14/10/2018
देऊळगावराजा येथील श्री बालाजी मंदिर
मित्रांनो, औरंगाबाद येथून ८५ कि. मी. तर जालना येथून अवघ्या 25 कि.मी . तसेच जिजाऊ जन्म ठिकाणा पासून 12 कि. मी . अंतरावर असलेले देऊळगावराजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रती-तिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ते आमचे कुलदैवत असल्यामुळे वर्षातून किमान एक वेळा आम्ही देऊळगावराजा येथे जात असतो. तेथील नवरात्रौत्सवास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे काका, राजे जगदेवराव जाधव, दरवर्षी तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असत. एके वर्षी ते दर्शनाला जाऊ शकले नाही, परंतु त्यांच्या अपार श्रद्धेपोटी श्री बालाजींचा त्यांना साक्षात्कार झाला व त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात बालाजीची धातूची मूर्ती सापडली.
असे म्हंटले जाते कि, नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी गिरी पर्वतावर ध्यान धारणा करत असतात. याच काळात राजे जगदेवराव यांना श्री. बालाजीमहाराजांनी दर्शन दिले. बालाजींच्या साक्षात्कारानुसार, राजे जगदेवराव जाधवांनी देऊळगावराजा येथे श्री व्यंकटेश अर्थात बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे सर्वागसुंदर असे मंदिर बांधले.
बालाजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव, ३३३ वर्षांपूर्वी म्हणजे १६८५ साली नवरात्रातील दहा दिवस चालला. घटस्थापना, लाटामंडप उत्सव, लळित उत्सव, असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे येथे मुक्कामास असत. आजही याच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे केले जातात.
कोल्हापूरनिवासी, महालक्ष्मी देवीच्या आज्ञेवरून, करवीरचे कण्वशास्त्रीय देवशर्मा यांनी देऊळगावराजा येथील श्री बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे.
त्याचप्रमाणे. श्री. बालाजी तिरुपतीला रहातात, वाशीम येथे जेवण करण्यास जातात तर देऊळगावराजा येथे व्यापार करण्यासाठी येतात, असाही समज आहे.
तिरुपती येथील बालाजी मंदिर अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन वद्य चतुर्थी दरम्यान बंद असते, आणि नेमक्या याच वेळी देऊळगावराजा येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात साक्षात श्री, तिरुपती बालाजीचे वास्तव्य देऊळगावराजा येथे असते असे मानले जाते.
देऊळगावराजा येथील श्री बालाजींचे मंदिर १०५ फूट लांब व ८० फूट रुंद आहे. मंदिरात श्री बालाजींची पंचधातूची मूर्ती सोन्या-चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे.
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगावराजा येथील श्री बालाजींना सोन्या-चांदीची आभूषणे अर्पण केली होती. आजही ती आभूषणे बालाजीच्या मूर्तीवर चढविली जातात.
घटस्थापनेच्या दिवशी लाटा मंडप उत्सव होतो. एकवीस सागवानी उंच लाटांवर (खांब) एक मंडप उभारला जातो. तो नवरात्राच्या नऊ दिवसात कायम असतो. समाप्तीला लाटा काढून घेऊन लळित उत्सव साजरा केला जातो. याच काळात श्री बालाजी व श्री देवी यांचा नयनरम्य अनुपम्य विवाह सोहोळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. पेशव्यांच्या काळापासून या उत्सवात कुठलाही बदल झालेला नाही.
अशा या लक्ष्मी-व्यंकटेश मंदिरास भेट दिल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय असतो .
"बोल बाला साहेब की जय ; “ लक्ष्मी-रमण गोविंदा “