24/02/2026
*श्रीक्षेत्र नागरवाडी येथे संत गाडगेबाबांचा १५० वा जयंती महोत्सव उत्साहात साजरा.*
*संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात भव्य अन्नदान व वस्त्रदान सोहळ्याचे आयोजन.*
*चेअरमन मधुसूदन दादा मोहिते पाटील यांची समारोपीय सोहळ्याला विशेष उपस्थिती.*
*हरिनामाच्या गगनभेदी निनादात दुमदूमली नागरवाडी इंद्रभुवन नगरी.*
(तालुका प्रतिनिधी चांदूरबाजार)... स्वच्छतेचे आद्यजनक, विज्ञानवादी थोर समाजसुधारक, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांचे "अंतिम श्रध्दास्थान" तसेच शासन सन्मानित पर्यटन व तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या, श्री गाडगे महाराज संस्था श्रीक्षेत्र नागरवाडी येथे, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा १५० वा जयंती महोत्सव विविध सेवाभावी उपक्रमातून नुकताच पार पडला.
प्रामुख्याने या सेवाभावी महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला, हजारो कर्करोग रुग्णांचे आधारवड असलेले रुग्णसेवक तथा श्री गाडगे महाराज धर्मशाळा दादरचे मुख्यव्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक कुणाल देशमुख समवेत संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांचे शुभहस्ते सिंहासनस्थित, श्री बाबांच्या मुर्तिचे पुजन व महाआरती करीत त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासुन संस्थेचे सर्वेसर्वा तथा नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिप्रेत सेवाभावी असा जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो.या महोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहभर काकड आरती,श्री बाबांची सामुदायिक प्रार्थना,भजन-कीर्तन-हरिनाम,प्रवचन,अन्नदान व वस्त्रदान,स्वच्छता अभियानासह शैक्षणिक व सेवाभावी कार्यक्रम अतिशय सुनियोजनातून उत्साहपुर्ण वातावरणात पार पडले.
विशेषत: समाप्ती सोहळ्याला वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांच्या प्रतिमेची नागरवाडी इंद्रभुवनाच्या परिसरात भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी हजारो भविक भक्तांनी व दिंडी पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभात घेत "गोपाला गोपाल देवकी नंदन गोपालाच्या" गगनभेदी निनादात नागरवाडी इंद्रभुवनाचा परीसर दुमदुमून गेला होता. तद्नंतर समाज प्रबोधनकार श्री.भरत महाराज रेळे यांचे संत गाडगेबाबांच्या जिवन चरित्रपर प्रवचन तसेच ह.भ.प. पडोळे महाराज यांनी काल्याचे किर्तन करत संत गाडगेबाबांच्या कार्यांची महती यावेळी विशद केली.
या जयंती महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला प्रमुख उपस्थित पाहूण्यांचे संस्थेच्या वतीने संचालक कुणाल देशमुख यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
कर्मयोगी संत गाडगेबाबांनी अखेरच्या क्षणापर्यंत दिनदुखीतांची सेवा करत, समाजाला मानवतेची दिशा दिली, हाच जनसेवेचा वारसा जोपासत हा महोत्सव श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथे प्रेरणादायी स्वरूपात दरवर्षी पार पाडतो असे प्रतिपादन श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन श्री.मधुसूदनदादा मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.
सरतेशेवटी संचालक बापूसाहेब देशमुख यांनी सोहळ्याला उपस्थित सर्व मांन्यवर तसेच दानशुर मंडळींचे यावेळी आभार मानले. प्रामुख्याने या कार्यक्रमाला श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन श्री.मधुसूदन दादा मोहिते पाटील,सचिव श्री.सचिन दादा घोंगटे पाटील,खजिनदार श्री. ज्ञानदेवराव महाकाळ, व्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक कुणाल देशमुख, व्यवस्थापक वसंतराव देशमुख, समाज प्रबोधनकार भरत महाराज रेळे, ह.भ.प.पडोळे महाराज, श्री.सुखदेवशेठ भुतडा,व्यवस्थापक श्री.प्रकाश महात्मे, श्री.गजानन जवंजाळव, श्री.मंगेश देशमुख,माजी मुख्याध्यापक श्री.किशोर चौधरी, श्री.दिपकदादा देशमुख, श्री.प्रभाकर खोपे, श्री.सुखदेवराव नवघरे,कंत्राटदार श्री. सुधीर जाधव, अमोल शेळके, सुनील मोहोळ, रमेश तोटे आदिंसह पंचक्रोशीत भक्तमंडळी बहुसंख्येने या आनंदमय सोहळ्याला उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या शेवटी दिंडी पथकातील भाविकांना उबदार ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,पुरुषांना शर्ट,महिलांना साड्या व गरजूंना भव्य वस्त्रदान करण्यात आले.तसेच हजारो भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.विशेषत: कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी,परिसरातील बाबांच्या भक्तमंडळींनी विशेष परिश्रम घेतले.