Maharashtra Information Centre,New Delhi

Maharashtra Information Centre,New Delhi Official page of Maharashtra Information Centre, New Delhi (DGIPR), Government of Maharashtra

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्णनवी दिल्ली, दि.2- मुंबई -अहमदा...
02/06/2026

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण

नवी दिल्ली, दि.2- मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे यशस्वी वेधन पूर्ण झाले असून, भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे मार्गिकेच्या उभारणीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावाजवळ हा बोगदा काम पूर्ण करण्यात आले आहे.

४१७ मीटर लांबी आणि १४.४ मीटर रुंदी असलेला हा बोगदा अत्याधुनिक देखरेख व सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक तांत्रिक सुविधा या बोगद्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या यशासह, महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत तीन पर्वतीय बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक विभागातील कामाला वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एम टी -05 आणि एम टी -06 या बोगद्यांचेही यशस्वी वेधन पूर्ण झाले होते.

संपूर्ण उत्खनन प्रक्रियेदरम्यान संरचनात्मक स्थिरता, अचूक अंमलबजावणी आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक भूतांत्रिक उपकरणे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालींचा वापर करण्यात आला. सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, थ्री डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्सच्या साहाय्याने कंपने, बोगद्याची स्थिरता आणि सभोवतालच्या संरचनांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. तसेच, वायुवीजन प्रणाली, अग्निसुरक्षा व्यवस्था, नियंत्रित प्रवेश आणि सतत भूतांत्रिक निरीक्षण यांसारख्या सर्वसमावेशक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या.

यापूर्वी २ जानेवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ १.५ किलोमीटर लांबीच्या MT-05 बोगद्याचे वेधन पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी MT-06 या ४५४ मीटर लांबीच्या बोगद्याचे वेधन ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ च्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले.

महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी एम टी -05, एम टी -06 आणि एम टी -07 या बोगद्यांचे वेधन आता पूर्ण झाले असून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. एम टी -08 या ३५० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम यापूर्वीच ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्ण झाले होते.

सध्या एम टी -03 बोगद्याचे उत्खनन ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून एम टी -04 बोगद्याचे काम सुमारे ६० टक्के पूर्ण झाले आहे. एम टी -01 आणि एम टी -02 या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जात असून, या विभागातील बांधकाम कार्याला गती मिळाली आहे. वापी आणि बोईसर स्थानकांदरम्यान असलेल्या एम टी -08, एम टी -07 आणि एम टी -06 या तिन्ही डोंगराळ बोगद्यांचे उत्खनन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतात प्रगत बोगदा-निर्मिती, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि उच्च-गती रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. सुरक्षित, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा रेल्वे वाहतुकीचा मजबूत पाया या प्रकल्पाद्वारे उभारला जात आहे.

*************************

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-130/ दि.02.06.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

निवासी आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती सिंघल यांनी स्विकारला.नवी दिल्ली- महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सि...
31/05/2026

निवासी आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती सिंघल यांनी स्विकारला.

नवी दिल्ली- महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज श्रीमती आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी विशेष आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सिंघल यांची निवासी आयुक्त व सचिव म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

श्रीमती सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2009 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव, सातारा जिल्हाधिकारी आदी पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

*******

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 129, दिनांक – 31.05.2026

आम्हाला फॉलो करा एक्स - https://x.com/MahaGovtMic
https://x.com/micnewdelhi
https://x.com/MahaMicHindi

राजधानीत अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादननवी दिल्ली, 31: थोर समाजसुधारक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्य...
31/05/2026

राजधानीत अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, 31: थोर समाजसुधारक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित आज महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी माजी मंत्री महादेव जानकर, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह सदनातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचाही थोडक्यात परिचय करून दिला.

