16/07/2026
जल जीवन मिशनच्या कामांना गती द्यावी!
जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से) यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से) बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीषकुमार भोरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से) यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश असून, त्यासाठी सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव सादर करावे. योजनेचा नियमित आढावा घ्यावा. अपुर्ण कामे त्वरीत पुर्ण करावी. ज्या योजनेची कामे पुर्ण झाली आहेत अशा कामाची चाचणी (ट्रायल रन ) घ्यावी. कामपुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून घ्यावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बेलदार म्हणाले की, जलजीवन मिशनच्या कामांना नियमित भेटी द्याव्यात. मंजूर कामाचे त्रयस्थ परीक्षण करावे. स्विच रुमचे कामे त्वरीत पुर्ण करावी. बैठकीत योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.