30/05/2026
विषारी दारूकांडानंतर हडपसरमध्ये शिवसेनेचा दणका, अवैध हातभट्ट्या जमीनदोस्त..!!
विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना हडपसरमध्ये मात्र काही दारू माफिया खुलेआम बनावट गावठी दारूच्या हातभट्ट्या चालवत होते. कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागे आणि साठे वस्ती परिसरात सुरू असलेल्या या अवैध दारूच्या साम्राज्याविरोधात आज शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून हल्लाबोल केला. शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट करत अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. हडपसरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.
हडपसरमधील सर्वसामान्य नागरिकांना या अवैध दारूभट्ट्या दिसतात, मग संबंधित यंत्रणांना त्या का दिसत नाहीत, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही जर असे धंदे सुरू राहत असतील, तर ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा कोणाच्याही आर्थिक हितसंबंधांना अधिक महत्त्व दिले जाणार नाही.
हडपसर हा दारू माफियांचा नाही तर कष्टकरी, प्रामाणिक आणि कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांचा परिसर आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील लढा यापुढे आणखी तीव्र केला जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रत्येक माफियाचा पर्दाफाश करून त्यांचे अवैध साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. हडपसरच्या जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी हा लढा अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
यावेळी माझ्यासमवेत प्रवीण हिलगे,विक्रम घाडगे, रोहित भालचिंम, प्रकाश कालगुडे, गणेश साळुंखे, माऊली साळुंखे,रवी लोखंडे, सुरज खिल्लारे, यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.