0000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 127, दिनांक – 31.05.2026

आम्हाला फॉलो करा एक्स -
https://x.com/MahaGovtMic
https://x.com/micnewdelhi
https://x.com/MahaMicHin

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्ती निमित्ताने  निरोपनवी दिल्ली,३१: महाराष्ट्र सदनच्या निवासी ...
31/05/2026

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप

नवी दिल्ली,३१: महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला ३३ वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाल्या. नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, तसेच हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य डॉ. सुमेधा कटारिया ( निवृत्त आयएएएस) प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आर. विमला यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेली प्रशासकीय सेवा, लोकाभिमुखता आणि उपक्रमशीलतेचा गौरव केला. नवी दिल्लीत राज्याचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र सदनच्या माध्यमातून राज्याची प्रतिमा उंचावण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे प्रशंसोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

या निरोप समारंभाला महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी आर. विमला यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली-वृत्तविशेष -128, दिनांक – 31.05.2026

आम्हाला फॉलो करा एक्स -
https://x.com/MahaGovtMic
https://x.com/micnewdelhi
https://x.com/MahaMicHindi

आर. जी. राजन यांच्या 'मॅनेजमेंट म्युझिंग्स' पुस्तकाचे प्रकाशननवी दिल्ली, दिनांक २९ मे:  खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्...
29/05/2026

आर. जी. राजन यांच्या 'मॅनेजमेंट म्युझिंग्स' पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली, दिनांक २९ मे: खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि व्यवस्थापन अभ्यासक श्री. आर. जी. राजन यांच्या 'मॅनेजमेंट म्युझिंग्स' या पुस्तकाचे प्रकाशन हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. सुमेधा कटारिया यांच्या हस्ते येथे करण्यात आले.

नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक श्री. हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त श्री. नितीन शेंडे आणि जनसंपर्क अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे, श्रीमती मालती राजगोपालन आदी उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक श्री. राजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि आपल्या कॉर्पोरेट प्रवासातील अनुभव सांगताना अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. खते- रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील आपल्या ४५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाबाबतही माहिती दिली.

या पुस्तकात नेतृत्वगुण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स (संस्थात्मक सुशासन), व्यावसायिक नीतिमत्ता आणि शाश्वत विकास या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. केवळ तांत्रिक किंवा वित्तीय यश हेच कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचे मोजमाप असू शकत नाही. उत्तम चारित्र्य, कामातील सचोटी आणि लोककेंद्री नेतृत्व हेच दीर्घकालीन संस्थात्मक यशाचे खरे गमक आहे,असे श्री. राजन यांनी यावेळी संवाद साधताना स्पष्ट केले.

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-126/ दि.29.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चानवी दिल्ली,२८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्...
28/05/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली,२८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस कालपासून दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या समवेत काल ऊस आणि कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच सिंचन प्रकल्प,जलजीवन मिशन आदींबाबत महत्त्वपूर्ण बैठका झाल्या होत्या.

********

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-125/ दि.28.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादननवी दिल्ली, २८:  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर...
28/05/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

नवी दिल्ली, २८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यानंतर कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

********

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-124/ दि.28.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल- मुख्यमंत्र्यांची माहितीकेंद्रीय सहकार मंत्री अ...
27/05/2026

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल- मुख्यमंत्र्यांची माहिती

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

नवी दिल्ली, दि. 27: साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत आज झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे आज महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात श्री. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची सकारात्मक चर्चा झाली.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, खा. धनंजय महाडिक, आ. दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, डॉ राहुल आहेर, विनय कोरे, राहुल कुल, अभिमन्यु पवार, विनय कोरे, राजेश टोपे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, रणजितसिंह निंबाळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, सुहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे , साखर आयुक्त संजय कोलते आधी या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेतील मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. साखरेच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकार मंत्र्यांसोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे श्री. शाह यांनी मान्य केले आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य सरकारसोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासह व्याज सवलतीचे (इंटरेस्ट सबव्हेंशन ) पैसे तात्काळ देण्याचे मान्य करण्यात आले करण्यात आले आहे. 'क्वेल प्राइजिंग' ( किंमत नियंत्रण) संदर्भात केंद्राने एक प्रस्ताव मागवला असून, राज्य सरकारकडून तो तयार केला आहे व लवकरच सादर केला जाईल. या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय झाले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, नाफेड आणि एनसीसीएफने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता, थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. २ लाख टनांऐवजी १० लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने करावी, यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही. यासाठी कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात 'एक्सपोर्ट सरचार्ज' लावला पाहिजे, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच कांद्याचा खरेदी भाव नुकताच वाढवून १५ रुपये ८० पैसे करण्यात आला आहे. तो आणखी कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली. कांद्याच्या बियाणांवर निर्बंध असले, तरी कांद्याच्या निर्यातीवर (कांदा पाठवण्यावर) कोणतीही बंदी नाही, असे या चर्चेत स्पष्ट करण्यात आले.

