16/11/2019
मागे एकदा या विषयावर लिहिलं होतं आता परत लिहितोय.
नाशिकच्या कलाकार कै. गीता माळी यांचं अपघाती निधन झाल्याचं फेसबुक आणि इतर माध्यमातुन वाचलं. बऱ्याच जणांच्या फेसबुक मित्र यादित त्या होत्या. अमेरिकेहुन कार्यक्रम करुन येउन नाशिकजवळ अपघात होणं हे दुर्दैवी आहे.
एकंदरीत सगळ्या बातम्या आणि त्या अपघाताचे फोटो पहाताना त्यांची कार ही लक्झरी सेगमेंट मधली आहे हे स्पष्ट दिसतंय.
अशा कार्सना हल्ली दोन चार सहा अशा एअरबॅग्ज असतात मॉडेलनुसार ज्या गाडी धडकल्यावर उघडतात आणि आतील माणसं सुरक्षित रहातात जीवीत हानी न होता.
मग या केस मधे असं का दिसत नाही एअर बॅग्ज उघडल्याचं किंवा त्यानं जीव का वाचला नाही?
याचं कारण म्हणजे गाडी चालवणारा आणि त्याशेजारी बसणाऱ्या माणसाचा कंटाळा असु शकतं.
हल्लीच्या नवीन कार्स मधे एअर बॅग्ज जरी असल्या तरी त्या जोपर्यंत सीटबेल्ट लावले जात नाहीत तोपर्यत कार्यरत होत नाहीत अशी योजना असते. गाडी धडकताना जर सीटबेल्टचे हुक त्या स्लॉट मधे नसतील तर एअर बॅग्ज उघडत नाहीत.
अनेकदा गाडीची डिलिव्हरी घेताना हे सांगितलं जातं पण आपण सीटबेल्ट न लावल्यानं काय होतं ?अशा बेफिकिरीनं वागुन असे दुर्दैवी प्रसंग ओढावुन घेतो.
दुसरं असं की जरी एअर बॅग आणि सीटबेल्ट याचा संबंध नसणारी गाडी असेल तरी गाडी धडकल्यावर तुम्ही इकडे तिकडे फेकले जाण्याची शक्यता सीटबेल्ट लावलेला असताना जवळपास नगण्य होते आणि प्राणहानी टळु शकते.
सीटबेल्ट लावणं हे लाजिरवाणं काम नाहीए. तुम्हाला चार किमी जायचंय की चारशे याचा विचार न करता गाडीत बसल्याक्षणी सीटबेल्ट लावुन मगच गाडी सुरु करण्याची सवय लावा. पोलिस दंड करतो म्हणुन नको तर आपल्याच जीवाची काळजी म्हणुन करा.
टु व्हिलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हिलर मधे सीटबेल्ट या प्राणांतिक इजेपासुन वाचवु शकतात ९० ते ९५% केसेसमधे.
अर्थात हे लावलं म्हणजे वाचेलच असं नाही पण छत्री पाउस थांबवु शकत नाही पण काही प्रमाणात आपल्याला पावसापासुन वाचवु शकते तसाच हा प्रकार आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे या नवीक गाड्यांचा वेग. पॉवरफुल इंजीनमुळे वेग भरपुर घेता येतो पण आपले रस्ते आणि ट्रॅफिक त्या लायकीचं नाहीए. गाडी कॅंट्रोल होत नाही बऱ्याचदा. मशीन आहे ते शेवटी त्याच्याशी खेळ नको.
तेंव्हा आज,आत्तापासून मनाशी खुणगाठ बांधा ... सीटबेल्ट आणि हेल्मेट आणि योग्य वेग या शिवाय वाहन चालवायचं नाही.अगदी गाडीतल्या प्रत्येकानं हे पाळायचं फक्त ड्रायव्हरनं नाही.
सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा...!!