29/09/2015
कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान
71 नगरपरिषदा / नगरपंचायतींसाठी 1 नोव्हेंबर व 6 नोव्हेंबरला मतदान
एकूण 2352 ग्रामपंचायतींसाठी 3 टप्प्यात मतदान
मुंबई, दि. 28 : कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिका, नवनिर्मित 3 नगरपरिषदा व 64नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींसाठी 6 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होईल. त्याचबरोबर राज्यभरातील एकूण 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 ऑक्टोबर 2015; तसेच 1 व 6 नोव्हेंबर 2015 अशा तीन टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस आयोगाचे सचिव डॉ.प्रदीप व्यास उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगीतले की, निवडणूक होत असलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असेल. आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणीकरीता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागेल. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल; तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण 122 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 61 जागा महिलांसाठी राखीव आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 61 जागा महिलांसाठी राखीव आहेत. दोन्ही ठिकाणी 2 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल.
महानगरपालिका निवडणूक
नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे: 6 ते 13 ऑक्टोबर 2015
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 14 ऑक्टोबर 2015
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 16 ऑक्टोबर 2015
निवडणूक चिन्हांचे वाटप: 17 ऑक्टोबर 2015
मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी: 17 ऑक्टोबर 2015
मतदानाचा दिनांक: 1 नोव्हेंबर 2015
मतमोजणी: 2 नोव्हेंबर 2015
नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक
नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे: 1 ते 8 ऑक्टोबर 2015
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 9 ऑक्टोबर 2015
अपील नसल्यास नामनिर्देशनपत्र मागे घेणे: 19 ऑक्टोबर 2015
अपील असल्यास नामनिर्देशनपत्र मागे घेणे: निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत
निवडणूक चिन्हांचे वाटप: माघारीनंतर दुसऱ्या दिवशी
मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी: 26 ऑक्टोबर 2015
मतदानाचा दिनांक: 1 नोव्हेंबर 2015
मतमोजणी: 2 नोव्हेंबर 2015
1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होत असलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे-मुरबाड, शहापूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- दोडामार्ग, वाभावे-वैभववाडी, पुणे- चाकण नगरपरिषद, धुळे-साक्री, अहमदनगर-अकोले, कर्जत, पारनेर, नाशिक- निफाड, पेठ, चांदवड नगरपरिषद, देवळा, कळवण, सुरगणा, औरंगाबाद – सोयगाव, लातूर-जळकोट, चाकूर, देवणी, शिरुर-अनंतपाळ, परभणी- पालम, बीड-शिरुर, वडवणी, पाटोदा, आष्टी, जालना- बदनापूर, घनसावंगी, जाफ्राबाद, मंठा, बुलढाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब,झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव अमरावती- भातकुली, धारणी, नांदगाव-खांडेश्वर, तिवसा गोंदिया- सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, भंडारा- मोहाडी, साकोली, लाखणी, लाखांदूर वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर चंद्रपूर – चिमूर नगरपरिषद, पोंभूर्णा, सावली गडचिरोली- मुलचेरा, भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी.
चाकण नगरपरिषदेचा अपवाद वगळता या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. चाकण नगरपरिषदेच्या एकूण 23 जागांसाठी मतदान होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, कुरखेडा व आरमोली या 4 नगरपंचायतींसाठी 6 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होईल व 7 नोव्हेंबर 2015 रोजी मतमोजणी होईल. विविध जिल्ह्यांमधील 12 नगरपरिषदांच्या 17 जागांच्या रिक्त पदांसाठी देखील 1 नोव्हेंबर 2015 रोजी पोटनिवडणुका होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक
रायगड (48), रत्नागिरी (10), पुणे (47), नंदूरबार (23), अहमदनगर (11), बीड (23), अकोला (15) व चंद्रपूर (12) या 8 जिल्ह्यातील एकूण 189 ग्रामपंचायतींसाठी 28 ऑक्टोबर 2015 रोजी मतदान होईल. त्यासाठी 7 ते 13 ऑक्टोबर 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दिली व स्वीकारली जातील. 29 ऑक्टोबर 2015 रोजी मतमोजणी होईैल.
ठाणे (113), नाशिक (44), जळगाव (4), सातारा (171), सोलापूर (528), सांगली (54), कोल्हापूर (6), औरंगाबाद (23), नांदेड (611), परभणी (38), उस्मानाबाद (7), जालना (482), लातूर (6), हिंगोली (30), अमरावती (5), यवतमाळ (3), बुलढाणा (6), वाशिम (2), वर्धा (5), गोंदिया (1) व गडचिरोली (सिरोंचा, अहेरी, भामरागड, ऐटापल्ली, मुलचेरा व चामोर्शी या तालुक्यातील 15) अशा एकूण 2 हजार 154 ग्रामपंचायतींसाठी 1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल. उर्वरित सर्व ठिकाणी सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. त्यासाठी 13 ते 17 ऑक्टोबर 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दिली व स्वीकारली जातील. 3नोव्हेंबर 2015 रोजी मतमोजणी होईल.
तिसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा व कोरची तालुक्यातील एकूण 9 ग्रामपंचायतींसाठी 6 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. त्यासाठी 16 ते 21 ऑक्टोबर 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दिली व स्वीकारली जातील. मतमोजणी 7 नोव्हेंबर 2015 रोजी मतमोजणी होईल. या सार्वत्रिक निवडणुकांसोबत विविध कारणांसाठी रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणुका देखील होणार आहेत.