नाफेड किंवा एनसीसीएफमध्ये ग्रेडिंगच्या नावाखाली माल निकृष्ट दर्जाचा दाखवून खरेदी नाकारली जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते. यावर उपाय म्हणून आता यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणार असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, आंबा आणि हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले. विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावर केंद्रीय मंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली .

000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-123/ दि.26.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewdelhi, https://x.com/MahaMicHindi

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्यामाध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्...
27/05/2026

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या

माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा

नवी दिल्ली, दि. 27 : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाळ अंत्योदय भवन येथे आयोजित या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्र सरकारच्या जलसंपदा विभागाचे सचिव व्ही. एल. कांथाराव, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के. के. मीना, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अनुपम प्रसाद, नॅशनल वॉटर मिशनच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नवीन सोना, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार श्रीराम वेदिरे , जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंर्गंत राज्यात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जादा निधीची मागणी करण्यात आली. त्यास केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जलजीवन मिशनमधील उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. राज्यातील 75% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना, तसेच 50% ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. या पाईपलाईन आणि पाणी पायाभूत सुविधांच्या योजनांना गती देऊन त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून अंदाजे 6,800 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे स्थानिक गावे, ग्रामपंचायती, तालुके आणि जिल्हा पातळीवर अचूक प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. राज्य आणि केंद्र अधिकाऱ्यांनी 90% योजनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सद्यस्थितीत आढळून आलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत, जलस्रोतांचे बळकटीकरण केले जात आहे आणि पुढील कामे दर्जेदार होतील याची कडक खबरदारी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जल जीवन मिशन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करेल. केंद्र सरकारकडून अधिकाधिक सहकार्य अपेक्षित असून त्यानंतर प्रलंबित बाबी मार्गी लावून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सुमारे 40 टक्के धरणे असूनही राज्यातील जवळपास 50 टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यावर जलसंधारण आणि लोकसहभाग हाच दीर्घकालीन उपाय आहे. ‘जलतारा’सारख्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात येणार असून सीएसआर आणि मनरेगा निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राबवली जातील. जलताराचे स्ट्रक्चर्स वाढवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. 'जलयुक्त शिवार'च्या माध्यमातून आधीच काम सुरू असून, कन्व्हर्जन्स करून हे काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पांमध्ये राज्यांमध्ये सहमती होण्यास वेळ लागतो, असे प्रधानमंत्र्यांचे मत असल्याने राज्यांतर्गत असलेल्या नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.राष्ट्रीय जल आयोगाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून या प्रकल्पांच्या निधी वाटपासंदर्भात पुढील सकारात्मक चर्चा होईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भाग्य बदलू शकते, अशी खात्री व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राकडे पाणी वळविण्याचे प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्यातील सध्याचा 52 टक्के दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त होऊ शकतो. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून दरवर्षी समुद्रात जाणाऱ्या 100 टीएमसी पाण्यापैकी 62 टीएमसी पाणी वळविण्याचे नियोजन आहे. तसेच उल्हास खोऱ्यामधील 350 टीएमसी पाण्यापैकी 75 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याची योजना आहे.या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व अभ्यास आणि अहवाल पूर्ण झाले असून केंद्रीय जल आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करता येईल. या मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारदरम्यान या संदर्भात करार झाला असून भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आढाव्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी जलसंधारण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलक्रांती घडवून आणण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, नागपूर आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पारंपरिक धरणे आणि कालव्यांसोबतच ‘जलसंचय आणि जनभागीदारी’वर आधारित जलसंधारण मॉडेल अधिक प्रभावी ठरत आहे.

