06/07/2026
बाजीरावांचा आम्हाला ठाउक नसलेला इतिहास..!
आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्या पलिकडचा बाजीराव आम्हा बऱ्याच जणांना नुसता ऐकूनही ठाऊक नसतो.
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो..! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा…!
त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं…! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, तो ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला.
महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने…!
मेघ बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव करत होता…!
राजमुद्रेतील शिवछत्रपतींना अपेक्षित असलेले 'वर्धिष्णू' आणि 'विश्ववंदिता' शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की, त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम वीराला मृत्यू आला तोही मोहीम करतानाच…!!
वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून कधी तरीच उदित होणारा निष्णात सेनापती. साक्षात रणपंडित….! ४० वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया…!
ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई न हरलेला नरपुंगव होता बाजीराव…!
४१ वेळा अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे…!
वस्तुतः महापुरुषांची 'जात' पाहायची नसते तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची 'वात' आणि त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली 'कात' पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या स्वरुपात खुला होतो.
एक उदाहरण म्हणून दाखला द्यायचा तर ब्रिटीश फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या History of Warfare ग्रंथात बाजीरावाने लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन.. 'A masterpiece of strategic mobility' ह्या गौरवपूर्णशब्दांत केलंय…!
दि. २५ फेब्रुवारी १७२८, अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. बाजीरावांच्या मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६ मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले…!
स्रोत :
थोरले बाजीराव पेशवे - विकिपीडिया
#मराठी #पुणे