26/10/2023
मित्रांनो,
गाझापट्टीत सुरू असलेल्या भीषण युद्धखोरीच्या निषेधार्थ खाली निर्देशित केलेल्या अनेक पुरोगामी संघटनांतर्फे निदर्शनं करण्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वा आयोजित केला आहे. स्थळ: गुडलक चौक, डेक्कन, पुणे.
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. आमचे आवाहन खालीलप्रमाणे:
इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष
युद्धखोरी थांबवा!
गाझापट्टीत तात्काळ शांतता प्रस्थापित करा!
७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ या संघटनेने इस्रायलमध्ये हल्लेखोरी केल्यावर इस्रायलने आक्रमक भूमिका घेऊन गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव करून भीषण युद्ध सुरू केलेलं आहे. इस्रायल ‘स्वतःच्या संरक्षणा’ची भूमिका घेऊन गाझापट्टीतील हजारो निरपराध पॅलेस्टिनी लोकांचे बळी घेत आहे; त्यांची घरदारं उद्ध्वस्त करत आहे. आम्ही दोन्ही बाजूच्या अशा युद्धखोरीचा तीव्र निषेध करतो आणि हे युद्ध तात्काळ थांबवावं असं आवाहन करतो.
वीस लाखावर वस्ती असलेल्या गाझापट्टीवर सतत हल्ले सुरू आहेत. तेथील हॉस्पिटल्स, दवाखाने आणि आश्रयस्थानांवर निर्दयपणे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हल्यांमध्ये जखमी झालेल्यांवर उपचारही होऊ शकत नाहीत. तेथील जनतेला अन्न, पाणी, इंधन सर्व मूलभूत गोष्टींपासून वंचित करून त्यांना स्थलांतर करायला भाग पाडलं जात आहे. अनेक स्त्रिया, मुलं, वृद्ध यांचे हाल केवळ अमानुष असेच आहेत. अमेरिका व पाश्चात्य देश अशा नरसंहारासम कृत्यांचं, अमानुषतेचं सक्रिय समर्थन करत आहेत, हे निषेधार्हच आहे. त्याचप्रमाणे, भारतातील बहुतांश प्रसारमाध्यमंही पाश्चात्य कथनानुसार पक्षपाती भूमिका घेऊन वा अपप्रचार करून युद्धखोरीचं समर्थनच करत असल्याचं चित्र आहे.
‘दहशतवाद विरोधी युद्धा’च्या नावाखाली अमेरिकेने यापूर्वी इराक, अफगाणिस्तान आदी देशांमधील अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले आहेत आणि जनजीवन उद्धवस्त केलेलं आहे, हा इतिहास आहे. इस्रायलने तर पॅलेस्टाइनचा मोठा भूभाग बळकावला आहेच, पण गेली सुमारे पाच दशकं वेस्ट बँक आणि गाझापट्टीमधील पॅलेस्टिनी जनांचा सातत्याने जिवंत छळ करत आहे. गाझापट्टी भाग तर गेली कित्येक वर्षं खुला तुरुंग ठरल्यागत स्थिती आहे.
युद्धखोरी आणि असा छळवाद तात्काळ बंद करून इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाबाबत शांततापूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू करावेत, अशी आग्रही भूमिका भारत सरकारने घ्यावी, असे संयुक्त आवाहन आम्ही पुण्यातील विविध संघटना आणि नागरी समाज-गट करत आहोत.
‘युवक क्रांति दल’, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ (NAPM), ‘जवाब दो’, ‘लोकशाही उत्सव समिती’, श्रमिक महिला मोर्चा’, अ.भा.जनवादी महिला संघटन,
‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (PUCL, Pune), ‘पुणे कलेक्टिव्ह’, विचार वेध’,
‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ (CITU), ‘महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक महासंघ’, ‘नव समाजवादी पर्याय’, ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), ‘लोकशाही युवा संघटन', ‘कम्युनिस्ट गदर पार्टी’.
संपर्क: सचिन पांडुळे ९०९६३१३०२२, सुनीती सु.र. ९४२३५७१७८४, मिलिंद चंपानेरकर ९८२३२४८००३