त्यांनी महाराष्ट्रातील ‘जलतारा’ योजनेचे विशेष कौतुक करत सांगितले की, अवघ्या 4 ते 5हजार रुपयांत उभारल्या जाणाऱ्या या छोट्या स्ट्रक्चरमुळे एका हंगामात एका एकरात 3 ते 4 लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 1 ते 2 जलतारा स्ट्रक्चर उभारल्यास भूजल पातळीत तात्काळ सुधारणा दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

श्री पाटील यांनी सांगितले की, सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेल्या मोहिमेत 31 मे 2025 पर्यंत 10 लाख स्ट्रक्चर्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात 27.50 लाख स्ट्रक्चर्स उभारण्यात आली. तसेच 31 मे 2026 पर्यंत 1 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आजपर्यंत 1 कोटी 26 लाख कामे पूर्ण झाली आहेत. 31 मेपर्यंत हा आकडा 1.5 कोटींवर नेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की, मनरेगा अंतर्गत डार्क झोन भागात 65 टक्के निधी जलसंधारणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली असून सेमी-क्रिटिकल भागात 40 टक्के आणि इतर भागात 30 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात लोकसहभागातून 30 हजार स्ट्रक्चर्स उभारल्यानंतर भूजल पातळीत मोठी सुधारणा झाल्याचा अनुभव त्यांनी मांडला.

मुक्ताईनगर येथे सीएसआर फंडातून 12 कोटी रुपये खर्च करून जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यामुळे तीव्र पाणीटंचाई दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘जल जीवन, जल संचय, जन भागीदारी’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना लोकचळवळीत रूपांतरित झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

हर घर जल योजनेमुळे देशातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पाणी आणण्यासाठी महिलांचा मोठा वेळ खर्च होत होता; मात्र आता घराघरांत स्वच्छ पाणी उपलब्ध होत असल्याने आरोग्य सुधारत असून आरोग्य खर्चातही मोठी बचत होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरापर्यंत अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

जी रामजी योजनेत जलसंधारणाच्या कामांना अधिक महत्त्व देण्याचा आग्रह राज्याकडून धरण्यात आला असून डार्क झोनमध्ये ( भूजल पातळी अत्यंत खालावलेले क्षेत्र ) असणाऱ्या गावांना 65 टक्के एवढा निधी तर सेमी डार्क झोनमधील गावांना 45 टक्के निधी तर उर्वरित गावांना 30 टक्के निधी मिळणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.या योजनांसाठी आवश्यक असलेल्या अधिकच्या निधीची मागणी करण्यात आली असून, त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

************

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-122/ दि.26.05.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewdelhi, https://x.com/MahaMicHindi

पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कारनवी दिल्ली, २६ मे: आपल्या  समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्...
26/05/2026

पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार

नवी दिल्ली, २६ मे: आपल्या समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात आज एक विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्याहस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र सदनात आयोजित या सोहळ्याला माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. बोथे म्हणाले,देशाच्या राजधानीत आणि विशेषतः आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सदनात झालेला हा सत्कार माझ्यासाठी घरच्या कौतुकासारखा आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नसून, माझ्या जीवनात आलेले महान संत, स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा हा गौरव आहे. महाराजांनी स्थापन केलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज आश्रमातून हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते देशाची संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम जगवण्यासाठी अविरत काम करत आहेत. त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी जनार्दन बोथे यांच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राच्या मातीतून देशपातळीवर चमकणाऱ्या अशा ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्याची संधी महाराष्ट्र सदनाला मिळाली, हे आमचे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

माहिती संचालक हेमराज बागुल यांनी बोथे यांचे सामाजिक कार्य या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष-121/ दि.26.05.2026
एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewdelhi, https://x.com/MahaMicHindi

Address

A/8 Sate Emporia Building, Baba Kharak Sing Marg, New Delhi-11000
Delhi
110001

Telephone

+911123367830

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Information Centre,New Delhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Information Centre,New Delhi:

Share