DIO Chandrapur

DIO Chandrapur जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर चे अधिकृत पेज

02/06/2026

10 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 02 : पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. मात्र ही सेवा देतांना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे होणा-या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी 10 जून रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्टर जनरल, नागपूर यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित करण्यात येत आहे.
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा, इत्यादी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक जयंत दाऊ, डाक अदालत, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, नागपूर क्षेत्र, शंकरनगर डाकघर कार्यालय, पहिला माळा. नागपूर- यांचे नावे दोन प्रती सह 8 जून 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे
सहायक निर्देशक यांनी कळविले आहे.
००००००

02/06/2026

अमृतच्या वतीने पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 02 : महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अमृत पयर्टन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यकम 10 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय, कृष्णा टॉवर जवळ गुरुद्वारा रोड, तुकूम येथे संपत्र होणार आहे.
अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्वकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रापैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायिक, टूरिस्ट गाईड, कुक ॲन्ड कॅटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रॅडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तसेच अनुभवी तज्ज्ञ व क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, सहभागी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे. अमृत पर्यटन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगार व उद्योजकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी अमृत चंद्रपूर जिल्हा गुरुद्वारा रोड, तुकूम येथे संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक आदित्ससिंह सेंगर यांनी कळविले आले.
००००००

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’  चे उद्घाटनचंद्रपूर, दि. 02 : जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त क...
02/06/2026

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ चे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 02 : जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मानसिक आजारग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ या सहायता व जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार होते. यावेळी मनोविकृतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सायली दाबेराव, मानसिक रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भटकर तसेच डॉ. प्रियंका मून यांनी उपस्थित रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. यात आजाराची लक्षणे, उपचारांचे महत्त्व, पुनर्वसन तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच मानसिक आजाराशी संबंधित अडचणी, अनुभव व समस्या मोकळेपणाने मांडण्यासाठी आणि परस्पर सहाय्य मिळविण्यासाठी ‘स्किझोफ्रेनिया नातेवाईक गट’ च्या माध्यमातून बोलते व्हा, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
सदर कार्यक्रम मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. मयूर, डॉ. धनेंधर, डॉ. आसावरी, डॉ. श्रद्धा, डॉ. विशाल चौखे आणि छात्रमानसचे अमोल मेश्राम यांच्यासह मेट्रन श्रीमती कोटांगले, श्रीमती आत्राम, सर्व वॉर्ड इन्चार्ज सिस्टर्स, समाजसेवा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विभागाच्या श्रीमती रामटेके, अधिपरिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. सायली दाबेराव व समाजसेवा अधीक्षक उमेश आडे यांनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे मानसिक आजाराविषयी जागरूकता वाढण्यास तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आधाराचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
०००००

निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावावर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकचंद्रपूर, दि. 0...
02/06/2026

निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावा
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक
चंद्रपूर, दि. 02 : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्रीमती पाटील यांनी मंगळवारी (दि.2) निवडणूक यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांनी केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती पाटील यांनी, सर्व नोडल अधिका-यांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. तसेच निवडणुकीचे काम सर्वांनी अतिशय गांभिर्याने करावे. यात कोणतीही चूक होऊ देऊ नका. मतदान पत्रिका, मतदान पेट्या व इतर साहित्यांचे वाटप, वाहतूक अतिशय काळजीपूर्वक करावी. अशा सुचना दिल्या. तत्पुर्वी त्यांनी चंद्रपूर तहसील कार्यालय येथे होणा-या मतदान केंद्राची तसेच मतमोजणी कक्षाची पाहणीसुध्दा केली.
सादरीकरणातून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरीता एकूण 975 मतदार असून यात पुरुष मतदार 495 तर स्त्री मतदार 480 आहेत. सदर मतदार संघात चंद्रपूर जिल्ह्यातील 1 महानगरपालिका, 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायती, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायती तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचा समावेश आहे. तिनही जिल्ह्यातील जिल्ह परिषदांच्या मतदारांची संख्या शुन्य आहे. तिनही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय असे एकूण 17 मतदान केंद्र राहणार असून मतमोजणी चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात होणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी सर्वश्री विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी संजय पवार, अतुल जटाळे, शुभम दांडेकर, सचिन कुमावत, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, अपर पोलिस अधिक्षक कार्तिक, वर्धाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अतिरिक्त् पोलिस अधिक्षक संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
येथे राहतील निवडणूक निरीक्षक उपलब्ध : निवडणूक प्रक्रियेदरम्यान, उमेदवार /पक्ष किंवा मतदारांना निवडणूक निरीक्षक स्वाती म्हसे पाटील (मो. 9307181736) यांना भेटायचे असल्यास त्या, बकुळ, व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भेटीचे वेळापत्रक : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक निरीक्षक यांच्याकडून देण्यात येणा-या भेटीसंदर्भात वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. प्रथम भेट : नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या अंतिम तारेखपासून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजे 1 जून ते 4 जून 2026. द्वितीय भेट : उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेच्या एक आठवड्यानंतर तीन दिवसांकरीता म्हणजे 12 ते 14 जून 2026. तृतीय भेट : प्रत्यक्ष मतदान ताखेच्या एक दिवस अगोदर पासून मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात येऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे 17 जून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापर्यंत.
००००००

