसूती करून एका निरोगी बाळाचा जन्म घडवून आणला.
प्रसूतीनंतर रेल्वे प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर दुरंतो एक्सप्रेसला विशेष थांबा देण्यात आला. तेथे सज्ज ठेवण्यात आलेल्या ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे माता व नवजात बालकाला पुढील उपचारांसाठी वैद्यकीय पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या माता आणि बाळ दोघेही सुरक्षित व निरोगी आहेत.
राजश्री भोंडे यांनी दाखविलेली तत्परता, धैर्य आणि सेवाभाव आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद ठरला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत तसेच काटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम गौतम यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
"कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य देणे, हेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे खरे कर्तव्य आहे. राजश्री भोंडे यांनी संकटसमयी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा आणि धैर्य संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
प्रतिक्रिया
"माझ्या १४ वर्षांच्या सेवाकाळात आलेला हा सर्वांत वेगळा आणि आव्हानात्मक अनुभव होता. कोणतीही वैद्यकीय साधने किंवा सहकारी सोबत नसताना आलेल्या या प्रसंगात एका मातेचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवणे हेच माझे कर्तव्य होते. ईश्वराची कृपा आणि व्यावसायिक अनुभवाच्या बळावर ही प्रसूती सुरक्षितरीत्या पार पाडता आली. या कार्याचा मला अभिमान आहे."
श्रीमती राजश्री भोंडे (नेवारे)
आरोग्य सेविका, उपकेंद्र मरारटोला (काटी), गोंदिया