11/06/2026
*बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्यासाठी त्याग, समर्पण आणि संघटन आवश्यक : इंजि. रामजी गौतम*
नागपूर : बहुजन समाजाने शासक समाज बनण्यासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारसंपदेचा आधार घेत संघटितपणे कार्य करण्याची गरज असून त्याग, समर्पण आणि समन्वय या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय सामाजिक व राजकीय परिवर्तन शक्य नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक, माजी राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी इंजि. रामजी गौतम यांनी केले.
स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित बहुजन समाज पार्टीच्या प्रदेशस्तरीय कार्यकारिणी बैठकीत, विदर्भस्तरीय संघटन समीक्षा व प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आज बहुजन समाजाकडे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचे विचार व संघर्षाची प्रेरणा असतानाही संघटनात्मक कमतरतेमुळे बहुजन समाजाला आपल्या संविधानिक हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचा वारसा संघटितपणे पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांच्या पंजाबमधील सुमारे चार लाख एकर जमिनीचे पुनर्वसन झालेल्या दलितांना वाटप करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही, असे सांगत त्यांनी केंद्रातील विद्यमान सरकारच्या विविध धोरणांवर टीकाही केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या सेक्टर स्तरावर किमान १०० लोकांचे संघटन उभे करण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात मराठवाडा विभागाचे मनीष कावळे, पश्चिम महाराष्ट्राचे ॲड. संजीव सदाफुले, खानदेशचे राज चव्हाण, मुंबई झोनचे ॲड. धनराज, विदर्भाचे डॉ. मोहन राईकवार, मंगेश ठाकरे, विदर्भ विभाग पदवीधर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार संजय थूल, महिला आघाडीच्या डॉ. विद्या राईकवार, नागपूरचे योगीराज लांजेवार, वर्ध्याचे अनोमदर्शी भैसारे, गोंदियाचे सुनील भरणे, भंडाऱ्याचे संजय भिवगडे, गडचिरोलीचे भास्कर मेश्राम, अमरावतीचे राजू गजभिये, अकोल्याचे ॲड. मनीष मस्के, चंद्रपूरचे रत्नाकर साठे, वाशिमचे ॲड. राहुल गवई, बुलढाण्याचे दिलीप सरकटे आणि यवतमाळचे संदेश ढोले यांनी आपल्या विभागातील संघटनात्मक कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी बसपाचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, माजी जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, प्रभारी राजकुमार बोरकर, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, शहर महासचिव मंगेश नागदेवे, महिला शहर अध्यक्षा डॉक्टर शबाना खान मॅडम आदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमास प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, मंगेश ठाकरे, प्रदेश सचिव दादाराव उईके, मोहसीन खान, महेंद्र मकेश्वर, विवेक हाडके, प्रफुल्ल माणके, चंद्रकांत देगलूरकर, अशोक गायकवाड, पंडित बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– धम्मा दहिवले
प्रदेश मीडिया प्रभारी, महाराष्ट्र राज्य
बहुजन समाज पार्टी