वर्धा -चंद्रपूर -गडचिरोली मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीØ विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक...
01/06/2026

वर्धा -चंद्रपूर -गडचिरोली मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Ø विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक

चंद्रपूर, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा केली असून त्यासाठी 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यानुसार वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती योगेश म्हसे पाटील यांची (मो. 9307181736) निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक निरीक्षक श्रीमती म्हसे पाटील ह्या उमेदवार /पक्ष किंवा मतदार यांना भेटण्यासाठी बकुळ, व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील, असे वर्धा -चंद्रपूर -गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

०००००००

01/06/2026
01/06/2026
01/06/2026

जिल्हाधिका-यांकडून जनगणनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

Ø पाच घरांना भेटी ; वास्तविक माहिती देण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31 : प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू आहे. यात प्रगणक, पर्यवेक्षक घरोघरी जावून कुटुंब/ नागरिकांची माहिती घेत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी व फिल्डवरील अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर या गावात भेट देऊन कामाची प्रगती जाणून घेतली.

सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी जनगणना करण्यात येत आहे. यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरी भेट देऊन जनगणनेचे काम करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामाची प्रगती तसेच फिल्डवर येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी छोटा नागपूर या गावातील पाच घरांना भेटी दिल्या. प्रगणक यांच्यामार्फत सुरू असलेली जनगणना अचूक होत आहे का, याची त्यांनी स्वतः पडताळणी केली.

जनगणनेच्या कामासाठी घरी येणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना, नागरिकांनी वास्तविक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पंत यांनी केले. कामात काही अडचणी येत आहेत का, याची विचारणा केली असता, कोणतीही अडचण येत नसल्याचे प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी सांगितले.

यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, प्रगणक कैलास कांबळे, पर्यवेक्षक विशाल दुपारे, छोटा नागपूरच्या सरपंच रंजना जुनघरे, उपसरपंच ऋषभ दुपारे, पोलिस पाटील राजकुमार सागवडे, ग्रामसेवक तुषार बागुळे, तलाठी सीमा नगराळे, तसेच किरण अलोणे, रेखा कांबळे आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. ज्या नागरिकांनी 1 ते 15 मे या कालावधीत www.se.census.gov.in या पोर्टलवर स्वतःहून ऑनलाईन माहिती भरली आहे, त्यांचा एक 'युनिक आयडी' तयार झाला आहे. प्रगणक घरी आल्यानंतर केवळ आपला 'युनिक आयडी' क्रमांक त्यांना सादर करायचा आहे. तर ज्या नागरिकांनी माहिती भरली नाही, त्यांची माहिती प्रगणक स्वतः त्यांच्या घरी जाऊन डिजिटल उपकरणांद्वारे सुरक्षितपणे संग्रहित करीत आहेत. घरांची आणि घरात असलेल्या सुविधांच्या माहितीचा हा पहिला टप्पा 14 जून रोजी संपल्यानंतर, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही 1 फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.

०००००००

चंद्रपूर जिल्ह्यात 345 ग्रामपंचायती टीबी मुक्त ..!क्षय रोग पूर्णपणे बरा होतो         #
01/06/2026

चंद्रपूर जिल्ह्यात 345 ग्रामपंचायती टीबी मुक्त ..!

क्षय रोग पूर्णपणे बरा होतो

#

31/05/2026

📍अहिल्यानगर
पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त #चौंडी (ता. जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

#अहिल्यादेवी_होळकर

Address

Chandrapur
442401

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DIO Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share