29/08/2026
देऊळगाव महीच्या पाच युवकांनी मिळवले शिक्षकपदाचे यश; गावात कौतुकाचा वर्षाव
देऊळगाव राजा : पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत देऊळगाव महीने यंदा उल्लेखनीय यश नोंदविले आहे. गावातील पाच उमेदवारांची महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी निवड झाली असून, त्यांच्या यशाचा आनंद गावकऱ्यांनी सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून साजरा केला.
आप्पाराव खेडेकर, दीपक हरिभाऊ शिंगणे, विठ्ठल दत्तात्रय शिंगणे, अश्विनी अवसरमोल आणि प्रियंका मुकेश शिंगणे या पाच जणांनी शिक्षकपदाला गवसणी घातली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
नव्या जबाबदारीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार नवनियुक्त शिक्षकांनी व्यक्त केला. त्यांच्या यशामुळे देऊळगाव महीतील शैक्षणिक वातावरणाला सकारात्मक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट), देऊळगाव मही यांच्या वतीने नवनियुक्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी गणेश शिंगणे, गणेश नागरे, तुळशीराम पंडीत, श्रीकिसन शिंगणे, केतन कुलकर्णी, रवींद्र शिंगणे फौजी, राजेंद्र शिंगणे, रवींद्र इंगळे, सचिन शिंगणे, ज्ञानेश्वर वाघ, अर्चना अवसरमोल, कैलास राऊत, प्रदीप अवसरमोल, ऋषिकेश शिंगणे आदी उपस्थित होते.
गावातील पाच जणांची शिक्षकपदी झालेली निवड ही विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील युवकही सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर शासकीय सेवेत स्थान मिळवू शकतात, असा सकारात्मक संदेश या यशातून मिळाला आहे.