जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

  • Home
  • India
  • Amravati
  • जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती Official page of District Information Office, Amravati

जिल्हाधिकारी कार्यालयात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन      अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ...
31/05/2026

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या ...
30/05/2026

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या



अमरावती , दि. ३० (जिमाका) : जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून यावर्षी जिल्हा प्रशासनाने राज्यात प्रथमच समुपदेशाने बदलीचे धोरण काटेकोरपणे अंमलबजावणी करीत केले आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

शंभर टक्के बदल्या समुपदेशाने करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत समुपदेशनाने बदलीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरलेला आहे. जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक या संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या-२०२६ दि. २९ मे २०२६ रोजी समुपदेशनाद्वारे पार पडलेल्या आहेत.

दरवर्षी समुपदेशनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचारी उपस्थित राहून समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेत सहभागी होतात. परंतु यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार घरून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांवरील अवलंबिता कमी करून नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे इ. बाबींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपाय योजना प्रस्तावित केल्या आहेत.

त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने सूचित केलेल्या उपाययोजनांचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसुल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, वाहन चालक इत्यादी संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच प्रवास टाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात न बोलविता दि. २९ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन बदली प्रक्रिया आयोजित करण्यात आली. यामध्ये सहायक महसूल अधिकारी संवर्गात बदलीस पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली, ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांची बदली झाली, महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३९ कर्मचाऱ्यांची बदली झाली आणि वाहन चालक संवर्गात ३ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे.

या बदली प्रक्रियेत सर्व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतलेला आहे. वरीलप्रमाणे पार पडलेल्या बदली प्रक्रियेबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धारणी, वरूड, अंजनगांव सुर्जी, धामणगांव रेल्वे इत्यादी दूरच्या कार्यालयातून बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात न येता त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभागी होता आल्यामुळे अत्यंत पारदर्शक व विक्रमी वेळेत बदली प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अभिनव संकल्पना राबविल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय न झाल्यामुळे सदर बदली प्रक्रिया यापुढेही अशाचप्रकारे राबवावी, असे कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. आशियाई संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी प्रशासकीय बदल्या सुयोग्य, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडल्या आहेत आणि हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.

Amravati Collector

29/05/2026

पी. एम. किसान योजना: सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक; कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 29 ( जिमाका): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने चालू वर्ष 2025-26 करिता वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जीवंत शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राज्यात 20 मे 2026 पासून यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अनिवार्य आहे; अन्यथा विहित मुदतीत प्रक्रिया न केल्यास शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

शेतकऱ्यांना नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा 'PM-KISAN' मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे (Face Authentication) अशा दोन सोप्या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणिकरण पूर्ण करता येईल. ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन 'फेस ऑथेंटिकेशन'द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी देण्यात आला होता.

दरम्यान, केंद्र शासनाने संशयित प्रकरणातील शेतकऱ्यांचा हप्ता तात्पुरता स्थगित केला आहे. प्रामुख्याने फेब्रुवारी 2019 नंतर झालेले भूमी हस्तांतरण (खरेदी/बक्षीसपत्र/जमीन मंजुरी), चालू व मागील जमीन मालकाचा संशयास्पद अहवाल आणि मागील जमीन मालकाचा अपूर्ण अहवाल या तीन कारणांमुळे ज्यांचे हप्ते थांबले आहेत, अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटरला भेट देऊन पी. एम. किसान पोर्टलवरील Farmer's Corner मधील "Update Missing Information" या Tab मधून आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानंतर बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, कारण ही प्रक्रिया केल्याशिवाय अर्ज मंजुरीसाठी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होणार नाही.

माहिती अद्ययावत केल्यानंतर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर या प्रकरणांना मंजुरी मिळून संबंधित शेतकऱ्यांचे लाभ पुन्हा सुरू होतील. यादीमध्ये नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, अथवा पी.एम. किसान पोर्टलवर स्वतःचे स्टेटस चेक करावे. तसेच, जे लाभार्थी मयत झाले आहेत, त्यांच्या वारसदारांनी मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या आत कृषी कार्यालयास सादर करून मयत लाभार्थ्यांचे हप्ते बंद करावेत, त्यानंतरच वारसदारांना नवीन नोंदणी करता येईल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000000

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*अमरावती, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल...
28/05/2026

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*

अमरावती, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

27/05/2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रविवारी दौरा

अमरावती, दि. 27 (जिमाका): केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा रविवार, दि. 31 मे रोजी जिल्हा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, श्री. गडकरी दि. 31 मे रोजी दुपारी 1 वाजता अरुण अडसड यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता 'अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भेट, दुपारी २ वाजता महेंद्र राहटगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सायंकाळी 5.30 वाजता 'द लाली इम्पेरियल'च्या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. सायंकाळी 6 वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री 8.15 वाजता अमरावतीहून नागपूरकडे प्रयाण करतील.

0000000

27/05/2026

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : किसान सन्मान निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना येत्या कालावधीत मिळणार आहे. हा लाभ शेतकऱ्यांना तातडीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आपला गाव नमुना, सातबारा उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून 'फार्मर आयडी' प्राप्त करून घ्यावा.

जिल्ह्यात अचलपूर 7 हजार 721, अमरावती 14 हजार 479, अंजनगाव सुर्जी 5 हजार 411, भातकुली 7 हजार 208, चांदूर रेल्वे 4 हजार 164, चांदूरबाजार 8 हजार 334, चिखलदरा 1 हजार 559, दर्यापूर 9 हजार 408, धामणगाव रेल्वे 5 हजार 821, मोर्शी 9 हजार 176, नांदगाव खंडेश्वर 8 हजार 893, तिवसा 6 हजार 472, वरूड 8 हजार 749 खातेदार ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यापासून शिल्लक आहेत. मात्र धारणी तालुक्यात अधिकचे 731 खातेदार नोंदणी झाली आहे.

जिल्ह्यात एकूण 5 लाख 16 हजार 195 खातेदार असून आतापर्यंत 4 लाख 22 हजार 649 खातेदारांची नोंदणी झाली आहे. अद्यापही 93 हजार 546 खातेदारांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

26/05/2026

मतदारयाद्यांचे मॅपिंग तातडीने पूर्ण करावे
अमरावती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहेत. या अंतर्गत नागरिकांची 2002 मधील मतदारयादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित बीएलओंना भेटून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

38 - अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही 24 टक्के मतदारांचे मॅपिंग होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या मतदारांचे बीएलओंकडून मॅपिंग पूर्ण झाले आहे, त्यांची 'एसआयआर' प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार आहे. मात्र, ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल, अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील. हा त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

अनेक मतदारांची नावे मतदारयादीत दोन ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे, तेथील नाव कायम ठेवावे. तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित बीएलओंकडे 'नमुना अर्ज क्र. 7' सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या बीएलओंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच दुबार नावांच्या सुधारणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

0000000

26/05/2026

उर्ध्व वर्धा जलाशयजवळील जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.

ही गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी आणि एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

00000000

26/05/2026

उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित
*शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणीपाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 95.50 किमीपर्यंत आणि डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसचित नदी, नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ या तत्वानुसार सिंचन करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात दि. 1 जुलै ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून दि. 31 जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मीटर पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या ऊस, कापूस, केळी व फळबाग या नगदी पिकांसाठी पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू राहणार आहे. यासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

26/05/2026

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी
शाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

अमरावती, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांच्या खात्यात अद्याप पुरस्काराची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलबद्दल 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ अर्जात चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड नमूद केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे.

याबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. परंतू महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे अचूक बँक तपशील समाज कल्याण कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम त्वरित जमा व्हावी, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दुरुस्त करून 31 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून ते जमा करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

00000000

Address

Khaparde Bagicha
Amravati
444606

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm
Saturday 9:45am - 6:15pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+917212551842

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती:

Share